Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

रविवारचा दिवस प्रचाराचा.. आनंद परांजपे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या.

जगण्यासाठी शुद्ध हवा मिळेल का?
घोडबंदरवरील रहिवाशांचा आक्रोश

ठाणे/प्रतिनिधी

घोडबंदर रोडवर दुतर्फा नवनवीन गृहनिर्माण संकुलांची उभारणी होत असताना निवासी भागातील कंपन्यांमधून सोडला जाणारा उग्र दर्प असणारा वायू, तसेच रसायनमिश्रित पाण्यामुळे ‘आम्हाला स्वच्छ व ताजी हवा मिळेल का?’ असा आक्रोश करण्याची वेळ त्या भागातील अनेक रहिवाशांवर आली आहे. घोडबंदर रोडवरील ‘हाईड पार्क’ तसेच लगतच्या काही सोसायटय़ांमधील रहिवासी एका कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे हैराण झाले होते. महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्राचे पर्यावरण खाते यांच्याकडे दाद मागूनही त्यांचा प्रश्न सुटला नव्हता. ‘ठाणे वृत्तान्त’ने या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर संबंधित यंत्रणा कामाला लागली. महापौर स्मिता इंदुलकर , आमदार संजय केळकर यांनीही या गंभीर समस्येत लक्ष घातल्याने हा प्रश्न मार्गी लागला.

पुन्हा ‘प्रभारी’ची शिक्षा
ठाणे/प्रतिनिधी :
कंत्राटी मदतनीसांची नेमणूक, पालिका शाळांच्या इमारती भाडय़ाने देणे, संगणक खरेदी, गणवेश खरेदी आदी विविध घोटाळ्यांमुळे बदनामीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शिक्षण मंडळाला वाचविण्यासाठी आणि जनमानसातील त्याची प्रतिमा सुधारण्यासाठी सक्षम शिक्षणाधिकाऱ्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र प्रभारी अधिकाऱ्यांवरच शिक्षण मंडळाची बोळवण केली जात आहे. कर्तव्यकठोर शिक्षणाधिकाऱ्याअभावी ठाणे महापालिका शिक्षण मंडळाच्या कारभाराचे वाभाडे निघत आहेत.

प्रचारफेऱ्यांनी गाजविला सुट्टीचा दिवस
कल्याण/प्रतिनिधी

काल रविवार असल्याने मतदार नागरिक घरी असतात, म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचार फेऱ्या काढून उमेदवारांच्या भेटीगाठी घेतल्या. युतीचे उमेदवार आनंद परांजपे यांची काल डोंबिवली पश्चिमेस सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेली प्रचारफेरी रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती. ढोलताशे, भगव्या टोप्या, रथावर आरूढ झालेले पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आनंद परांजपे मतदारांना आवाहन करताना दिसत होते.

उद्योगधंद्यासह भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देणार - सुरेश टावरे
भिवंडी/वार्ताहर :
भिवंडी मतदारसंघात नवनवीन उद्योग यावेत व त्यात स्थानिक मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहील, असे काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांनी वाडे येथे झालेल्या सभेत सांगितले. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, पिंजाळ धरणाचा प्रश्न अनिर्णित आहे. शासनाकडून भरीव अर्थसहाय्य मिळवून पिंजाळ धरणाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. या धरणातील पाण्यामुळे स्थानिकांना पिण्याचे पाणी मिळेल व त्याचा शेतीसाठी उपयोग होईल, असा माझा प्रयत्न राहणार आहे. ग्रामीण जनतेला आजपर्यंत कुणी वाली नव्हता. यापुढे त्यांना न्याय देण्यास आपण प्राधान्य देऊ, असे टावरे म्हणाले.

चार मतदारसंघांत ७५ उमेदवार रिंगणात!
ठाणे/प्रतिनिधी :
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतून एकूण २७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, आता सर्व मिळून ७५ उमेदवार लोकसभा निवडणूक रिंगणात आपले नशीब अजमावणार असल्याचे स्पष्ट झाले. ठाणे मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे तब्बल ३० उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण ३८ पैकी आठ जणांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून २१ उमेदवार ही निवडणूक लढविणार आहेत.

मुलांचा इमोशनल कोशंट वाढविण्यासाठी ‘भावनांक शिबीर’
प्रतिनिधी

मुलांचा आयक्यू म्हणजेच इंटेलिजन्ट कोशंट किती आणि कसा आहे याकडे अधिक लक्ष दिले जाते मात्र त्यांचा इमोशनल कोशंट (इक्यू) किंवा भावनांक वाढविणे हे मुलांच्या यशासाठी आवश्यक आहे. म्हणूनच इक्विप किड्स या इक्यू इन्स्टिटय़ूट फॉर चिल्ड्रेन संस्थेतर्फे १० ते १५ वयोगटातील मुलामुलींसाठी २७ एप्रिलपासून नावीन्यपूर्ण असे भावनांक शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

