Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
राज्य

नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे दुर्गम भागात प्रचार थंडच
गडचिरोली, १३ एप्रिल / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन करीत नक्षलवाद्यांनी हिंसक कारवायात वाढ केल्याने जिल्ह्य़ाच्या नक्षलवादग्रस्त भागात प्रचार करण्यास उमेदवार व कार्यकर्ते उत्सुक दिसत नाहीत. परिणामी, नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे दुर्गम भागातील प्रचार यंत्रणा थंडावल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांनी गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर हिंसक कारवाया घडवून आणल्या.

सोनियांच्या दौऱ्याने ‘हवापालट?’
यवतमाळ, १३ एप्रिल / वार्ताहर

काल-परवापर्यंत आत्मविश्वास गमावलेले काँग्रेसचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये सोनिया गांधींच्या दौऱ्याने विजयाच्या विश्वासाचे बळ दिल्याचे जाणवत असून सुस्तावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेसुद्धा आता काँग्रेस उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्या ‘हाताला’ आपले ‘घडय़ाळ’ बांधण्याची स्पर्धा करताना दिसत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, सेना उमेदवार भावना गवळी यांचा विजय दोन लाखाच्या मताधिक्याने झाल्याशिवाय राहणार नाही, असे कालपर्यंत म्हणणारे सेना नेतेसुद्धा एवढय़ा मताधिक्याची आशा करणे ‘स्वप्नवत’ आहे, असे कबूल करीत आहेत, तर काँग्रेस नेते ही लढाई काटय़ाची आहे असे सांगतात.

प्रचार अंतिम टप्प्यात
गडचिरोली, १३ एप्रिल / वार्ताहर

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १६ एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचारासाठी आता फक्त एकच दिवस उरलेला असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविला आहे. ‘रोड शो’चे आयोजन करून मतदारांशी थेट संपर्क साधण्याची मोहीम उमेदवारांनी सुरू केली आहे.

मेळघाटातील हत्तीघाट विकासापासून कोसो दूर
वीजपुरवठा नाही.. पाण्यासाठी ५ किमी.ची पायपीट
मधुसूदन कुलथे
चांदूर बाजार, १३ एप्रिल

मेळघाटच्या कुशीत वसलेले हत्तीघाट हे गाव व त्यात राहणाऱ्या ४५० लोकांना स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही वीजपुरवठा व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दर पाच वर्षांत निवडणुका येतात व जातात. दरवेळी उमेदवार आश्वासने देतात व त्या आश्वासनांना भुरळून आदिवासी मतदान करतात परंतु, कोणत्याही उमेदवाराने आजपर्यंत त्यांच्या आवश्यक असलेल्या सुविधांकडे डोकावून पाहिले नाही.

वडखळ येथे अपघातात चार ठार, सात जखमी
अलिबाग, १३ एप्रिल/ प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाटणी गावाच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री स्कॉर्पिओ जीपला झालेल्या अपघातात चार प्रवासी जागीच ठार तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत़
मृतांमध्ये अरविंद जाधव (२८), काशिनाथ कांबळे (४५, दोघे रा़ गोवंडी, मुंबई), सुचित्रा जाधव (३०) व स्नेहा जाधव (१०, दोघी रा़ लांजा) यांचा समावेश आह़े जखमींपैकी स्वाती गायकवाड (१४, रा़ निजामपूर-माणगाव), लक्ष्मण जाधव (३५, रा़ लांजा) व सुलोचना कांबळे (४०, रा़ गोवंडी, मुंबई) यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात तर उर्वरित मुसा सय्यद (२९, रा़ आष्टी-बीड), प्रतीक्षा गायकवाड (निजामपूर-माणगाव), शकुंतला जाधव (२६, रा़ लांजा) व मनिषा पवार (२५) यांना पेण उप जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आह़े
गोवंडी येथून लांज्याला जात असताना पाटणी येथे एका ट्रेलरला ओव्हरटेक करुन स्कॉर्पिओ पुढे जात असताना चालक मुसा सय्यद याचा गाडीवरचा ताबा सुटला़ महामार्गावरच स्कॉर्पिओ उलटून पुढे शेजारील खड्डय़ात पडल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितल़े

अवैधरीत्या रेती उत्खनन करणाऱ्या सात जणांना अटक
भिवंडी, १३ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील कोन गावच्या खाडीकिनाऱ्यालगत अवैधरीत्या उत्खनन करून शासनाची रॉयल्टी बुडविणाऱ्या सात जणांना पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून अटक केली आहे.
घटना स्थळावरून पोलिसांनी सात ट्रक, पाच जेसीबी, एक पोकलेन मशीन, चार सक्शन पंप जप्त केल्याने रेती चोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोन गावचे माजी सरपंच गंगाराम पाटील यांनी आज पहाटे शांतीनगर पोलिसांशी संपर्क करून कोन गावच्या खाडीकिनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या संरक्षण बांधाखालून अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करून रेती चोरून विकली जात आहे, अशी माहिती दिली. त्वरित सहाय्यक पोलीस निरीक्षक साहीद खान पठाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन छापा मारला असता, त्या ठिकाणी पाण्यातून सक्शन पंपाद्वारे अनधिकृत रेतीचे उत्खनन केले जात असल्याचे आढळून आले. यावेळी घटनास्थळावरून मुरलीधर कोटकर, मारुती कोटकर, रमेश गायकवाड, युनूश खान- दौलत खान, महम्मद गोलेशेख, गफार खान, अशोक आजम या सात जणांना अटक केली असून, अनधिकृत रेती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारे चार सक्शन पंप, पाच जेसीबी, एक पोकलन मशीन, रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक शांतीनगर पोलिसांनी जप्त केले आहेत.

कळबंमध्ये ८५ जणांना गॅस्ट्रोची लागण
मिरज, १३ एप्रिल / वार्ताहर

दूषित पाणी वापरल्याने कळंबी गावात गॅस्ट्रोची साथ सुरू झाली असून ८५ जणांना लागण झाली आहे. सोमवारी आरोग्य विभागाने गावात तातडीने बचावकार्य हाती घेतले असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आले. तानंग प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून कळंबी गावाला दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. पाणी पुरवून वापरण्यासाठी ग्रामस्थ पाणी साठवून ठेवतात. साठविलेल्या पाण्याचा वापर केल्याने रविवारी रात्रीपासून अनेकांना उलटय़ा व जुलाब याचा त्रास होऊ लागला. सोमवारी सायंकाळपर्यंत ८५ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

चंकी पांडे, भाग्यश्रीचा कळमेश्वरात ‘रोड शो’
कळमेश्वर, १३ एप्रिल / वार्ताहर

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार मुकुल वासनिक यांच्या प्रचारासाठी १३ एप्रिलला सिनेस्टार चंकी पांडे-भाग्यश्री यांचा ‘रोड शो’ झाला. सकाळी ११.३० वाजता काँग्रेस प्रचार कार्यालयात त्यांचे आगमन झाल्यावर शहर अध्यक्ष पुंडलिक धार्मिक, नगरसेवक सिद्धार्थ बागडे, पांडुरंग कामडी, जिल्हा महासचिव सरजू मंडपे, राजेश देशमुख यांनी स्वागत केले. त्यानंतर चंकी पांडे आणि भाग्यश्री यांनी खुल्या जीपमध्ये उभे राहून ढोल-ताशाच्या निनादात जनतेला हात उंचावून अभिवादन केले. शहराच्या प्रमुख मार्गाने प्रचार मिरवणूक निघून समारोप ब्राह्मणी फाटय़ावर झाला. त्यांच्यासोबत चंदनसिंग रोटलेंसह काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होते.