Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
क्रीडा

माझ्या कामगिरीला मिळालेली ही पोचपावती - सचिन
दीड लाख पौंडांच्या पुतळ्यासाठी चार महिन्यांची मेहनत
मुंबई, १३ एप्रिल / क्री. प्र.
‘मादाम तुसाँ संग्रहालयात प्रथमच एका भारतीय क्रीडापटूचा पुतळा उभारण्यात येतो आहे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे या पुतळ्याचे अनावरण माझ्या घरात म्हणजेच भारतात होते आहे. क्रिकेटला मी जे योगदान दिले आहे, त्याला मिळालेली ही पोचपावती म्हणता येईल.’-इति सचिन.

टीकाकारांनी आपले काम करावे; मला सल्ला देऊ नये -हरभजनसिंग
नवी दिल्ली, १३ एप्रिल / पीटीआय

भारतीय उपखंडाबाहेर माझी कामगिरी फारशी चांगली होत नाही, अशी टीका सतत करणाऱ्यांनी त्यांचे काम करीत राहावे; मला काय करायला हवे याचा सल्ला देण्याच्या फंदात त्यांनी पडू नये, असे स्टार ऑफस्पिनर हरभजनसिंग याने म्हटले आहे. जे लोक त्याच्या परदेशातील कामगिरीबाबत कायम शंकाच उपस्थित करतात त्यांनी रेकॉर्ड बुक पाहायला हवे कारण मी वेस्ट इंडिज, इंग्लंडसारख्या देशांतही बळी मिळविले आहेत.

१९ वर्षाखालील क्रिकेट भारताचा ऑस्ट्रेलियावर नऊ विकेट्सने विजय
हर्षल पटेलचे तीन बळी * अग्रवाल आणि बारोट यांची अर्धशतके
होबार्ट, १३ एप्रिल/ पीटीआय
ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षाखालील संघाचा पहिल्या तीन दिवसीय सामन्यात भारतीय संघाने ९ विकेट्सने पराभव करून मालिकेतील विजयी घौडदौड कायम राखली आहे. हर्षल पटेलने तीन बळी घेत विजयाचा पाया रचला तर मयांक अग्रवाल आणि अवि बोरोट यांनी शतकी भागीदारी करीत त्यावर कळस चढविला आहे. दोन तीन दिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना जिंकून दौऱ्यात निर्भेळ यश मिळविण्यासाठी प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत प्रयत्नशील असतील.

सानियाला अजिंक्यपद
फ्लोरीडा, १३ एप्रिल/ वृत्तसंस्था

भारतीय सम्राज्ञी सानिया मिर्झा आणि तिची सहकारी चिया जुंग-चुंग यांनी एम. पी. एस ग्रुप चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित झेक प्रजासत्ताकच्या क्वेता पेश्के आणि अमेरिेकेच्या लिसा रेमन्ड यांचा पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले आहे. मिर्झा-चुंग जोडीने पेश्के-रेमन्ड जोडीचा ६-३, ४-६, १०-७ असा पराभव केला असून सानियाचे हे या वर्षांतील पहिले डब्यूटीए जेतेपद आहे.

कुठल्याही क्रमांकावर फलंदाजीस तयार - गंभीर
नवी दिल्ली, १३ एप्रिल/ पीटीआय

यजमान न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात मोलाची भूमिका बजावणारा धडाकेबाज फलंदाज गौतम गंभीर याने कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास आपण सज्ज आहोत असे सांगितले. संघ व्यवस्थापन ज्या क्रमांकावर खेळावयास पाठवील तेथे उत्तम कामगिरी करुन दाखवीन असा आत्मविश्वास गंभीरने या वेळी व्यक्त केला.

आशियाई स्नूकर स्पर्धा : थायलंडच्या युतापोपकडून अग्रमानांकित युआन पराभूत
आदित्य देशपांडेचा चुरशीच्या लढतीनंतर पराभव
पुणे, १३ एप्रिल/प्रतिनिधी

थायलंडच्या युतापोप पाकपाज याने २१ वर्षांखालील गटाच्या आशियाई स्नूकर स्पर्धेत आज अग्रमानांकित ली युआन याच्यावर सनसनाटी विजय नोंदविला. त्याने हा सामना ६६-१६, ७०-१८, ६२-१४ असा जिंकला. पीवायसी जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आजचा दिवस थायलंडच्या खेळाडूंचाच ठरला.

