Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

पेटत्या कचऱ्याची धग
फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपो आणि चक्रीउपोषण

सुधीर मेथेकर

उरुळी देवाची-फुरसुंगी येथील डोंगरमाथ्यावर सुमारे १८ वर्षांपासून आजतागायत महापालिकेच्या हद्दीत जमा होणारा कचरा अर्निबधपणे टाकण्यात येत आहे. यामुळे मौजे फुरसुंगी, उरुळी देवाची, शेवाळेवाडी, मांजरी बु., उंड्री, हांडेवाडी, वडकी आदी भागांत पर्यावरणाच्या गंभीर समस्या निर्माण होऊन ग्रामस्थांचे जीवन वारंवार विस्कळीत होत आहे; परंतु समस्येतील मोठी समस्या निर्माण झाली अथवा ग्रामस्थांनी आंदोलने छेडली की, लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी विविध आश्वासने देतात, तात्पुरती मलमपट्टी करतात अन् काही दिवसांनी परत सर्व शांत! परत कचरा डेपोला आग लागते, धुराचे लोट उसळतात, परिसरातील जनजीवन विस्कळीत होते, परत आंदोलन अन् पुन्हा तेच तेच! त्यामुळे सर्व बाबींना वैतागलेल्या नागरिकांना आता अशा आश्वासनांचा विट आला आहे.

राजीनामा कोणाकडे?
पक्षात होणारी घुसमट, किंमत न देणे, निवडणुकीचे तिकीट नाकारणे आदी एक ना अनेक कारणे पक्ष बदलण्यासाठी असतात. असेच एक कारण घेऊन एका पक्षातील शहर उपाध्यक्ष व विभाग पदाधिकाऱ्याने आज पक्ष बदलला व सोशल इंजिनिअिरगच्या प्रयोगामध्ये उडी घेतली. पत्रकार परिषदेत या दोघांनीही अधिकृतपणे पक्ष बदलल्याचे व नव्या पक्षात प्रवेश घेतल्याचे जाहीर करून टाकले. पण पत्रकारांकडून आलेल्या एका प्रश्नामुळे या पूर्वीच्या पक्षातील उपाध्यक्षाची पंचायत झाली.

सुरेश कलमाडी यांचा निवडणूक जाहीरनामा
पुणे, १३ एप्रिल/प्रतिनिधी

वाहतूक सुधारणेसाठी मेट्रो, बीआरटी, मोनोरेल सारख्या योजना, तरुणांना नोकऱ्या, शहरात चोवीस तास पाणीपुरवठा, झोपडपट्टीवासीयांना व मध्यमवर्गीयांना घरे, तेवीस गावांसाठी हरित विकास आराखडा.. या आणि अनेक योजना साकारण्याचे आश्वासन काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांनी पुणेकरांना आज दिले. कलमाडी यांचा ‘पुण्याचा विकासनामा’ आज प्रकाशित करण्यात आला. त्या संबंधीची माहिती पत्रकार परिषदेत देताना कलमाडी म्हणाले की, पुढील पाच वर्षांत शहराचा विकास आणि रोजगार निर्मिती या मुद्यांवर भर देण्याचे माझे उद्दिष्ट असेल.

उरळीत तात्पुरता कचरा टाकणार; निवडणुकीनंतर स्थलांतर ?
शहरातील कचरा दोन दिवसांत उचलणार

पुणे, १३ एप्रिल / प्रतिनिधी

शहरातील कचरा उरळी येथील कचरा डेपोमध्ये मतदानाच्या दिवसापर्यंत (दि. २३) टाकण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून त्यानंतर तत्काळ कचराडेपो हलविण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी आज दिले.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या शहरातून निघणाऱ्या मिरवणुकींच्या मार्गातील कचरा तातडीने हलविण्यात येणार असून शहरामध्ये गेल्या पाच दिवसांपासून पडून असलेला पाच हजार टन कचरा येत्या दोन दिवसांत उरळी येथील कचरा डेपोमध्ये हलविण्यात येणार असल्याचेही परदेशी यांनी स्पष्ट केले.

यांना कुणी तरी सांगा हो !
लोक तर म्हणतात..

