Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
भवताल

पाणलोट कार्यक्रमाची दुर्दशा!
महाराष्ट्रातील पाणलोट अभ्यासासाठी किंवा अवलोकनासाठी लोक येतात, तेव्हा मागील २० ते २५ वर्षांपासून पाणलोटाची तीच ती गावे का दाखविली जातात, या प्रश्नाचे उत्तर असे की, या कार्यक्रमांतर्गत विकसित अशा गावांची संख्या अजूनही बोटावर मोजण्याइतकीच आहे. म्हणजे याचाच अर्थ असा की, पाणलोट विकासाची चळवळ महाराष्ट्रात अजूनही खऱ्या अर्थाने रुजली नाही, ती लोकचळवळ झालेली नाही. अशी चळवळ न रुजण्यामागे क्वचित पाणलोट विकास क्षेत्र कार्यक्रमाची गरज महाराष्ट्राला वाटत नसावी असेही गृहित धरता येईल का? तर तसेही नाही. कारण महाराष्ट्राचे आजचे सिंचनाखालील क्षेत्र एकूण वहिताखालील क्षेत्राच्या फक्त १६.९९ टक्के आहे व दिवसेंदिवस कमी कमी होण्याची शक्यता आहे.

‘ग्रीटिंग्ज’ व पर्यावरण
ग्रीटिंग्स्.. वरवर पाहता ग्रीटिंग्स्चा आणि पर्यावरणाचा काही दूर दूर पर्यंत संबंध असेल असे वाटत नाही. चांगल्या भावनेने चांगल्या कारणासाठी द्यायची छानशी गोष्ट अशी ग्रीटिंग्स् बद्दलची समज मात्र आता बदलावी लागणार आहे. मुळात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणत्याही कागदाच्या चकचकीत तुकडय़ाची गरजच काय, हाही प्रश्न आहेच. पण तरीही कुणाला काही भेट म्हणून द्यायचे झाल्यास शुभेच्छापत्रे विकत घेण्यापेक्षा तुम्ही ती स्वत: बनवणार असाल, तरच द्या; अशी मागणी अमेरिकन पर्यावरण प्रेमी करू लागले आहेत. विविध सण-समारंभ आणि ‘डे’ज्च्या निमित्ताने जगभरातच ग्रीटिंग्स्चा खप खूपच वाढलाय. ग्रीटिंग्स्वर केलेल्या प्लॅस्टिक कोटिंगमुळे ते रिसायकल करण्यातही जास्त प्रक्रिया करावी लागते व जास्त इंधन तर खर्च होतेच, पण ग्रीटिंग्स्च्या निर्मितीची प्रक्रियासुद्धा पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक असते. पूर्ण वाढलेल्या लाखो झाडांची तोड केवळ ग्रीटिंग्स्च्या निर्मितीसाठी जगभरात विविध ठिकाणी होत असते. जितकी मागणी अधिक, तितका पर्यावरणातील ताण अधिक. हा ताण ग्रीटिंग्स्सारख्या सहज टाळता येणाऱ्या गोष्टीमुळेतरी निदान पडू नये, हा येथील पर्यावरण प्रेमींचा वाढता आग्रह आहे.

