Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

माझ्या कामगिरीला मिळालेली ही पोचपावती - सचिन
दीड लाख पौंडांच्या पुतळ्यासाठी चार महिन्यांची मेहनत
मुंबई, १३ एप्रिल / क्री. प्र.

 

‘मादाम तुसाँ संग्रहालयात प्रथमच एका भारतीय क्रीडापटूचा पुतळा उभारण्यात येतो आहे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे या पुतळ्याचे अनावरण माझ्या घरात म्हणजेच भारतात होते आहे. क्रिकेटला मी जे योगदान दिले आहे, त्याला मिळालेली ही पोचपावती म्हणता येईल.’-इति सचिन.
सुमारे दीड लाख पौंड खर्च करून तयार करण्यात आलेल्या सचिनच्या प्रतिमेच्या रूपात प्रथमच कुणा भारतीय क्रीडापटूला लंडनच्या या ऐतिहासिक संग्रहालयात स्थान मिळाले आहे. तब्बल २०० वर्षांचा इतिहास पाठीशी असलेल्या तुसाँ संग्रहालयाने एखाद्या पुतळ्याचे लंडनबाहेर अनावरण करण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. त्या अनुषंगाने सचिनचा झालेला हा सर्वोत्तम असा सन्मान ठरला आहे. सचिननेही आपल्या मनातली हीच भावना अगदी मोकळेपणाने मांडली. एका सप्ततारांकित हॉटेलमध्ये सचिनच्या या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
तब्बल चार महिने अथक मेहनतीनंतर आणि सचिनच्या शरीराची सुमारे २०० विविध मोजमापे घेऊन साकारण्यात आलेली ही प्रतिमा आता या संग्रहालयात शेन वॉर्न, डेव्हिड बेकहॅम, टायगर वूड्स अशा जगभरातील सरस क्रीडापटूंसह या संग्रहालयाची शोभा वाढविणार आहे. सचिनही ही प्रतिमा साकारण्यासाठी तब्बल तीन तास उभा राहिलेला आहे. मोहालीत सचिनने जेव्हा कसोटीतील धावांचा विश्वविक्रम केला तेव्हाची त्याची ती ‘पोझ’ या प्रतिमेत साकारण्यात आली आहे.
ही हुबेहुब प्रतिमा पाहिल्यानंतर खुद्द सचिनही भुलला. सचिन या प्रतिमेची स्तुती करताना म्हणाला की, ‘हा पुतळा श्वास घेत नाही एवढेच, अन्यथा माझ्यात आणि त्याच्यात फारसा फरक नाही. जेव्हा मी ही प्रतिमा प्रथम पाहिली तेव्हा प्रतिक्रिया व्यक्त करणेही मला अशक्य झाले होते. माझे कुटुंबीयदेखील खुश आहेत. माझा मुलगा अर्जुन तर पुतळ्याच्या हातातील बॅट घेऊन खेळण्याचीच इच्छा व्यक्त करीत होता. पण मी त्याला जवळ न जाण्याचा सल्ला दिला.’
सचिन म्हणाला की, मी १५ वर्षांचा असताना एका स्थानिक क्लबबरोबर इंग्लंड दौऱ्यावर आलो होतो. त्यानंतर आजतागायत मला तुसाँ संग्रहालयात माझ्या व्यस्त क्रिकेट कार्यक्रमामुळे जाता आलेले नाही. पण आता मी तेथे जाणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत असल्यामुळे पुतळ्याचे अनावरण मुंबईत झाले मात्र ही स्पर्धा संपल्यानंतर मी या संग्रहालयाला जरूर भेट देईन.’
या संग्रहालयात इतर खेळाडूंच्या पुतळ्यांपैकी कुणाच्या पुतळ्याजवळ तुझी प्रतिमा उभी करणे आवडेल, यावर सचिन उत्तरला की, ‘असा विचार मी केलेला नाही. माझा पुतळा कुणाच्याही शेजारी उभा केला तरी माझी काहीही हरकत नसेल.’
तुझा पुतळा याआधीच उभारायला जायला हवा होता, असे वाटते का, या प्रश्नाचा चेंडू सचिनने तडक सीमापार धाडत, ते ठरविण्याचा अधिकार माझा नाही, असे स्पष्टपणे सांगितले. ‘माझे काम क्रिकेट खेळणे आहे, माझा पुतळा उभारण्याचा निर्णय तुसाँ संग्रहालयाचा आहे,’ असेही सचिन म्हणाला.
‘आज वडील असते तर त्यांना नक्कीच खूप अभिमान वाटला असता, असे सांगून सचिनने वडिलांची उणीव नेहमीच आपल्याला जाणवते,’ असे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या प्रतिमेची पोझ वडिलांना आदरांजली वाहतानाची आहे, तेव्हा याक्षणी त्यांची आठवण येते का, यावर सचिनने उपरोक्त उत्तर दिले.
वाढदिवशी या पुतळ्याची लंडनमधील तुसाँ संग्रहालयात स्थापना करण्यात येणार आहे, हा बहुमान वाटतो का यावर सचिनने ‘होय’ असे उत्तर देतानाच शारजात माझ्या वाढदिवशीच ऑस्ट्रेलियाला हरवून आम्ही विजेतेपद पटकाविले होते, तोदेखील माझ्यादृष्टीने अविस्मरणीय दिवस होता, अशी आठवणही सांगितली.
भारतातही असे संग्रहालय असावे, अशी इच्छाही सचिनने बोलून दाखविली.