Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आशियाई स्नूकर स्पर्धा : थायलंडच्या युतापोपकडून अग्रमानांकित युआन पराभूत
आदित्य देशपांडेचा चुरशीच्या लढतीनंतर पराभव
पुणे, १३ एप्रिल/प्रतिनिधी

 

थायलंडच्या युतापोप पाकपाज याने २१ वर्षांखालील गटाच्या आशियाई स्नूकर स्पर्धेत आज अग्रमानांकित ली युआन याच्यावर सनसनाटी विजय नोंदविला. त्याने हा सामना ६६-१६, ७०-१८, ६२-१४ असा जिंकला.
पीवायसी जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आजचा दिवस थायलंडच्या खेळाडूंचाच ठरला. त्यांच्या नोपोम सेगकोम याने आलमआरा अब्दुल रहेमान (कतार) याला पराभूत केले, तर पारापीन दांजिराकुल याने भारताच्या विवेक चोप्रा याला हरवत आपले आव्हान राखले.
भारताचे प्रतिनिधित्व करणारा पुण्याचा खेळाडू आदित्य देशपांडे याने चुरशीच्या लढतीनंतर श्रीलंकेच्या रायान सोमोरा याच्यावर निसटता विजय नोंदविला.
सेगकोम याने रहेमान याला ८०-१३, ६४-५, ३९-५०, ६४-२९ असे नमविले. दांजिराकुल याने चोप्रा याचा संघर्षपूर्ण लढतीनंतर ५६-१६, ५१-५९, ३०-५२, ६०-८, ७०-३० असा पराभव केला.
युतापोप याने युआनवर मात करताना संयमपूर्ण खेळाचा प्रत्यय घडविला.
स्थानिक खेळाडू आदित्य देशपांडे याची ही पहिलीच आशियाई स्पर्धा आहे. त्याने आज सोमोरास ४६-१०, ५०-४९, ४८-४७ असे पराभूत केले. दुसऱ्या फ्रेममध्ये तो ३७-४९ असा पिछाडीवर होता. तेथून त्याने अप्रतिम कौशल्य दाखवत ही फ्रेम जिंकली. तिसऱ्या फ्रेममध्येही तो ३०-४७ असा पिछाडीवर होता. तेथून त्याने सलग १८ गुण घेत विजयश्री खेचून आणली.
पहिल्या दिवशी द्वितीय मानांकित तानावतला हरविणाऱ्या पुष्पींदरसिंग याला आज कतारच्या महाना नासिर ओबेदल्ली याच्याकडून पराभवाचा धक्का बसला. ओबेदल्ली याने ही लढत ४७-३९, ६५-४६, ६९-१९ अशी जिंकली. ओबेदल्ली हा जागतिक बिलियर्ड्स विजेता माईक रसेल याच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहे.