Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्रचारफेऱ्यांनी गाजविला सुट्टीचा दिवस
कल्याण/प्रतिनिधी

काल रविवार असल्याने मतदार नागरिक घरी असतात, म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघातील

 

उमेदवारांनी प्रचार फेऱ्या काढून उमेदवारांच्या भेटीगाठी घेतल्या.
युतीचे उमेदवार आनंद परांजपे यांची काल डोंबिवली पश्चिमेस सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेली प्रचारफेरी रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती. ढोलताशे, भगव्या टोप्या, रथावर आरूढ झालेले पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आनंद परांजपे मतदारांना आवाहन करताना दिसत होते. उन्हाचा चटका बसत असूनही कार्यकर्ते पाणी पीत, सावलीचा आडोसा घेत प्रचार करताना दिसत होते. काँग्रेस आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांनी कल्याण ग्रामीण, शहरी भागात प्रचार फेऱ्या काढल्या. कार्यकर्ते, नगरसेवकांच्या लवाजम्यात डावखरे प्रचार करीत आहेत. रिजन्सीमधील निवासस्थान ते कल्याण पूर्व कार्यालय येथे कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांचा राबता आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार जगन्नाथ पाटील यांनी कल्याण पश्चिमेतील अनेक सामाजिक संस्था, पदाधिकाऱ्यांच्या सभा घेतल्या. मनसेच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ येथे प्रचार फेऱ्या काढल्या. प्रचार फेरी सुरू असतानाच कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रसिद्धीपत्रके वाटत होते. निवडून आल्यानंतर मी कोणती विकासाची कामे करणार, हाच सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा मुद्दा सुरू असल्याचे दिसून येत होते.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मतदार भेटणार म्हणून मोठय़ा उत्सुकतेने रस्त्यावर उतरलेले उमेदवार उन्हाचे चटके खात असताना मतदार मात्र घरातील खिडकीतून, गच्चीतून आपल्या उमेदवारांचे दर्शन घेत आणि हळूच दरवाजावर लटकवलेले प्रचारपत्रक काढून घेत होते.