जल, जन आणि वन
लोकसंख्येचा भस्मासुर अनेकविध प्रश्न निर्माण करत आहे. लोकसंख्या नियंत्रण या ठाम मानसिकतेचा प्रभाव अद्यापही आपल्याकडे नाही. प्रचंड लोकसंख्येचा बोजा सहन करणे धरतीला अवघड होत चालले आहे. वनांचा नाश होत आहे. वनचरांची तस्करीसाठी हत्या होत आहे. जैवसंपन्नता, जैवविविधता आकुंचित होण्यास मानवी क्रूर वृत्तीच कारणीभूत आहे. हवा, पाणी, ध्वनिप्रदूषणाने पर्यावरणाचे प्रश्न गंभीर होत आहेत. ग्लोबल वॉर्मिगने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. काँक्रीटच्या जंगलात राहणाऱ्यांना कोणत्याच ऋतूची तीव्रता सहन होत नाही. जंगल सफारी, ट्रेकिंग, वीकएण्डपुरतीच जर आपल्याला वनांची, दऱ्याखोऱ्यांची आठवण होत असेल तर आपले निसर्गावरील प्रेम बेगडी आहे हे सिद्ध होते. हरित वनक्षेत्र, मृद्संवर्धन, पर्जन्यमान याची एक शृंखला असते. या शृंखलेतील बंध वाढत्या लोकसंख्येमुळे सैल होत आहेत.
पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे प्रमाण मुळात कमी आहे. पर्जन्यमानातील चढउतार, वनांची कत्तल, भूगर्भातील अविरत जलउपसा, वाढती लोकसंख्या, यामुळे पाणीसाठे अपुरे ठरण्याच्या मार्गावर आहेत. ३३ टक्के वनक्षेत्र असावेच, हे आपले धोरण अस्तित्वात येऊ शकलेले नाही. जल आणि वन अशी सांगड घातल्याशिवाय ते शक्य नाही. वननीती म्हणजे ब्रह्मा जो पाण्याची निर्मिती करतो. जलनीती म्हणजे विष्णू जो पाण्याचे संवर्धन करून जीवन चालवतो. जननीती म्हणजे शंकर जो संतुलन राखतो आणि एका क्षणात सारे काही भस्मसात करतो. ही त्रिमूर्ती जर योग्यपणे कार्यान्वित झाली तर प्रश्नांची तीव्रता कमी व्हायला वेळ लागणार नाही. यापुढे महायुद्ध झाले तर ते पाण्यामुळे होईल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. जगभर आलेल्या अन्नधान्य टंचाईचा अनुभव आपण घेत आहोतच. देशात हरितक्रांतीची मर्यादा गाठली गेली असताना लोकसंख्येचा अजस्र अजगर आ वासून उभा आहे.
या पाश्र्वभूमीवर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभुतांना प्रदूषित होऊ न देणे हे फार मोठे आव्हान आहे. रासायनिक खतांनी जमीन, कारखान्यांच्या टाकाऊ पाण्याने आणि सांडपाण्याने नद्यांचे पाणी, धूळ आणि धुराने आसमंत प्रदूषित होऊन जीवसृष्टीवर परिणाम करत आहे. मरणासन्न नद्या, हरितपणा हरवलेले निस्तेज वृक्ष, अस्वच्छ हवा हे अनियंत्रित नागरीकरणाचे दुष्परिणाम आहेत. आरोग्याचे प्रश्न यातून गंभीर होताहेत. कृषी क्षेत्रात संकरित बी-बियाणे, रासायनिक खते, विषारी कीटकनाशके, पाण्याचा अमर्याद वापर यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता आणि पिकांच्या कसदारपणावर परिणाम होत आहे. खाणारी वाढणारी तोंडे आणि घटते धनधान्य उत्पादन याचा मेळ कसा घालायचा? निसर्ग, पर्यावरण, हवामान, कृषी हे सगळे घटक एकमेकांत गुंफलेले आहेत. वाढलेली संख्या आणि अमर्याद शोषण या मानवसमाजाच्या दुर्गुणामुळे या घटकांच्या स्थैर्याला धक्का लागत आहे. म्हणूनच जल, जन आणि वन या त्रयीचा एकात्मिक विचार करणे आज भाग पडत आहे. जल म्हणजे केवळ पर्जन्य, भूगर्भातील पाणी असा मर्यादित विषय नसून समग्र जलसंवर्धन असा आहे. जन हा विषय केवळ लोकसंख्यावाढ नियंत्रण नसून त्यात पर्यावरण संरक्षक समाज उभा करणे याचा अंतर्भाव आहे. जल आणि वनसंवर्धन हे केवळ जनांच्या हाती आहे. वनसंवर्धन हा विषय पर्यावरणशुद्धी आणि जलसंवर्धनाशी थेट संबंधित आहे. विकासाची फळे पर्यावरणाचा बळी देऊन चाखायची असतील तर पुढील पिढीस देण्यासाठी आपल्याकडे काहीही शिल्लक राहणार नाही. पर्यावरण ही संजीवनी आहे. निरोगी आरोग्याचा निकष हा शुद्ध पर्यावरण आहे. जनांनी याची दखल घेऊन जल आणि वनसंवर्धनासाठी कटिबद्ध होण्याची वेळ आता आली आहे.
सुरेश कोडितकर, पुणे