नववर्ष स्वागतयात्रेसाठी कायमस्वरूपी निधी उभारण्याचे आवाहन
ठाणे/ प्रतिनिधी

गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेसाठी कायमस्वरूपी निधी उभारण्यासाठी ठाण्यात राहणाऱ्या कलाकारांनी एखादा कार्यक्रम करावा, असे आवाहन कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे करण्यात आले. नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी झालेल्या उत्कृष्ट चित्ररथास तसेच छायाचित्रकारास पारितोषिक देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यातील मतदारांची संख्या घटली
ठाणे प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांत नव्याने करण्यात आलेल्या नोंदणीमध्ये २३ हजार ५७८ मतदारांची वाढ झाली असली, तरी कागदपत्रांच्या अभावी ३० हजार ३२८ मतदार कमी झाले आहेत, त्यामुळे एकूण ६३ लाख ७९ हजार ३३३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघात १ एप्रिलपर्यंत नवीन नाव नोंदणी केली जात होती. त्यानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुरवणी यादीत २३ हजार ५७८ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, तर कागदपत्रांच्या करण्यात आलेल्या छाननीनुसार ३० हजार ३२८ मतदार कमी झाले आहेत. नवीन नोंदणीनंतर पूर्वीच्या ६३ लाख ८६ हजार ८३ मतदारांमध्ये वाढ होण्याऐवजी सहा हजार ७५० मतदार कमी झाले आहेत. यामुळे मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाही.

सावरकरांवरील पुस्तकाचे आज प्रकाशन
ठाणे/प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त ठाण्यातील ‘व्यास क्रिएशन’ या संस्थेतर्फे ‘धगधगते यज्ञकुंड : वि. दा. सावरकर’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार, १४ एप्रिल रोजी केले जाणार आहे. श्री. वा. नेर्लेकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. सनक्रेस्ट सोसायटी, ग्रीनरोड, लुईसवाडी, ठाणे (प) येथे प्रकाशन सोहळा असून, त्यात सावरकरप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लुईसवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीराम बोरकर यांनी केले आहे.

फोटो सर्कल सोसायटीचे ‘स्पंदन’
ठाणे/प्रतिनिधी :
फोटो सर्कल सोसायटीतर्फे आयोजित ‘स्पंदन २००९’ छायाचित्र प्रदर्शन मंगळवार, १४ एप्रिलपासून ठाणे कलाभवनात सुरू होत आहे. फोटो सर्कल सोसायटीच्या सभासदांनी प्रत्येकी एक विषय घेऊन आठ छायाचित्रांची मालिका प्रदर्शनात मांडली आहे. १६ छायाचित्रकारांनी या प्रदर्शनात भाग घेतला आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ‘लोकसत्ता’चे उपनिवासी संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ठाण्याचे आयुक्त नंदकुमार जंत्रे उपस्थित राहणार आहेत. १४ ते १९ एप्रिलपर्यंत सुरू असणारे हे प्रदर्शन कापुरबावडी नाका येथील बिग बाजारजवळील ठाणे कलाभवनात भरविण्यात येत आहे.

अभिनय व सुसंवाद कार्यशाळा
ठाणे/प्रतिनिधी

अभिनय या नव्या माध्यमाची ओळख करून घेता घेता स्वत:ची नवी ओळख करून घेण्यासाठी आयपीएच आणि आर्टिव्हिटीजतर्फे दहा दिवसांचे अभिनय आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन १५ ते २५ एप्रिल दरम्यान सायंकाळी ५ ते ८ दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सचिन गावकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच २३ ते २५ एप्रिल दरम्यान ११ ते १४ वयाच्या मुलांसाठी गंमतशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात चित्रकला, स्वत:चा टी शर्ट रंगविणे, समूहचित्र (कोलाज), घरच्या दारासाठी, वैशिष्टय़पूर्ण पाटी आदींचा समावेश आहे. या गंमतशाळेला आयपीएच संघटना साहित्य पुरविणार आहे. ही गंमतशाळा फक्त २४ मुलांसाठीच असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. संपर्क- ९८७००१५६९४

कल्याण-डोंबिवलीत कमी दाबाने पाणीपुरवठा
कल्याण/प्रतिनिधी

मोहने उदंचन केंद्र येथे पालिकेची कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणारी एक जलवाहिनी दबली गेल्याने ही वाहिनी दुरुस्त करण्याचे काम पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. पण तात्काळ हे काम पूर्ण होणार नसल्याने शुक्रवापर्यंत शहराच्या अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सहाव्या वेतन आयोगासाठी शिक्षक सेनेचा आंदोलनाचा इशारा
ठाणे / प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगाने शिक्षकांना दिलेली वेतनश्रेणी हकीम समितीने अमान्य करून शिक्षकांवर प्रचंड अन्याय केला आहे. शिक्षकांना सध्या मिळणारा ३० टक्के घरभाडे भत्ता हकीम समितीने कमी केल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष असून, यात शासनाने सुधारणा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने दिला आहे. ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचा मेळावा प्रांताध्यक्ष सुनील चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाला. मेळाव्यास शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे उपस्थित होते. शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील फापळे यांनी ठाणे पालिकेतील शिक्षकांना सहावा वेतन आयोग देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. तर शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाने दिलेली वेतनश्रेणी हकीम समितीने अमान्य केल्याचे सांगून शिक्षकांची वेतनश्रेणी, ग्रेड पे, भत्ते नाकारणाऱ्या शासनाचा निषेध केला. सरकारने शिक्षकांच्या मागण्या मान्य न केल्यास गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा चिटणीस यांनी दिला. सहावा वेतन आयोग शासनाने नाकारल्यास जून महिन्यात शाळा सुरू होताच राज्यव्यापी आंदोलन मुंबईतील आझाद मैदानातून सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यास प्रत्येक तालुक्यातील शिक्षक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन रामदास भाईक व बाबाजी फापळे यांनी केले.