Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पुन्हा ‘प्रभारी’ची शिक्षा
ठाणे/प्रतिनिधी :
कंत्राटी मदतनीसांची नेमणूक, पालिका शाळांच्या इमारती भाडय़ाने देणे, संगणक खरेदी, गणवेश खरेदी आदी विविध घोटाळ्यांमुळे बदनामीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शिक्षण मंडळाला वाचविण्यासाठी आणि जनमानसातील त्याची प्रतिमा सुधारण्यासाठी सक्षम शिक्षणाधिकाऱ्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र प्रभारी अधिकाऱ्यांवरच शिक्षण मंडळाची बोळवण

 

केली जात आहे.
कर्तव्यकठोर शिक्षणाधिकाऱ्याअभावी ठाणे महापालिका शिक्षण मंडळाच्या कारभाराचे वाभाडे निघत आहेत. यापूर्वीचे शिक्षणाधिकारी चंद्रहास मैंदाड गतवर्षी ऑक्टोबरमध्ये निवृत्त झाले. त्यानंतर नोव्हेंबर २००८ पासून शिक्षण मंडळात शिक्षणाधिकारीच नाही. कधी पर्यवेक्षकाकडे, तर कधी गटशिक्षण अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी सोपविली जात होती. मध्यंतरी कंत्राटी मदतनीसांच्या नेमणुकीतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिक्षण मंडळातच काय, पालिकेतही खळबळ उडाली. शिक्षण मंडळ स्वायत्त असले तरी पालिका आयुक्तांनी त्यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती शिक्षण मंडळ अध्यक्ष सुरेश गडा यांनी केल्यानंतर पालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी कंत्राटी मदतनीस नेमणूक घोटाळ्यातील दोषींवर कारवाई केली. तसेच शिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी कारभार गटशिक्षणाधिकारी बेलदार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. बेलदार यांनी या घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच त्यांच्याकडील हा पदभार काढून घेण्यात आला आहे.
हा पदभार पालिका उपायुक्त सुधीर भातणकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुळातच भातणकर यांची पालिकेतील कारकीर्द वादग्रस्त असून शिक्षण विभागाशी त्यांचा यापूर्वी कधीच संबंध आलेला नाही. तरीही त्यांच्याकडे शिक्षण मंडळाचा कारभार सोपविण्यामागील गौडबंगाल काय? असा सवाल रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने केला आहे. याच संघटनेने कंत्राटी मदतनीस घोटाळा उघडकीस आणला असून या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या दोन कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठीच भातणकरांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
मुळातच मैंदाड सेवानिवृत्त झाल्यानंतर शिक्षणाधिकारी नियुक्तीसाठी पालिकेने हालचाल करायला हवी होती. शासनाकडे पाठपुरावा करून प्रतिनियुक्तीवरील शिक्षणाधिकारी वा जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांकडे तरी हा कारभार सोपवायला हवा होता. मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करताना भातणकरांची वर्णी का लावण्यात आली, असा सवालही फेडरेशनने उपस्थित केला असून पालिका मुख्यालय उपायुक्त व्यंकटेश भट यांनी भातणकरांच्या नियुक्तीचे आदेश त्वरित मागे घेतले नाहीत तर त्यांच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही फेडरेशनने दिला आहे.