Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उद्योगधंद्यासह भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देणार - सुरेश टावरे
भिवंडी/वार्ताहर :
भिवंडी मतदारसंघात नवनवीन उद्योग यावेत व त्यात स्थानिक मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहील, असे काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांनी

 

वाडे येथे झालेल्या सभेत सांगितले.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, पिंजाळ धरणाचा प्रश्न अनिर्णित आहे. शासनाकडून भरीव अर्थसहाय्य मिळवून पिंजाळ धरणाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. या धरणातील पाण्यामुळे स्थानिकांना पिण्याचे पाणी मिळेल व त्याचा शेतीसाठी उपयोग होईल, असा माझा प्रयत्न राहणार आहे. ग्रामीण जनतेला आजपर्यंत कुणी वाली नव्हता. यापुढे त्यांना न्याय देण्यास आपण प्राधान्य देऊ, असे टावरे म्हणाले.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांचेही भाषण झाले. यावेळी आघाडीचे नेते योगेश पाटील, गजानन पाटील, राम यादव, हरिभाऊ पाटील, इरफान भुरे आदी उपस्थित होते.
टिटवाळ्यातही सभा
अभ्यासू खासदाराअभावी ठाणे जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कल्याण नगर रेल्वेमार्गाचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरेश टावरे यांना संसदेत पाठवा, असे आवाहन आमदार गोटीराम पवार यांनी टिटवाळा येथील सभेत केले. यावेळी सुरेश टावरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष पिसाळ, जिल्हा सरचिटणीस किसन तारमळे, रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष दामोदर शेलार, प्रकाश भांगरज आदी उपस्थित होते.
आमदार पवार पुढे म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारच देशाला स्थिर सरकार देऊ शकते, याचा प्रत्यय गेल्या गत पाच वर्षांंत आलेला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारांना काम आणि तळागाळातील माणसांचा सर्वागीण विकास साधावा, या भूमिकेतून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार प्रयत्न करीत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सुरेश टावरे हेच मार्गी लावतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सुभाष पिसाळ म्हणाले, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने देशाला महासत्ता बनविण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. त्या ध्येयपूर्तीसाठीच आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुरेश टावरे, तारमळे यांचीही भाषणे झाली. यावेळी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मुंब्रा येथील मुस्लिम समाज शिवसेनेच्याच पाठीशी - एकनाथ शिंदे
ठाणे/प्रतिनिधी

आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांना समाजवादी पार्टीने पाठिंबा जाहीर केला असला, तरी आनंद परांजपे यांच्या मताधिक्यावर कोणताच परिणाम होणार नसून, मुंब्रा येथील बहुसंख्य मुस्लिम समाज शिवसेनेच्या पाठीशी असल्याने ते विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
शिंदे म्हणाले की, मुंब्रा विभागाचा विकास महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेने केला आहे. दिवाबत्ती, रस्ते, पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपूल इ. मूलभूत नागरी सुविधा आम्ही पुरविल्या आहेत. मुंब्रा विभागातील मतदार सुजाण असून, विकास कामे करणाऱ्या शिवसेनेच्याच पाठीशी ते उभे राहतील, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
प्रीतम रजपूत यांचा शिवसेनेत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहर उपाध्यक्ष प्रीतम रजपूत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ठाणे मतदारसंघाचे युतीचे उमेदवार विजय चौगुले यांच्या प्रचारार्थ शुभंकरोती हॉल येथे युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी रजपूत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करून भगवा ध्वज हाती घेतला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रीतम रजपूत म्हणाले की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये मी सक्रीय काम करीत होतो, मात्र पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळलो होतो. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे सूत्र मला आवडल्यानेच मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
बालेकिल्ला फोडण्यात मी तज्ज्ञ - वसंत डावखरे
कल्याण/प्रतिनिधी -
कल्याण- डोंबिवली हा शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र बालेकिल्ला कसा फोडायचा याचे चांगले तंत्र मला अवगत आहे आणि ते काम मी करणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी, काँग्रेस आणि रिपब्लिकन आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांनी व्यक्त केला.
डावखरे पुढे म्हणाले, कल्याण- डोंबिवलीतील सत्ता युतीने नेहमी दुसऱ्यांच्या कुबडय़ांचा आधार घेऊन जिंकल्या. त्यांची स्वत:ची अशी काहीही ताकद नव्हती. कल्याण रेल्वे जंक्शनसाठी प्रयत्न, डोंबिवली रेल्वे स्टेशनचे अत्याधुनिकीकरण, कल्याण आणि ठाकुर्लीच्या दरम्यान नवे रेल्वे स्थानक, या भागातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठय़ाची वाढीव सुविधा उपलब्ध करणे, या भागातील नागरी विकासाचे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी येथील पालिकांना केंद्र व राज्याचा निधी उपलब्ध करून देणे हे मुद्दे घेऊन मी निवडणुकीत उतरलो आहे, असे डावखरे म्हणाले. 'मातोश्री'शी चांगले संबंध ठेवल्याचा फायदा होईल का, या प्रश्नावर डावखरे म्हणाले, राजकीय आणि व्यक्तिगत संबंधांची मी राजकारण करताना गल्लत करत नाही. सर्व पक्षांतील नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी माझे चांगले संबंध आहेत.
शरद पवार हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या आदेशाप्रमाणे मी काम करत असून पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बळावर विजयश्री खेचून आणणार आहे. मनसे उमेदवारामुळे तुम्हाला फायदा होईल का, या प्रश्नावर ते म्हणाले, फायदा- तोटा मी कधीच पाहात नाही, विजयी होणे एवढेच माझे ध्येय आहे.
भिवंडी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार - आर. आर. पाटील
भिवंडी/वार्ताहर