आमचा उमेदवार तसा प्रबळ आहे.., त्याची प्रचारयंत्रणाही प्रतिस्पध्र्याच्या तोलाची आहे, दिवसभर चालत राहून लोकांना भेटण्याइतकी शारीरिक क्षमता अन् उत्साहही त्याच्याकडे आहे, पण..
आमचा उमेदवार लोकांना भेटतो, पण फारसं बोलत नाही. निवडणुकीत उमेदवार कसा असावा? त्यानं भेटणाऱ्याला नमस्कार करायला पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना तर अगदी लवून. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून इकडच्या-तिकडच्या गप्पा त्यानं केल्या पाहिजेत, मतदारांना त्यांच्या त्यांच्या भागातले प्रश्न विचारत बोलतं केलं पाहिजे.

पुन्हा ४०.१ अंश!
राजकारणाबरोबर वातावरणही तापले
पुणे, १३ एप्रिल / खास प्रतिनिधी

पुण्यातील उकाडय़ात पुन्हा वाढ झाली असून, आजच्या कमाल तापमानाने या हंगामातील उच्चांकाशी (४०.१ अंश) बरोबरी साधली, तर लोहगाव येथे तापमान ४०.८ अंशांपर्यंत वाढले. येत्या दोन दिवसांतही हा उकाडा कायम राहील व त्याचा परिणाम म्हणून सायंकाळनंतर वादळी पाऊस पडेल, अशी शक्यता वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. पुण्याबरोबरच राज्याच्या इतर भागातही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. अकोला येथे राज्यातील आजच्या सर्वाधिक तापमानची (४३.८ अंश) नोंद झाली. जळगाव (४३.२) आणि नागपूर (४३) येथेसुद्धा उकाडय़ाने नागरिकांना हैराण केले. राज्याच्या सर्वच भागातील तापमान आज त्या त्या ठिकाणच्या सरासरीपेक्षा अधिक होते. शहरात गेली पाच-सहा दिवस उकाडय़ाने थोडाला दिलासा दिला होता. मात्र, कालनंतर पुन्हा वातावरणातील उष्मा वाढायला सुरुवात झाली. आज दिवसभरात त्यात आणखी वाढ झाली. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळांनी पुणेकरांना नकोसे केले होते. त्यात भर म्हणून रात्रीसुद्धा तापमान दिलासा मिळण्याइतपत खाली गेले नाही. पुण्यात किमान तापमानाची नोंद २४.९ अंश सेल्सिअस इतकी झाली. हा आकडा सरासरीच्या तुलनेत सहा अंशांनी अधिक होता. लोहगाव येथे तर आज तापमानाने या हंगामातील उच्चांक गाठला. तिथे पारा ४०.८ अंशावर स्थिरावला.

‘शाहू स्मारकासाठी चळवळ सुरु करणार
पुणे, १३ एप्रिल/प्रतिनिधी

पुणे शहरामध्ये शाहू महाराजांचे स्मारक होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करणारी मंडळी आज शाहू महाराजांचे नाव घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी लोकांसमोर जात आहेत. त्यांच्या दुटप्पी वृत्तीचा बुरखा फाडण्यासाठी आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने शाहू विचारांची मंडळी ‘शाहू स्मारकासाठी’ चळवळ सुरू करणार आहे. पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप तुपे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या वेळी दीप्ती चौधरी, सुनील शिंदे आदी उपस्थित होते. तुपे यांनी सांगितले की, मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना शाहू महाराजांसमवेत इतर विचारवंतांच्या स्मारकासाठी आर्थिक तरतूद केली होती. मात्र पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी माझ्या तरतुदीला विरोध केला होता. ही माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शाहू विचारांची मंडळी चळवळ उभी करणार आहे.

