Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

चार मतदारसंघांत ७५ उमेदवार रिंगणात!
ठाणे/प्रतिनिधी :
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतून एकूण २७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, आता सर्व मिळून ७५ उमेदवार लोकसभा निवडणूक रिंगणात आपले नशीब अजमावणार असल्याचे स्पष्ट

 

झाले.
ठाणे मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे तब्बल ३० उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण ३८ पैकी आठ जणांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून २१ उमेदवार ही निवडणूक लढविणार आहेत.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून एकूण २१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतल्याने तेथे १६ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत, तर पालघर लोकसभा मतदारसंघातून प्रारंभी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या १२ पैकी चौघा जणांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने ठाणे जिल्ह्यातील चारपैकी पालघरमधून सर्वात कमी म्हणजे आठ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या चारही मतदारसंघांत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असून, त्यात आघाडी, युती, बसपा, मनसे या प्रमुख पक्षांत बहुरंगी लढती होतील अशी चिन्हे आहेत.
वसई, विरार, बोईसर, नालासोपारा हा पट्टा यावेळी पालघर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाल्याने या भागात राजकीय प्रभाव असलेल्या वसई विकास आघाडीचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरतो की माघार घेतो, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते, परंतु आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांची उमेदवारी कायम असल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीची चुरस वाढली असून, वसई ते बोईसर पट्टय़ातील मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा जाणकारांचा होरा आहे.
एका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात १६ उमेदवार व त्यांची निवडणूक चिन्हे सामावून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे ठाणे (३० उमेदवार) आणि कल्याण (२१ उमेदवार) लोकसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांत एकाच वेळी दोन मतदान यंत्रांचा वापर करावा लागेल, असे सांगण्यात आले.