Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

ब्रासाऐवजी हरेंद्रलाच सर्वाधिकार द्यावेत -भास्करन
नवी दिल्ली, १३ एप्रिल / पी. टी. आय.

 

तब्बल १३ वर्षांनंतर अझलन शाह हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचे कौतुक करणाऱ्या ऑलिम्पियन वासुदेवन भास्करन यांनी आता हरेंद्रसिंग यालाच प्रशिक्षकाचे सर्वाधिकार द्यावेत, असे म्हटले आहे. २००६ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला ११ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते त्या वेळी संघाचे प्रशिक्षक असणारे भास्करन म्हणतात २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्सपर्यंत आता हरेंद्रसिंग याच्यावरच संघाची संपूर्ण जबाबदारी सोडायला हवी.
अझलन शाह हॉकी स्पर्धेतील भारताचे यश हे संघाचे प्रमुख प्रशिक्षक असणाऱ्या हरेंद्रच्या सकारात्मक विचारसरणीचे यश आहे. त्यामुळेच संघाचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून परदेशी जोस ब्रासा यांची नियुक्ती करण्याऐवजी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकपर्यंत हरेंद्र यालाच त्याची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी द्यायला हवी. चांगल्या निकालांसाठी परदेशी प्रशिक्षकच हवेत, असे नाही असेही भास्करन म्हणाले. शिवाय प्रशिक्षक हे दीर्घकाळासाठी नेमायला हवेत, असेही त्यांनी म्हटले आहे. रिक चार्ल्सवर्थ यांनी आपल्याला १० वर्षे देण्याची मागणी केली होती व आपणही त्या मताशी सहमत आहोत, असे भास्करन म्हणतात. भारतीय संघासाठी चांगले निकाल देण्यासाठी युवा आणि आधुनिक विचारसरणीचे प्रशिक्षक हवेत. हरेंद्रने आपल्यासह सहायक प्रशिक्षक म्हणून काम केलेले असून, तो नेहमी सकारात्मक विचार करतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
स्पेनचे ब्रासा यांची भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून वर्णी लागणार आहे. हॉकी महासंघाच्या हंगामी समितीने ब्रासा यांना प्रशिक्षकपदासाठी अंतिम प्रस्ताव दिलेला असून, येत्या महिन्याभरातच त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आश्चर्य म्हणजे स्वत: हरेंद्र यांनीही संघासाठी परदेशी प्रशिक्षक हवा, असा आग्रह धरला होता आणि त्यांच्यासह काम करण्यात आपल्याला काहीही अडचण नाही, असे म्हटले आहे. भास्करन यांची विचारसरणी मात्र थोडी वेगळी आहे. पुढील वर्षी होणारी राष्ट्रकुल स्पर्धा, विश्वचषक स्पर्धा व पुढील महिन्यातील आशिया चषक स्पर्धा या पाश्र्वभूमीवर संघासाठी नवीन प्रशिक्षक येणे हानीकारक ठरू शकते, असे त्यांचे मत आहे. नवीन प्रशिक्षकाला सर्व सुरळीत करण्यासाठी किमान दोन र्वष लागतात व त्यामुळेच नवीन प्रशिक्षकाची नेमणूक ही गोष्ट भारतीय हॉकीसाठी हानीकारक ठरू शकेल, असे भास्करन म्हणतात.