Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सानियाला अजिंक्यपद
फ्लोरीडा, १३ एप्रिल/ वृत्तसंस्था

 

भारतीय सम्राज्ञी सानिया मिर्झा आणि तिची सहकारी चिया जुंग-चुंग यांनी एम. पी. एस ग्रुप चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित झेक प्रजासत्ताकच्या क्वेता पेश्के आणि अमेरिेकेच्या लिसा रेमन्ड यांचा पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले आहे.
मिर्झा-चुंग जोडीने पेश्के-रेमन्ड जोडीचा ६-३, ४-६, १०-७ असा पराभव केला असून सानियाचे हे या वर्षांतील पहिले डब्यूटीए जेतेपद आहे. या विजयानंतर सानिया म्हणाली की, ह्लचुंगबरोबरची माझी ही दुसरीच स्पर्धा असली तरी आम्ही स्पर्धेपूर्वी चांगलाच सराव केला होता आणि त्याचेच फळ यावेळी आम्हाला मिळाले आहे. पेश्के-रेमन्ड जोडीकडे चांगलाच अनुभव असून त्या दोघी बऱ्याच काळापासून टेनिस खेळत आहेत. त्यामुळे त्यांना पराभूत करणे माझ्यासाठी स्वप्नच होते आणि ते आज सत्यात उतरले आहेह्व. या विजयाने सानियाने ११ हजार डॉलर्सची कमाई केली आहे. हे सानियाच्या कारकिर्दीतले आठवे जेतेपद आहे. तिने यापूर्वी ऑगस्ट २००७ मध्ये इटलीच्या मारा सॅन्ताजेलोबरोबर अमेरिकेत न्यू हाव्हेन हाडकोर्टचे जेतेपद पटकाविले होते.
यावेळी सानिया म्हणाली की, सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही चांगल्या लयीत होतो आणि त्यामुळेच सामन्याचचे जेतेपद पटकाविणे आम्हाला शक्य झाले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच मिर्झा-चुंग जोडीने आक्रमणावर अधिक भर दिला आणि याचाच फायदा त्यांना सामन्यादरम्यान झाला. पहिल्या सेटमध्ये मिर्झा-चुंग जोडीला सात ब्रेक पॉईंट मिळाले. पण फक्त तीनच ब्रेक पॉईंट त्यांना जिंकता आले आणि पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. पहिल्या सेट गमाविल्यानंतर मात्र अव्वल मानांकित पेश्के-रेमन्ड जोडीने दमदार पुनरागमन करीत दुसरा सेट ६-४ असा जिंकत मिर्झा-चुंग जोडीशी बरोबरी साधली. तिसरा सेटमध्ये दोन्हीही जोडय़ांनी अप्रतिम खेळ साकारला, पण विजयाचे माप मात्र मिर्झा-चुंग जोडीच्या पदरात पडले. पेश्के-रेमन्ड जोडीने मिर्झा-चुंग जोडीशी ७-७ अशी बरोबरी साधली. यावेळी पेश्के-रेमन्ड जोडी अमुभव पणाला लावून सामन्याला कलाटणी देतील असे वाटले होते. पण मिर्झा-चुंग जोडीने आक्रमक खेळ करीत त्यांनंतरचे तिन्हीही गेम्स जिंकत जेतेपदाला गवसणी घातली.

सानियाचे दुहेरीतील मानांकन सुधारले
एमपीएस ग्रुप टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत जेतेपद पटकावण्याची कामगिरी करणाऱ्या भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाचे दुहेरीत मानांकन सुधारले आहे. सानियाने डब्ल्यूटीए क्रमवारीत दुहेरीतील मानांकनात ९ स्थानांची प्रगती करताना ५९वे स्थान पटकावले आहे. झालेल्या क्रमवारीत ती १००व्या स्थानावर आहे.