Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

कुठल्याही क्रमांकावर फलंदाजीस तयार - गंभीर
नवी दिल्ली, १३ एप्रिल/ पीटीआय

 

यजमान न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात मोलाची भूमिका बजावणारा धडाकेबाज फलंदाज गौतम गंभीर याने कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास आपण सज्ज आहोत असे सांगितले.
संघ व्यवस्थापन ज्या क्रमांकावर खेळावयास पाठवील तेथे उत्तम कामगिरी करुन दाखवीन असा आत्मविश्वास गंभीरने या वेळी व्यक्त केला. संघाच्या विजयाला हातभार लावू शकलात तर तुम्ही कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करता यामुळे काहीही फरक पडत नाही, असे गंभीरने या वेळी सांगितले. न्यूझीलंड दौऱ्याच्या व्यस्त वेळापत्रकानंतरही सतत व्यस्त असतोस यावर गंभीर म्हणाला, सतत व्यस्त राहणे हा या व्यवसायाचाच भाग आहे. क्रिकेट मध्ये विश्रांती हा शब्द नाही. प्रत्येक खेळाडूला त्याच्या कारकीर्दीत बहराचा काळ खूप कमी असतो. कमी वेळ मिळाला तरी चाहत्यांचे खूप प्रेम मिळते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरच विश्रांती घेईन.
किवींविरुद्धच्या मालिकेत मालिकावीर ठरलेला गंभीर दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठीही उत्साही आहे. या स्पर्धेत गंभीर दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाकडून तो खेळणार आहे.
आफ्रिकेत झालेल्या पहिल्या वहिल्या टे्वन्टी- २० च्या विश्वचषक स्पर्धेच्या आठवणींना गंभीरने उजाळा दिला. ही स्पर्धा कारकीर्दीला वळण देणारी ठरल्याचे तो म्हणाला. आफ्रिकेतच आता आयपीएल स्पर्धा असल्याने वेगळाच आनंद घेता येईल. डेअर डेव्हिल्सच्या संघासाठी विजेतेपद खेचून आणण्यासाठी पूर्ण योगदान देणार असल्याचे त्याने सांगितले.