डी. एस. कुलकर्णी यांना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट चा पाठिंबा
पुणे, १३ एप्रिल/ प्रतिनिधी

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने पुणे जिल्हातील पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डी. एस. कुलकर्णी यांच्यासह बारामती व शिरूर मतदारसंघामध्ये बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात मात्र अपक्ष उमेदवार मारुती भापकर यांना पक्षाने पाठिंबा दिला आहे. पक्षाचे जिल्हा सचिव अजित अभ्यंकर यांनी या बाबतची माहिती दिली. बसपचे पुण्यातील उमेदवार कुलकर्णी, शिरूरचे उमेदवार यशवंत झगडे व बारामती मतदारसंघातील उमेदवार विवेक कुदळे यांना पक्षाने पािठबा दिला आहे. देशात खऱ्या अर्थाने पर्यायी धोरणांचे धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यासाठी या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन अभ्यंकर यांनी केले आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्ष व भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांची आर्थिक धोरणे समान आहेत. त्यामुळे या दोन्हींचा पराभव करून धर्मनिरपेक्ष विचारांचे जनवादी आर्थिक धोरणे असलेले सरकार स्थापन करण्यासाठी डाव्या व लोकशाही पक्षांनी आघाडी स्थापन केली आहे. त्यात बसप नसले, तरी त्यांनी निवडणुकीनंतर काँग्रेस किंवा भाजपकडे न जाता तिसऱ्या आघाडीत येण्याची भूमिका घेतली असल्याने त्यांना पािठबा दिल्याचे अभ्यंकर यांनी म्हटले आहे.

तानाजी पाटील यांना पुरस्कार प्रदान
पुणे, १३ एप्रिल/प्रतिनिधी

‘तुकारामांचे अभंग हे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले असता थक्क करणारे आहेत. या अभंगांचा समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यास केला आणि पुस्तक लिहिले, त्या माझ्या पुस्तकाला शं. ना. जोशी पुरस्कार मिळाला याचा मला आनंद होत आहे’, असे उद्गार डॉ. तानाजी पाटील यांनी पुरस्कार स्वीकारताना काढले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा शं. ना. जोशी पुरस्कार आज डॉ. तानाजी पाटील यांच्या ‘समाजजीवनातील तुकाराम’ या पुस्तकास देण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. चिं. शेजवलकर म्हणाले, ‘माझ्या हातून लेखकाला पुरस्कार देऊ केल्याने एकप्रकारे साहित्य परिषदेने माझाच गौरव केला आहे.’ या वेळी परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. वि. भा. देशपांडे, डॉ. सु. प्र. कुलकर्णी, अरुण जाखडे, ब. शं. जोशी, सचिन पोळगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती महाळंक यांनी केले, तर दीपक करंदीकर यांनी आभारप्रदर्शन केले.

अण्णा भाऊ साठे लोकदलाचा विक्रम बोके यांना पाठिंबा
पुणे, १३ एप्रिल/प्रतिनिधी

पुणे लोकसभेचे उमेदवार विक्रम बोके यांना अण्णा भाऊ साठे लोकदलाने आज पाठिंबा दर्शविला आहे. लोकदलाचे संस्थापक अध्यक्ष नागपुत्र कपाळे यांनी पत्रकाद्वारे हा पाठिंबा दिल्याचे कळविले आहे. जनतेचे हित व समाजाचे परिवर्तन करू शकणाऱ्या उमेदवाराला मतदारांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. लोकदलाने बोके यांना पाठिंबा दिल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचारास सुरुवात केली आहे, असे कळविण्यात आले आहे.

‘पवार यांचे हात बळकट करण्यासाठी लांडेंना निवडा’
हडपसर, १३ एप्रिल/ वार्ताहर

शरद पवार यांनी महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यामुळेच आज महिला विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत, हे महिलांनी विसरता कामा नये म्हणून पवार यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व आर.पी.आय.चे उमेदवार विलास लांडे यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन मोहिनी लांडे यांनीकेले.
हडपसर येथील वेताळबाबा वसाहतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे बोलत होत्या. मेळाव्याचे आयोजन शहर युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विजय मोरे यांनी केले होते. या वेळी महिला अध्यक्षा वासंती काकडे, नगरसेवक सुनील बनकर, सीमा लांडे, आरपीआयच्या मीना गलांडे, संगीता खोमणे, उज्ज्वला टिळेकर, शालिनी जगताप, डॉ. शंतनू जगदाळे, संगीता आगरवाल आदी उपस्थित होते. गाडीतळ, महादेवनगर, सातववाडी, मगरपट्टा आदी ठिकाणी बैठकांना महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

आढळराव यांची आज आळंदीत पदयात्रा
चाकण, १३ एप्रिल/वार्ताहर

शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपाचे उमेदवार ‘शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मंगळवार १४ एप्रिल ०९ रोजी आळंदी (ता. खेड) येथे पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खेड तालुका प्रमुख रामशेठ गावडे व अशोकराव खांडेभराड यांनी दिली. खासदार आढळराव पाटील यांचा उद्या खेड तालुका दौरा आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी नऊ वाजता आढळराव यांचे राजगुरूनगर येथे आगमन झाल्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांसमवेत चासकमान, कडधे, बुरशेवाडी गुंडाळवाडी, वाडा, डेहणे, केहणे येथील मतदारांशी थेट संपर्क साधणार आहेत. सायंकाळी ४ नंतर आढळराव हे शेलगाव, वडगाव घेनंद, चिंबळी येथे भेट देणार आहेत. सायंकाळी सात वाजता आळंदी येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मरकळ, कोयाळी येथेही संपर्क दौरा आयोजित केला आहे.

पळवून आणलेल्या दोन मुलींची सुटका
पुणे, १३ एप्रिल / प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून पश्चिम बंगालमधून पुण्यात पळवून आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींची आज सुटका करण्यात आली. बुधवार पेठ येथे पोलिसांनी ही कारवाई केली. बुधवार पेठेतील डिस्को बिल्डिंगमधून सतरा वर्षांची अल्पवयीन मुलगी (रा. बागाज्योती, जाधवपूर, जि. हावडा), अल्पवयीन मुलगी (रा. नोंदीया) या दोन मुलींची सुटका करण्यात आली. त्यांना डांबून ठेवून वेश्याव्यवसाय करण्यास लावणाऱ्या कुंटणखान्याची मालकीण फरीदा जब्बार खान (वय ४३, रा. बुधवार पेठ), रूपा मायला गुरूंग (वय ४०, रा. बुधवार पेठ), दलाल संजय सरकार, राजू आदींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस आयुक्त रणजित धुरे, भारतभूषण शर्मा, पोलीस उपनिरीक्षक रोहिणी बोठे, सहायक फौजदार विठ्ठल खुडे आदी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

शेख यांच्या आत्महत्येच्या सीआयडी चौकशीची मागणी
पिंपरी, १३ एप्रिल/प्रतिनिधी

शिवशक्ती सहकारी पतपेढीचे वरिष्ठ लिपिक दिवंगत अब्दुल गनी शेख यांच्या आत्महत्येचे प्रकरण सीआयडीकडे सोपवावे, अन्यथा २१ एप्रिलपासून मयत शेख यांचे कुटुंबीय पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करतील, असा इशारा देण्यात आला आहे. काळेवाडी, थेरगाव येथील ‘मातृभूमी दक्षता चळवळ’ या स्वयंसेवी संघटनेचे अध्यक्ष मुबारक शेख यांनी लेखी निवेदनाद्वारे पुणे पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. शेख आत्महत्या प्रकरणी हिंजवडी पोलीस निष्पक्षपणे चौकशी करत नाहीत. त्यामुळे हे प्रकरण सीआयडी खात्याकडे सोपवावे, अशी मागणी पाच मार्चला केली होती; परंतु त्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. मातृभूमी दक्षता चळवळ या संघटनेच्या नेतृत्वाखाली २१ एप्रिलला दुपारी २ वाजता पोलीस आयुक्त कार्यालयासमोर संघटनेचे पदाधिकारी व मयत अब्दुल गनी शेख यांच्या पत्नी दिलशाद व आईवडील सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुबारक शेख यांनी दिली. मयत शेख यांच्या मृत्युपुर्व जाबजबाबमध्ये संबंधित आरोपींची नावे लिहून घेण्यास नकार देणाऱ्या हिंजवडी पोलीस ठाण्याचे हवालदार एस. एस. शिर्के यांच्यावर त्वरित निलंबनाच्या कारवाईचीही त्यांची मागणी आहे.

