Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

निवडणुकीत दोन विचारसरणीतील लढाई -भुजबळ
गोंदिया, १३ एप्रिल / वार्ताहर

एकीकडे धर्मनिरपेक्षतेच्या विचारांचा काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष, तर दुसरीकडे जाती धर्माच्या नावावर लोकांना आपसात लढवून आपली राजकीय पोळी शेकणारा पक्ष अशा दोन परस्पर विरोधी विचारसरणीत या निवडणुकीत संघर्ष होत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्या निवडणूक प्रचार सभेत काटी येथे भुजबळ बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले की, योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी बसविण्यास विकास कामांना गती मिळते. जिल्ह्य़ात उद्योगांची स्थापना करून बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारे प्रफुल्ल पटेल यावेळी रिंगणात आहे.

नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे दुर्गम भागात प्रचार थंडच
गडचिरोली, १३ एप्रिल / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन करीत नक्षलवाद्यांनी हिंसक कारवायात वाढ केल्याने जिल्ह्य़ाच्या नक्षलवादग्रस्त भागात प्रचार करण्यास उमेदवार व कार्यकर्ते उत्सुक दिसत नाहीत. परिणामी, नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे दुर्गम भागातील प्रचार यंत्रणा थंडावल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांनी गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर हिंसक कारवाया घडवून आणल्या. यासोबतच ठिकठिकाणी निवडणुकीवर बहिष्काराची पत्रके सोडली.

अकोल्यातील २४८ मतदान केंद्रे संवेदनशील
अकोला, १३ एप्रिल/प्रतिनिधी

अकोला लोकसभा मतदारसंघातील २४८ मतदान केंद्र संवेदनशील ठरवण्यात आली असून, या केंद्रांवरील पोलीस बंदोबस्तात वाढ केली जाणार आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी केलेल्या शिफारशीवरून केंद्रीय निवडणूक निरीक्षकोंनी अकोला लोकसभा मतदारसंघातील २४८ मतदान केंद्र संवेदनशील ठरवली आहेत. या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

लोणारमध्ये मुस्लिम कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
बुलढाणा, १३ एप्रिल / प्रतिनिधी

मेहकरचे नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या उपस्थितीत लोणारला शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोमीन खान पठाण यांनी हा प्रवेश सोहोळा घडवून आणला. मोमीन खान यांच्या घरासमोरील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रौनक अली सिद्दीक होते. प्रकाश मापारी, बळीराम मापारी, पंकज चंदेल, संदीप कटके, भुजंग काळे, दौलत पठाण, लक्ष्मण गायकवाड, फिरोज पठाण, राहुल मापारी याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

--------------------------------------------------------------------------

तरुण कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ अपक्ष नाना पटोले

वामन तुरिले, भंडारा, १३ एप्रिल

सर्वसामान्यांचा नेता अशी प्रतिमा प्राप्त झालेले अपक्ष उमेदवार नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रतिस्पर्धाच्या तोंडचे पाणी पळवले आहे. हा चमत्कार घडवून आणला छावा संग्राम परिषद, प्रहार यांच्या तरुण कार्यकर्त्यांनी. दोन आमदारकीच्या काळात भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्य़ात नाना पटोले यांनी विविध उपक्रम राबवून आणि जनसामान्यांच्या समस्यांवर उत्तरे शोधूना लोकांशी सतत संपर्क ठेवला. त्यामुळे प्रत्येकच गावात ‘घरचा माणूस यावा’ असे त्यांचे स्वागत होताना बघायला मिळाले.

अब जमाना बदल गया है
किरण राजदेरकर

निवडणुकीचा आजचा काळ अनुभवताना ‘जाने कहा गये वो दिन’ असाच आठव सध्या समस्त पोलिसांना येत आहे. लोकशाहीत निवडणूक होणारच. मात्र, ही प्रक्रिया पार पाडताना आज येणारे अनुभव पाहता पोलिसांनाही स्वप्नरंजन केल्याशिवाय राहवत नाही. मात्र, याची कबुली पोलीस ‘ऑफ द रेकॉर्ड’च देतील. आजच्यासारखी आचारसंहिता तेव्हा फक्त कागदावरच होती. त्यामुळे पोलिसांवर आज इतके ‘ओझे’ही नव्हते. १९९४ पासून आचारसंहितेच्या पालनाविषयी आग्रह होऊ लागला. आचारसंहितेचा बडगा उगारल्याने आता मूळ पोलिसिंगपेक्षा इतरच कामे जास्त वाढली आहेत. १९९४ पूर्वीही निवडणुका होत होत्या. काही ठिकाणचा अपवाद सोडला तर निवडणुकीत फारसे तंटे होत नसत.