ब्रासाऐवजी हरेंद्रलाच सर्वाधिकार द्यावेत -भास्करन
नवी दिल्ली, १३ एप्रिल / पी. टी. आय.

तब्बल १३ वर्षांनंतर अझलन शाह हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचे कौतुक करणाऱ्या ऑलिम्पियन वासुदेवन भास्करन यांनी आता हरेंद्रसिंग यालाच प्रशिक्षकाचे सर्वाधिकार द्यावेत, असे म्हटले आहे. २००६ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला ११ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते त्या वेळी संघाचे प्रशिक्षक असणारे भास्करन म्हणतात २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्सपर्यंत आता हरेंद्रसिंग याच्यावरच संघाची संपूर्ण जबाबदारी सोडायला हवी.

दक्षिण आफ्रिकेने ‘वन डे’ मालिका जिंकली
गिब्स, डीव्हिलियर्सची तुफान फटकेबाजी
पोर्ट एलिझाबेथ १३ एप्रिल / एएफपी
‘करो या मरो’ सामन्यात ऑस्ट्रेलियाला दणकेबाज सलामी मिळालेली असूनही त्यांचे फलंदाज एकामागून एक तंबूत परतत राहिले आणि दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका ३-१ अशी सहज खिशात टाकत अव्वल स्थान अबाधित राखले. सलामीवीर हर्शेल गिब्स आणि अ‍ॅल्बी डी’व्हिलियर्सची तुफान फटकेबाजी करीत दक्षिण आफ्रिकेला ३१७ धावांचा टप्पा ओलांडून दिला.

अनेक कर्णधार संकल्पना चुकीची
बुकॅनन यांना फ्लेमिंग यांचा विरोध
मेलबर्न, १३ एप्रिल / पीटीआय

क्रिकेटमध्ये एकच कर्णधार असाण्याचा आग्रह धरत ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकॅनन यांच्या मल्टी कॅप्टन्सी थिअरीला कांगारुंचेच माजी जलदगती गोलंदाज डेमिन फ्लेमिंग यांनी विरोध दर्शविला. क्रिकेट संघाचे नेतृत्व एकाच्याच हाती असावे याचे जोरदार समर्थन त्यांनी केले. सामन्यात अशी अनेकांची मते ऐकण्यासाठी वेळ नसतो. एका प्रशिक्षकाने असे सुचविणे आश्चर्यकारक आहे. कारण, प्रशिक्षकाची भूमिका फारच मर्यादीत आहे. प्रशिक्षकाचे काम जोपर्यंत नाणेफेकीचा कौल होत नाही तोपर्यंतच आहे. त्यानंतर एकदा का सामना सुरू झाला की प्रशिक्षक फक्त प्रेक्षक राहतो. त्यामुळे मैदानावरील खेळासाठी अशा कल्पनांचा काहीही उपयोग नाही. कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक असलेल्या बुकॅनन यांनी क्रिकेट सामन्यात अनेक कर्णधार असावेत अशी संकल्पना मांडली आहे. त्यानंतर क्रिकेट विश्वात नवा वाद सुरु झाला आहे. बुकॅनन यांना भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर व दिलीप वेंगसरकर यांनी प्रखर विरोध दर्शविला होता.