खून झाला असल्याचे सांगून वृद्धेस लुबाडले
पिंपरी, १३ एप्रिल/प्रतिनिधी

पुढच्या बंगल्यामध्ये खून झाला आहे, गळ्यातील गंठण काढून ठेवा, असे सांगून एका वृद्धेला तिघाजणांनी लुबाडण्याचा प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान इंद्रायणीनगर येथील महाराष्ट्र कॉलनी येथे घडला. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेणुबाई सीताराम बोऱ्हाडे (वय ६५, रा. ४७/२, साई-किरण, साई चौक, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. बोऱ्हाडे यांना तिघाजणांनी अडवून पुढील प्रीतम प्रकाश बंगल्यामध्ये खून झाला आहे, असे खोटे बोलून त्यांच्याजवळील पंचवीस हजार रुपयांचे गंठण काढून घेतले. अधिक तपास सहायक निरीक्षक सदाशिव जाधव करीत आहेत. हॉटेलमध्ये ग्राहकाच्या साहित्यांची चोरी आकुर्डी येथील हॉटेल रत्नलोकमध्ये शनिवारी रात्री चोरटय़ांनी एका ग्राहकाचे लॅपटॉप, कॅमेरा असा बावन्न हजार रुपयांचा माल चोरून नेला. कुलदीप गंगारामसिंग सौगर (वय २४) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. कुलदीप यांच्या हॉटेल रत्नलोकमधील रूम नं. ३०३ मधून चोरटय़ांनी ५२ हजार तीनशे रुपयांचा लॅपटॉप, चार्जर, हेडफोन, डिजिटल कॅमेरा व आठ जीबीचा पेनड्राईव्ह चोरून नेला. अधिक तपास महिला फौजदार स्मिता सुतार करीत आहेत.

आयुक्तांकडून ‘एसएमएस’द्वारे नागरी प्रश्नांची सोडवणूक
पिंपरी, १३ एप्रिल/प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांकडून नागरी प्रश्नांसंदर्भात येणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आयुक्त आशिष शर्मा यांनी ‘एसएमएस’द्वारे संबंधित विभागप्रमुखांना आदेश देऊन त्याची सोडवणूक करण्याची पद्धत सुरू केली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली ही पद्धत आचारसंहिता संपल्यानंतर नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. पालिकेच्या संगणक विभागाचे प्रमुख नीलकंठ पोमण यांनी याबाबतची माहिती दिली. वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात आयुक्तांकडे वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी येतात. या तक्रारी एकत्र करून आयुक्तांद्वारे संबंधित विभागप्रमुखांना ‘एसएमएस’द्वारे पाठविणारे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार आयुक्तांकडून या तक्रारी अधिकाऱ्यांकडे जाणार, त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची पूर्ण माहिती घेऊन पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. या तक्रारींची सोडवणूक झाली की नाही, याची माहिती आयुक्तांना एसएमएसद्वारे कळविण्याची व्यवस्था असणार आहे. यासाठी ५० हजार रुपये खर्च होईल, असे पोमण यांनी सांगितले. या पद्धतीनुसार आतापर्यंत आयुक्तांकडे आलेल्या २३ पैकी १२ तक्रारींची सोडवणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या प्रायोगिक तत्त्वावर आयुक्तांनी स्वत:साठी ही पद्धती ठेवली आहे. नंतरच्या काळात या पद्धतीचा लाभ नागरिकांनाही घेता येणार आहे, असे पोमण यांनी सांगितले.

गुरुवारी सायंकाळी पिंपरीचा पाणीपुरवठा बंद
पिंपरी, १३ एप्रिल / प्रतिनिधी

रावेत येथील वीज उपकेंद्रामधील विद्युत संचमांडणी, पंपगृहामधील पंिपग मशिनरीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी (१६ एप्रिल) सकाळी दहा ते सहा या वेळेत पंिपग बंद ठेवण्यात येणार असल्याने सायंकाळी संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी दिली. शुक्रवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन तुपे यांनी केले आहे.