रात्री उशिरापर्यंत जनसंपर्काचा धडाका
बुलडाणा लोकसभा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे

सोमनाथ सावळे, बुलडाणा, १३ एप्रिल

जिल्हा बँकेचे दहा वर्षे अध्यक्ष, पंधरा वर्षांपासून सिंदखेडराजाचे आमदार, त्यातील आठ वर्षे राज्यमंत्री, अलीकडेच कॅबिनेट मंत्री, वडील सहकार महर्षी भास्करराव शिंगणे यांच्या पुण्याईचे वारसदार म्हणून कायम वलय, घरीदारी माणसांचा कायम राबता, माणसांच्या गराडय़ात राहण्याची नेहमीचीच सवय ही बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची खासियत!

‘विजयी भव’ ने दिनचर्येला सुरुवात
न.मा. जोशी, यवतमाळ, १३ एप्रिल

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे हरिभाऊ राठोड निवडणूक प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वी अगदी पहाटे घरी आलेल्या पहिल्या अतिथीला शाल-श्रीफळ देऊन, त्याला नमस्कार करून व त्याच्याकडून ‘विजयी भव’ असा आशीर्वाद घेऊन यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार हरिभाऊ राठोड त्यांच्या दिनचर्येला सुरुवात करतात. त्यांच्या सोबतीला पत्नी मालती उपाख्य कमल राठोड या देखील असतात. रोज सकाळी हरिभाऊ, त्यांचे कुटुंबीय जगदंबेची आरती केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत.


‘कोरी पाटी’ मतदारांच्या भेटी!
नागपूर लोकसभा मतदारसंघ भारिप बहुजन महासंघ डॉ. यशवंत मनोहर

ज्योती तिरपुडे, नागपूर, १३ एप्रिल

मी भारतीय समाजाचा अभ्यासक आहे. सांप्रदायिक सद्भाव नांदावा, वृद्धिंगत व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. आरोग्य, स्वच्छतेबरोबरच माणसाच्या मनाची स्वच्छताही महत्त्वाची आहे. स्वच्छ मनांच्या निर्मितीचे स्वप्न लोकसभा उमेदवारीच्या रूपात आपण पहात असतो. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आमच्या भारिप बहुजन महासंघ आणि लोकमोर्चाकडे काँग्रेस, भाजप आणि बीएसपी सारखा बक्कळ पैसा नाही. त्यांच्यासारखा प्रचाराचा भपकाही आम्ही निर्माण केला नाही.

‘हाथी’ चले ‘कॅडर’ की चाल!
नागपूर लोकसभा मतदारसंघ बसपचे माणिकराव वैद्य

राजेश्वर ठाकरे, नागपूर, १३ एप्रिल

नागपूर लोकसभा मतदार संघाच्या लढतीत निर्णायक भूमिका बजावू शकणारे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार माणिराव वैद्य यांच्या प्रचाराला बसपाच्या ‘कॅडर’च्या शिस्तीची जोड मिळाल्याने एका दिवशी जास्तीतजास्त भागात प्रचार करणे त्यांना शक्य झाले आहे. भर उन्हात खुल्या जीपमध्ये उभे राहून छोटय़ाछोटय़ा गल्लीतून ‘रॅली’ निघते. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून माणिकराव दोनतीन कांदे निळ्या रंगाच्या गमछ्यामध्ये ठेवून डोक्याला बांधतात.

महाराष्ट्रात जात फॅक्टर पवारांनी आणला -राऊत
राखीव मतदारसंघांची पद्धत बंद करा

बुलढाणा, १३ एप्रिल / प्रतिनिधी

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जात फॅक्टर आणला तो नष्ट करायचा असेल तर प्रथम जातीच्या आधारावरील राखीव मतदारसंघ रद्द केले पाहिजेत, अशी ही शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना कधीही जात-पात मानत नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी येथे रविवारी आयोजित पत्रपरिषदेत केले.

पदयात्रा.. रिअल की मॅनेज्ड?
लोकसभेच्या िरगणात उतरलेल्या उमेदवारांना अनेक कटकटींना रोजच तोंड द्यावे लागत असले, तरी दोन गोष्टींमुळे त्यांचा उत्साह खचित रोजच वाढत असणार! पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या पदयात्रांना मिळत असलेला उत्स्फूर्त, भरघोस प्रतिसाद आणि या पदयात्रांच्या, जीपयात्रेच्या, रथयात्रेच्या छापून येणाऱ्या तितक्याच भरघोस बातम्या! निवडणुकीतील पदयात्रा किंवा जीपयात्रा हा एक सोहोळाच असतो. ही यात्रा जिथून सुरू होणार असते, तेथील ‘स्थानिक’ कार्यकर्ते कडक कपडय़ांनिशी वेळेपूर्वीच ‘रेडी’ असतात.