किंग्ज इलेव्हन विजेतेपदाचा दावेदार— युवराज
मुंबई १३ एप्रिल/पीटीआय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आमचा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ विजेतेपदाचा दावेदार आहे, असा या संघाचा कर्णधार युवराज सिंग याने येथे आत्मविश्वास व्यक्त केला.या मोसमात चांगल्या फॉर्ममध्ये असलेले शॉन मार्श, कुमार संगकारा, माहेला जयवर्धने यांचा आमच्या संघात समावेश आहे. एस.श्रीशांत याच्यासह अनेक अव्वल दर्जाचे गोलंदाज आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही सातत्यपूर्ण कामगिरी करू असे युवराजने सांगितले. न्यूझीलंडविरुध्द आपली कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही याची कबुली देत युवराज म्हणाला, या दौऱ्यात मला माझा नैसर्गिक खेळ दाखविता आला नाही. मात्र आयपीएल स्पर्धेत मी चांगली कामगिरी करीन. माझ्या चुका दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आवश्यक गृहपाठ मी केला आहे.दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या स्पर्धेत किंग्ज संघाचे नेतृत्व माझ्याकडे असल्यामुळे ती जबाबदारी मोठी आहे. मात्र एकाच वेळी फलंदाज, गोलंदाज व कर्णधार अशा तीनही भूमिका पार पाडण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असेही युवराजने सांगितले. कोलकाता नाईट रायडरच्या बहु कर्णधाराच्या पध्दतीबाबत विचारले असता त्याने मत व्यक्त करण्यास नकार दिला. तो म्हणाला आमच्याकडे तशी पध्दत नसणार आहे.

ह्युइटला विजेतेपद
ह्यूस्टन, १३ एप्रिल / एपी

ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा टेनिसपटू लेटन ह्युइट याने गेल्या दोन वर्षांत प्रथमच एखादी स्पर्धा जिंकण्याची करामत करताना अमेरिकेतील क्ले कोर्ट अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. अमेरिकेच्या वेन ओडेसनिकला त्याने ६-२, ७-५ असे सरळ सेटमध्ये नमवित या स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू असलेल्या ह्युइटने आपल्या कारकीर्दीतला ४९८वा सामना जिंकला. याआधी, रॉजर फेडरर व कार्लोस मोया यांनी ५०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने जिंकलेले आहेत.

अंधेरीच्या भवन्स कॉलेज येथे क्रिकेट प्रशिक्षण
मुंबई, १३ एप्रिल / क्री. प्र.

काऊंटी क्रिकेट क्लब, अंधेरीच्या वतीने अंधेरीच्या भवन्स कॉलेज क्रीडांगणावर उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १५ एप्रिल ते ३१ मे २००९ या कालावधीत होणाऱ्या या शिबिरात १४, १६ आणि १९ वर्षांखालील खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल. शिबिरासाठी २५००/- रुपये शुल्क आकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी अभिजित घोष यांच्याशी भवन्स कॉलेज क्रीडांगणावर अथवा ९८६७६९८१२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

आंतरबँक क्रिकेट : रिझव्‍‌र्ह बँक; एच. डी. एफ. सी. तिसऱ्या फेरीत
मुंबई, १३ एप्रिल / क्री. प्र.

यजमान रिझव्‍‌र्ह बँकेने अत्यंत चुरशीच्या लढतीत स्टेट बँकेला २३ धावांनी हरवून ५३ व्या सर बेनेगल रामराव आंतरबँक क्रिकेट स्पर्धेच्या ज्युनिअर गटातून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. समीर जोशीच्या अचूक गोलंदाजीसमोर रिझव्‍‌र्ह बँक संघ केवळ १६९ धावांतच गारद झाला.
श्रीनाथ महाडिकचा (४३) अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांना फारशी चमक दाखविता आली नाही. समीर जोशीने केवळ ३६ धावांत ६ बळी मिळवत ही करामत केली. मात्र या छोटय़ा लक्ष्याची यशस्वी पाठराखण करताना रिझव्‍‌र्ह बँकेच्या गोलंदाजांनी स्टेट बँकेला १४६ धावांत गुंडाळून विजयश्री खेचून आणली. आणखी एका लढतीत सारस्वत बँकेला ९१ धावांत गुंडाळणाऱ्या एच. डी. एफ. सी. बँकेने तीन विकेटस् गमावून आरामात विजय मिळविला.
संक्षिप्त धावफलक : रिझव्‍‌र्ह बँक- सर्व बाद १६९ (श्रीनाथ महाडिक ४३, समीर जोशी ३६ /६) वि. वि. स्टेट बँक- सर्व बाद १४६ (शेखर राऊत ३३, रमेश पांचाळ २३/३)
सामनावीर- रमेश पांचाळ. सारस्वत बँक सर्व बाद ९१ (योगेश वाघ ११/३) पराभूत वि. एच. डी. एफ. सी. बँक ३ बाद ९२ (दीपक नायर ३३) सामनावीर दीपक नायर.

