Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

टीकाकारांनी आपले काम करावे; मला सल्ला देऊ नये -हरभजनसिंग
नवी दिल्ली, १३ एप्रिल / पीटीआय

 

भारतीय उपखंडाबाहेर माझी कामगिरी फारशी चांगली होत नाही, अशी टीका सतत करणाऱ्यांनी त्यांचे काम करीत राहावे; मला काय करायला हवे याचा सल्ला देण्याच्या फंदात त्यांनी पडू नये, असे स्टार ऑफस्पिनर हरभजनसिंग याने म्हटले आहे. जे लोक त्याच्या परदेशातील कामगिरीबाबत कायम शंकाच उपस्थित करतात त्यांनी रेकॉर्ड बुक पाहायला हवे कारण मी वेस्ट इंडिज, इंग्लंडसारख्या देशांतही बळी मिळविले आहेत. मात्र असे असूनही काही लोकांना सतत माझ्या मागे लागायलाच आवडत असावे, असे न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक बळी मिळविणाऱ्या हरभजनसिंगने म्हटले आहे.
अशा टीकाकारांसाठी नव्हे तर देशासाठी खेळायला मला आवडते. जेव्हा देशासाठी चांगली कामगिरी करतो तेव्हा खूप समाधान वाटते, असे हरभजनसिंग म्हणतो. काहींना वाटतं मी हवेत चेंडू वेगाने सोडतो; पण गोलंदाजी करताना नेमके काय करायला हवे हे मला चांगलं कळतं, त्यांनी आपले सल्ले स्वत:जवळच ठेवावेत, असे भज्जी म्हणतो. उच्च स्तरावर खेळताना यश प्राप्त करण्यासाठी काय करायला हवे हे चांगलं कळतं. कसोटी क्रिकेटमध्ये मी ३३० विकेट्स घेतल्या असून, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० पेक्षा अधिक बळी मिळविले आहेत. त्यावरून बळी मिळविण्यासाठी व सामने जिंकण्यासाठी काय करायला हवे हे मला कळते हे त्यांनी ध्यानात घ्यायला हवे. न्यूझीलंडमधील आपल्या यशाने जालंधरच्या या युवकाने आपल्या टीकाकारांची तोंडं बंद तर केलीच शिवाय अनिल कुंबळेच्या अनुपस्थितीत संघाचा ज्येष्ठ व प्रमुख गोलंदाज म्हणून आपली ओळखही त्याने निर्माण केली आहे.
न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकण्याचा आनंद औरच असल्याचे हरभजनसिंग म्हणतो, शिवाय कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतही सर्वाधिक बळी मिळविल्याने वेगळीच मजा आली, असे भज्जी म्हणतो. अशीच कामगिरी सातत्याने करीत राहणे मला आवडेल. अनिल कुंबळे असताना जबाबदारी विभागली जात असे; पण आता त्याच्या अनुपस्थितीत मीच संघातला ज्येष्ठ गोलंदाज व ज्येष्ठ फिरकी गोलंदाज असल्याने माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे.
तीन कसोटी सामन्यांत १६ बळी तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच बळी मिळविणाऱ्या हरभजनसिंगने फलंदाजीतही आपली नवी ओळख निर्माण केली आहे. वेलिंग्टन येथील पहिल्या कसोटी ६० धावांची खेळी करणाऱ्या हरभजनसिंगने यापुढेही कठीण प्रसंगात अशा खेळी पुन: पुन्हा होतील, असा विश्वास त्याने दिला आहे.
कधी सामना वाचवायला तर कधी डावाची उभारणी करण्यासाठीच माझ्याकडून काही चांगल्या झाल्या असल्या तरी कसोटीत शतक झळकविण्याची माझी खूप इच्छा आहे. माझे सहकारीही तू शतक करायलाच हवेस, असे प्रोत्साहन देत असतात. थोडे अधिक लक्ष केंद्रित करून खेळ व योग्य फटक्यांची निवड केल्यास शतक ठोकणे अवघड नाही, असे ते मला सतत सांगत असतात. यात सचिन नेहमीच आघाडीवर असतो, असेही हरभजनसिंग म्हणतो. हरभजनसिंगला बऱ्याच वेळा तळाच्या फलंदाजांच्या साथीनेच खेळावे लागते. काही वेळा लक्ष्मण किंवा धोनीसह खेळण्याची संधी मिळते त्या वेळीच या दृष्टीने विचार करायला हवा, असे त्याला वाटते.
कसोटी क्रिकेटमध्ये चार अर्धशतकी खेळी करूनही आपण अद्याप शतक ठोकू शकलो नाही. कारण शतक ठोकण्याचा मला अनुभवच नाही, असे भज्जी म्हणतो. सचिन व अन्य फलंदाजांनी कितीतरी वेळा शतकी मजल ओलांडलेली असल्याने त्यांना तसा अनुभव आहे. मी जेव्हा पहिले शतक ठोकेन त्यानंतर मलाही शतक करण्याचा अनुभव काय असतो ते कळेल, असेही त्याने म्हटले आहे.