भिवंडी मतदारसंघातून समाजवादी पार्टीतर्फे आर. आर. तथा रघुनाथ रतन पाटील निवडणुकीच्या रिंगणात असून, एका बाजूला हिमालयाएवढा प्रचंड राजकीय अनुभव असलेला उमेदवार, तर त्यांच्या तुलनेत दुसऱ्या बाजूला काही अनुभवशून्य उमेदवार समोरासमोर आलेले आहेत. निवडणूक आल्यानंतर संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याची ग्वाही पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडी कापड उद्योग नगरी आहे. गेली अनेक वर्षे मी या उद्योगांशी निगडित आहे. वस्रोद्योग खाते केंद्र शासनाच्या अखत्यारित येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उद्योगाला मंदीचे ग्रह लागलेले आहे. कापड उद्योगाच्या भरभराटीसाठी तसेच या क्षेत्रातील कामगारांच्या सर्वांगीण उन्नतीकडे आजपर्यंत आपण लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.
कापड उद्योग सुरळीत चालण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत करणे, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला चालना देणे, शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांकरिता नवीन पाइपलाइन टाकणे, घरकुल योजना, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यावर आपला भर राहील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
‘जनताच केंद्र व राज्यातील सरकारे खाली खेचणार’
डोंबिवली/प्रतिनिधी-
या निवडणुकीत आपण दोन लाख मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास कल्याण लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी प्रीमिअर कॉलनी येथे आयोजित प्रचारसभेत व्यक्त केला.
या सभेला जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे, माजी मंत्री साबीर शेख, शहरप्रमुख शरद गंभीरराव, नगरसेवक रमेश म्हात्रे, पुंडलिक म्हात्रे उपस्थित होते.
परांजपे म्हणाले, वडील प्रकाश परांजपे यांनी कल्याण भागातून २२ हजारांचे मताधिक्य घेतले होते. यावेळी मात्र ‘बापसे बेटा सवाई’ ही किमया येथील मतदार जनताच करून दाखवेल. जिल्हाप्रमुख शिंदे म्हणाले, केंद्रात व राज्यात जेव्हा युतीचे सरकार होते, त्यावेळी कोठेही दंगली झाल्या नाहीत. जनतेच्या हिताच्या कामांना त्यावेळी प्राधान्य देत होते. त्यानंतर आलेल्या काँग्रेस आघाडी सरकारने विकासकामे सोडाच, पण जनतेच्या मतांचा आदर केलेला नाही. त्यामुळे यावेळी जनताच केंद्र व राज्यातील सरकारे खाली खेचणार आहे. कल्याण विधानसभा मतदारसंघातील चारही युतीचे उमेदवार विजयी होतील. काँग्रेस आघाडीने जनतेकडे मत मागण्याचा अधिकार गमावला आहे. आनंद परांजपे कमी वेळेत लोकप्रिय झालेले उमेदवार आहेत, त्यांना कोठूनही उमेदवारी दिली तरी ते निवडून येतील, असे त्यांचे काम व व्यक्तिमत्त्व आहे.
उपस्थित अन्य मान्यवरांची यावेळी भाषणे झाली.