डेव्हिस चषक टेनिस : चेन्नईच्या यजमानपदाबाबतच निर्णय १७ एप्रिलला
नवी दिल्ली, १३ एप्रिल / पीटीआय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या लढतीच्या यजमानपदाबाबतच निर्णय १७ एप्रिलला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या बैठकीत होणार आहे. पुढील महिन्यात होणारी डेव्हिस चषक लढत चेन्नईत होणार का? याचे उत्तर आयटीएफच्या १७ एपिलला होणाऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होईल. आयटीएफ डेव्हिस चषक समितीची बैठक शुक्रवारी होणार असून त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया लढतीचे स्थळ निश्चित होईल. ही लढत भारतातच होईल, अशी आशा असल्याचे अखिल भारतीय टेनिस असोसिएशनचे सचिव अनिल खन्ना यांनी सांगितले. आयटीएफच्या बैठकीत टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून अखिल भारतीय टेनिस असोसिएशनही सहभागी होणार आहे. लाहोर येथे श्रीलंका क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उपखंडात खेळण्याबाबत विदेशी खेळाडू उत्सुक नाहीत. ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू लेटन ह्य़ुईटने सुरक्षा व्यवस्थेचे कारण देत भारतात खेळण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. टेनिस ऑस्ट्रेलियाने आयटीएफला स्पर्धेचे स्थळ बदलवण्याची विनंती केली आहे पण, अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने ऑस्ट्रेलियाच्या मागणीला विरोध केला आहे.

मॉन्टे कालरे : पेस आणि भूपतीला पहिल्या फेरीत ‘बाय’
मॉन्टे कालरे, १३ एप्रिल / पीटीआय
लिएंडर पेस आणि महेश भूपती यांनी आपापल्या सहकाऱ्यांसह मॉन्टे कालरे मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पेस व त्याचा चेक प्रजासत्ताकचा सहकारी लुकास ड्लोही आणि भूपती व मार्क नोलेस यांना २७,५०,००० युरो पुरस्कार रकमेच्या क्ले कोर्ट स्पर्धेत पहिल्या फेरीत ‘बाय’ मिळाला. तिसऱ्या मानांकित पेस-ड्लोही यांना पुढील फेरीत थॉमस बर्डिच व फ्रन्टिसेक केरमॅक आणि अलबर्ट मॉन्टानेस व टॉमी रोब्रेडो यांच्यातील विजेत्या जोडीसोबत खेळावे लागले. चौथ्या मानांकित भूपती-नोलेस जोडीपुढे दुसऱ्या फेरीत स्पेनच्या फर्नान्डो वेरडास्को व फेलिसियानो लोपेझ आणि रशियाच्या मरात सॅफिन व इगोर आन्द्रीव्ह यांच्यातील विजेत्या जोडीचे आव्हान राहील.

सानियाची सलामी कॅराटन्टचेव्हासोबत
फॅमिली सर्कल चषक
चार्ल्सटन, १३ एप्रिल / पीटीआय
फ्लोरिडा डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत जेतेपद पटकावणारी भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाची फॅमिली सर्कल चषक टेनिस स्पर्धेत सलामीच्या लढतीत कॅराटन्टचेव्हासोबत गाठ पडणार आहे. यापूर्वी २००४मध्ये सानिया आणि कॅराटन्टचेव्हा यांच्यादरम्यान लढत झाली होती पण, त्यावेळी सानियाला पराभव स्वीकारावा लागला होता. जर सानियाने पहिल्या फेरीचा अडथळा दूर केला तर दुसऱ्या तिला अनेक ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. डब्ल्यूटीए क्रमवारीत सानिया सध्या १००व्या स्थानावर असून कॅराटन्टचेव्हा १३३व्या स्थानावर आहे.