प्रचारादरम्यान डॉ. बाबासाहेबांसोबतचे मालतीबाईंचे दोन अविस्मरणीय दिवस
आज डॉ. आंबेडकर जयंती

वामन तुरिले, भंडारा, १३ एप्रिल

१९५४ च्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीतील एक उमेदवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहवासात दोन दिवस राहिलेल्या, आज वयाची सत्तरी ओलांडलेल्या डॉ. मालतीबाई रहाटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना, बाबासाहेबांच्या आत्मीयतेचा त्यांना आलेला अनुभव सांगितला.

सुलेखा कुंभारेंची कामठीत मिरवणूक
नागपूर, १३ एप्रिल / प्रतिनिधी

रामटेक लोकसभा मतदारसंघातील बहुजन रिपब्लिकन एकता मंच, पीरिपा झारखंड मुक्तीमोर्चाच्या उमेदवार अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांच्या निवडणूक प्रचारार्थ कामठी येथे मिरवणूक काढण्यात आली.
सुलेखा कुंभारेंनी संपूर्ण कामठी शहरात मिरवणुकीद्वारे भ्रमण करून ‘शहराला स्वच्छ, सुंदर व सर्वागीण विकासासाठी ‘टेबल लॅम्प’ या चिन्हाची बटन दाबून ‘कामठीच्या बेटीला’ विजयी करण्याचे आवाहन केले. या मिरवणुकीत हसन अली, शीतल पटेल, नूसरत कमाल अंसारी, तिलक गजभिये, अजय कदम, नगरसेवक पामू यादव, मुकुंद यादव, रजनी लिंगायत, माधुरी गजभिये, सावला शिंगाडे, मोरेश्वर पाटील, राजू देशभ्रतार, रिजवान कुरैशी, रहेमान पहेलवान, जेता फुलझले, राजू सोनी, अशफाक कुरेशी, नारायण हटवार, राजपाल गजभिये, युवराज रेवतकर, विशाल शंभरकर, नितीन हाडके, अल्का तांबे, साधना घरडे, प्रतिमा देशभ्रतार, पुष्पा समरीत, रवी रंगारी, विष्णू ठवरे, अशोक पिसे, विनायक जामगडे, बुद्धिमान पाटील, बाबू भालाधरे, यादव रंगारी, रामू जामगडे सहभागी झाले होते.

--------------------------------------------------------------------------

स्वतंत्र भारत पक्षाच्या प्रचारात महिला आघाडीवर
चंद्रपूर, १३ एप्रिल/प्रतिनिधी

स्वतंत्र भारत पक्षाचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या प्रचारासाठी महिलांनी कंबर कसली आहे. अ‍ॅड. चटप यांचे ‘टी.व्ही.’ हे चिन्ह घराघरातून थेट किचनपर्यंत पोहोचवण्यासाठी महिला वर्ग चांगली मेहनत घेत आहेत. शेतकरी संघटनेच्या जडणघडणीत महिलांचा मोठा वाटा आहे. चांदवड अधिवेशनात महिला मुक्तीसाठी घेतलेल्या निर्णयाने शेतकरी महिला आपल्या घरधन्याच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी ‘चूलमूल’ च्या गोतावळ्यातून बाहेर पडून नापिकी, कर्ज, शेतमालाचा कमी भाव, नैसर्गिक आपत्ती अशा संकटात सापडलेल्या आपल्या कुटुंबाला चांगली साथ दिली. ‘लक्ष्मीमुक्ती’चा प्रभावी कार्यक्रम राबवून शेतकरी संघटनेने या महिलांच्या नावावर जमीन करून त्यांना नवे जीवन जगण्याची उमेद निर्माण केली. देशाचे व शेतीचे अर्थशास्त्र, पोशिंद्याची लोकशाही, शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व बाजारपेठेचे स्वातंत्र्य डॉ. आंबेडकराच्या लोकशाहीची पुनस्र्थापना, बळीराज्याची निर्मिती असे अनेक अवजड शब्द व त्यांचे अर्थ या महिलांनी सहजपणे समजून घेतले आणि प्रसंगी गोळ्या लाठय़ा खाऊन शेतकरी आंदोलनात तेवढय़ाच हिरिरीने भाग घेतला. या सर्व महिला जिद्दीने शेतात रणरणत्या उन्हात काम कराव्या तशा अ‍ॅड. चटप यांचा प्रचार करीत आहे.

