Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
व्यक्तिवेध

आचार्य विनोबा भावे यांच्या लाडक्या मानसपुत्रांपैकी एक रमाकांत आत्माराम पाटील यांचे गेल्या शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले. व्रत म्हणून स्वीकारलेले सवरेदयी तत्त्व त्यांनी संपूर्ण आयुष्यभर पाळले. रमाकांत पाटील मालवण तालुक्यातील पोईप गावचे. त्यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी मालवण येथे झाला. त्यांचे बालपण पोईप येथेच गेले. पोईप येथे शिक्षणाची व्यवस्था इयत्ता सातवीपर्यंतच होती. त्यामुळे पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा

 

तालुक्याच्या गावी - मालवण येथे काही मित्रांसोबत एका खोलीत राहून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडते विषय होते. मालवणमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना मोठा आधार होता तो त्यांच्या गवाणकर आजीचा. आजीच्या खानावळीत त्यांची भोजनाची व्यवस्था होती. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. मॅट्रिकला असताना ते साने गुरुजींच्या विचाराने भारावले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुडाळमधील खादी ग्रामोद्योगमध्ये ते नोकरीला लागले खरे, पण फार काळ ते नोकरीमध्ये अडकले नाहीत. त्याच काळात काकासाहेब कालेलकर यांनी आचार्य विनोबा भावे यांच्यावर लिहिलेले एक पुस्तक त्यांच्या वाचनात आले आणि ते विनोबांचे निस्सीम भक्त झाले. १९५५च्या सुमारास नोकरीला रामराम ठोकून ते थेट आचार्य विनोबा भावे यांच्याकडे गेले. त्या वेळी विनोबा पंजाबमध्ये होते. रमाकांत पाटील तेथे पोहोचले आणि एक व्रतस्थ सवरेदयी बनले. कोकणापासून ते उत्तर भारतातील विविध ठिकाणांपर्यंत त्यांनी विनोबा भावे यांच्याबरोबर संचार केला. विनोबाजींच्या पदयात्रेचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी रमाकांत पाटील, निर्मला देशपांडे आदींवर होती. ती त्यांनी लीलया पेलली. भूदान चळवळीमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्याचबरोबर गोहत्या बंदी, ग्रामदान, खादी ग्रामोद्योग आदी चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध होता. कालांतराने ते मुंबईत आले. मुंबईत सातरस्ता येथील शांतीनगर येथे ते वास्तव्यास होते. तेथूनच ते सवरेदयाचे काम करू लागले. मुंबई सवरेदय मंडळाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. मुंबईतून सुरू झालेल्या ‘सवरेदय साधना’ पत्रिकेचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. अविवाहित असलेल्या रमाकांत पाटील यांनी सवरेदयाप्रमाणेच पत्रकारितेचाही वसा घेतला. ‘लोकसत्ता’, ‘नवशक्ति’, ‘केसरी’, ‘लोकमान्य’, ‘लोकमित्र’, ‘नागपूर पत्रिका’, ‘सागर’ आदी वृत्तपत्रांतून त्यांनी लेखन केले. त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये सुमारे ४० हजार लेख लिहिले. दै. ‘नवशक्ति’मध्ये तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ त्यांचे ‘सहज संवाद’ हे सदर गाजत होते. ‘मधुगंगा’ आणि ‘भैरवी’ हे त्यांचे काव्यसंग्रह, तर ‘विनोबा एक युगयात्री’ आणि मामा क्षीरसागर यांच्या जीवनावर ‘जीवन त्यांना कळले’ ही त्यांची पुस्तके. सावंतवाडी येथून काही काळ त्यांनी भूदान चळवळीला वाहिलेले वृत्तपत्रही चालविले. दोन वेगवेगळ्या वादंगांमध्ये अडकलेल्या बाबा आमटे आणि वसंत नारगोळकर यांना रमाकांत पाटील यांची फार मदत झाली होती, याची आठवण आजही सांगितली जाते. महाराष्ट्रभर हे वादंग गाजत असताना पाटील यांनी अशी मध्यस्थी केली की कोर्टकचेऱ्यांपर्यंत गोष्टी न जाता दोन्ही पक्षांची समजूत पटून हे वादंग मिटले. त्यांच्या प्रेमळ मुत्सद्देगिरीची आणखी एक आठवण बद्रीनारायण गडोदिया यांच्याविषयीची. गोहत्या बंदीचा कायदा सरकारने करावा यासाठी गडोदिया उपोषणास बसले होते. त्यांनी उपोषण सोडावे म्हणून इंदिरा गांधींपासून अनेकांनी प्रयत्न केले, पण व्यर्थ. अखेर रमाकांत पाटील यांनी मन वळवले तेव्हा गडोदियांनी उपोषण मागे घेतले. लहानपणापासूनच पाटील एकपाठी होते. ज्ञानेश्वरी, गीताई त्यांना मुखोद्गत होती. एखादा विषय हाती घेतला की त्याची तड लावल्याशिवाय ते स्वस्थ बसत नसत. माजी केंद्रीय मंत्री स. का. पाटील हे त्यांचे काका, पण या राजकीय जवळिकीचा त्यांनी स्वतच्या फायद्यासाठी कधीही उपयोग करून घेतला नाही. २४ नोव्हेंबर २००७ रोजी त्यांना घशाचा अर्धागवायू झाला आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती बिघडली. मात्र अखेपर्यंत त्यांचे लेखन सुरूच होते. १० एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आणि सवरेदयातील आणखी एक तारा निखळला.