Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

१९ वर्षाखालील क्रिकेट भारताचा ऑस्ट्रेलियावर नऊ विकेट्सने विजय
हर्षल पटेलचे तीन बळी * अग्रवाल आणि बारोट यांची अर्धशतके
होबार्ट, १३ एप्रिल/ पीटीआय

 

ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षाखालील संघाचा पहिल्या तीन दिवसीय सामन्यात भारतीय संघाने ९ विकेट्सने पराभव करून मालिकेतील विजयी घौडदौड कायम राखली आहे. हर्षल पटेलने तीन बळी घेत विजयाचा पाया रचला तर मयांक अग्रवाल आणि अवि बोरोट यांनी शतकी भागीदारी करीत त्यावर कळस चढविला आहे. दोन तीन दिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना जिंकून दौऱ्यात निर्भेळ यश मिळविण्यासाठी प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत प्रयत्नशील असतील.
काल ४१७ धावांचा डोंगर उभारून भारतीय संघाने १११ धावांची आघाडी घेतली होती, त्यावेळीच भारत हा सामना हरणार नाही हे स्पष्ट झाले होते. कालच्या बिनबाद १ वरून पुढे खेळताना सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ ५०.१ षटकात २२८ धावाच करू शकला आणि विजयासाठी आवश्यक असलेल्या ११७ धावा भारताने फक्त १८ षटकात पूर्ण करीत विजय साकारला.
ऑस्ट्रेलियातर्फे मिशेल मार्श (१०९) वगळता एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मिशेलने ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने शतकी खेळी साकारली असली तरी त्याला दुसऱ्या बाजूने सुयोग्य साथ लाभली नाही आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारतातर्फे हर्षल पटेलने सर्वाधिक तीन बळी घेतले तर कुंदन सिंगला दोन बळी टिपता आले.
विजयासाठी आवश्यक असलेल्या ११७ धावांचा भारताने सहज पाठलाग केला असला तरी त्यांची सुरुवात मात्र फारशी चांगीली झाली नाही. पहिल्या डावात भेदक गोलंदाजी करणाऱ्या कोलमनने सलामीवीर मनन शर्माला (२) दुसऱ्याच षटकात तंबूत धाडीत भारताला पहिला धक्का दिला. पण त्यानंतचर फलंदाजीला आलेल्या अवि बारोटने (नाबाद ५२) सलामीवीर मयंक अग्रवालच्या (नाबाद ६२) साथीने शतकी भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक :-
ऑस्ट्रेलिया पहिला डाव :- ७ बाद ३०६ (डाव घोषित)
भारत पहिला डाव :- ७ बाद ४१७ (डाव घोषित)
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव :- ५०.१ षटकांत सर्वबाद २२८ (हर्षल पटेल ३२ धावांत ३ बळी)
भारत दुसरा डाव :- १८.४ षटकांत १ बाद १२० (मयंक अग्रवाल नाबाद ६२, अवि बारोट नाबाद ५२)