चित्ररथ स्पर्धेचे बक्षीस वितरण
भंडारा, १३ एप्रिल / वार्ताहर

श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने लाखांदूर नगरीत प्रथमच श्रीराम शोभायात्रा काढण्यात आला. या शोभायात्रेतील चित्ररथ स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले. या शोभायात्रेत शेतकरी कुटुंब चित्ररथ, चित्रकुट भरतभेट, महापुरुषांच्या कार्यावरील चित्ररथ, नरसिंह अवतार, प्रल्हाद, सीता राम, लक्ष्मण, हनुमान व वानरसेना व रामसीतेच्या वेशभुषेतील चिमुकल्यांचे चित्ररथ आकर्षणाचे केंद्र ठरले होते. शोभायात्रेत ढोल ताशा व संदल व डी.जे. च्या तालावर ‘रामजीकी निकली सवारी’ या धुनवर तरुण तिरकत होते संपूर्ण नगरातून ही शोभायात्रा फिरली. शोभायात्रा पाहण्यासाठी भरपूर गर्दी उसळली होती. श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने शोभायात्रेतील चित्ररथांना क्रमांक देऊन बक्षीस वितरित करण्यात आले. यात सी.एन. वासनिक अध्यापक विद्यालय यांच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक, शारदा चौक च्या चित्ररथाला दुसरे तर जुना बस स्टॉपच्या चित्ररथाला तिसरे पारितोषिक देण्यात आले. सर्व चित्ररथांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. बक्षीस वितरण सोहोळ्यास शैलेषसिंह चव्हाण, अनिल गुरूनुले, अनिल मोहुर्ले, संजय देशमुख, अविनाश अलोने, रवी धोटे, गजेंद्र हटवार, भिकाजी शहारे, अनिल तोंडरे, नीलेश्वर बगमारे, धीरज गुरूनुले, उपस्थित होते.

कामगार न्यायालयाची प्रफुल्ल पटेलांना चपराक
भंडारा, १३ एप्रिल / वार्ताहर

सी.जे. पटेल टोबॅको प्रा. लिमिटेडचे भागीदार प्रफुल्ल मनोहर पटेल यांना ३९ बिडी मजुरांना त्यांच्या हक्काचे १२ लाख २० हजार ९३४ रुपये ६ टक्के व्याजदराने द्यावेत, असा आदेश कामगार न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. खान यांनी दिला आहे. हा खटला गोंदिया येथील न्यायालयात सुरू होता. बिडी कामगारांकडून अ‍ॅड. संजीव गजभिये यांनी बाजू मांडली. सी.जे. पटेल टोबॅको प्रा. लि.चे भागीदार प्रफुल्ल पटेल व बिडी कंत्राटदार विनोद तुकाराम डोंगरे यांनी या खटल्यासंदर्भातील नोटीसही स्वीकारली नव्हती. २००५ पासून प्रलंबित असलेल्या या खटल्याचा निकाल ३० जानेवारी २००९ ला लागला. कामगार न्यायालयाच्या या निकालाची प्रत ०८ एप्रिल ०९ ला मिळाली.

रोजगार हमीवर लाखांदुरात चर्चासत्र
भंडारा, १३ एप्रिल / वार्ताहर

लाखांदूर तालुक्यातील सरांडीत तालुका विधि सेवा समितीच्या वतीने नुकतेच रोजगार हमी योजनेवर चर्चासत्र झाले. यावेळी न्यायाधीश रा.म. कपाटे, संवर्गविकास अधिकारी राजेश बागडे यांनी मार्गदर्शन केले. न्या. कपाटे यांनी रोजगार हमीबाबत कायदेविषयक माहिती दिली. बागडे यांनी रोजगार हमी योजनेतील समस्या व अडचणी विशद करून याचा लाभ मजुरांना घता येईल, असे सांगितले. यावेळी अ‍ॅड. पिलारे, अ‍ॅड. ठवरे, अ‍ॅड. खोब्रागडे यांनी कायदेविषयक माहिती दिली.
या कार्यक्रमास सरांडीच्या सरपंच ढोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. सुखदेवे यांनी केले. आभार दलाल यांनी मानले.

महिमा चौधरी आज गडचिरोलीत
गडचिरोली, १३ एप्रिल / वार्ताहर

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मारोतराव कोवासे यांच्या निवडणूक प्रचारासाठी चित्रपट अभिनेत्री महिमा चौधरी मंगळवार, १४ एप्रिलला गडचिरोली जिल्ह्य़ात येत असून त्यांचा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्य़ात ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ वाजता गडचिरोली, ११ वाजता चामोर्शी, दुपारी १२.३० वाजता सावली (जि. चंद्रपूर) व दुपारी २ वाजता सिंदेवाही येथे मुख्य मार्गाने रोड शो होणार आहे. त्यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा व आदिवासी विकास राज्यमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार धर्मरावबाबा आत्राम, उमेदवार मारोतराव कोवासे, आमदार आनंद गेडाम, ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार, माजी आमदार हरिराम वरखेडे, पेंटा रामा तलांडी, उद्धवराव सिंगाडे, राम मेश्राम राहणार आहेत.