Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

दक्षिण आफ्रिकेने ‘वन डे’ मालिका जिंकली
गिब्स, डीव्हिलियर्सची तुफान फटकेबाजी
पोर्ट एलिझाबेथ १३ एप्रिल / एएफपी

 

‘करो या मरो’ सामन्यात ऑस्ट्रेलियाला दणकेबाज सलामी मिळालेली असूनही त्यांचे फलंदाज एकामागून एक तंबूत परतत राहिले आणि दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका ३-१ अशी सहज खिशात टाकत अव्वल स्थान अबाधित राखले. सलामीवीर हर्शेल गिब्स आणि अ‍ॅल्बी डी’व्हिलियर्सची तुफान फटकेबाजी करीत दक्षिण आफ्रिकेला ३१७ धावांचा टप्पा ओलांडून दिला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॅडिन (७८) आणि मायकेल क्लार्क (५०) यांनी शतकी भागीदारी रचत संघाला चांगली सुरुवात करून दिली असली तरी त्यांना बाद करीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मजबूत केली आणि त्यानंतर अचूक गोलंदाजी करीत ६१ धावांनी विजय संपादन केला. दक्षिण आफ्रिकेतर्फे वेगवान गोलंदाज डेल स्टेनने सर्वाधिक चार बळी गारद केले.
मोक्याच्या क्षणी सूर गवसलेल्या हर्शेल गिब्स आणि अब्राहम डीव्हिलियर्स यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची धुलाई केली आणि यजमान दक्षिण आफ्रिकेला जॉर्जस पार्कवरील चौथ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात मजबूत स्थिती गाठून दिली.
गिब्सने (११०) काढलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ६ बाद ३१७ धावांची भक्कम मजल गाठून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३१८ धावांचे आव्हान दिले. पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ २-१ ने आघाडीवर आहे.
गिब्स आणि डीव्हिलियर्स (८४) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२३ चेंडूंवर १३६ धावांची भागीदारी करताना मैदानाच्या चोहीकडे फटकेबाजी केली.
मालिकेच्या दृष्टीने विजय गरजेचा असलेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पोर्ट एलिझाबेथच्या या छोटय़ा मैदानावर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याचा येथे फायदा होतो, हे लक्षात घेऊन पॉन्टिंगने तसा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चेंडू हळू येणाऱ्या या खेळपट्टीवर सुरुवातीला फटकेबाजी करता आली नाही पण, गिब्स आणि डीव्हिलियर्सने जम बसल्यानंतर तुफान फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या वेगाने वाढवली. गिब्सने ११६ चेंडूंवर काढलेल्या ११० धावांच्या खेळीत ९ चौकार व २ षटकारांचा समावेश होता तर डी’व्हिलियर्सने ६ चौकार व ३ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका :- ५० षटकात ६ बाद ३१७. ( हर्शेल गिब्स ११०, अब्राहम डी व्हिलियर्स ८४, हारवुड ५७ धावांत २ बळी) ऑस्ट्रेलिया :- ४५.५ षटकांत सर्वबाद २५६ (ब्रॅड हॅडिन ७८, स्टेन ४४ धावांत ४ बळी, मर्व ४६ धावांत ३ बळी).