Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे दुर्गम भागात प्रचार थंडच
गडचिरोली, १३ एप्रिल / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन करीत नक्षलवाद्यांनी हिंसक कारवायात वाढ केल्याने जिल्ह्य़ाच्या नक्षलवादग्रस्त भागात प्रचार करण्यास उमेदवार व कार्यकर्ते उत्सुक दिसत नाहीत. परिणामी, नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे दुर्गम भागातील प्रचार यंत्रणा थंडावल्याचे दिसून येत

 

आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांनी गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर हिंसक कारवाया घडवून आणल्या. यासोबतच ठिकठिकाणी निवडणुकीवर बहिष्काराची पत्रके सोडली. दरम्यान, १० एप्रिलला त्यांनी गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा बंदचेही आवाहन केले. या बंदला जिल्ह्य़ातील धानोरा, कोरची, एटापल्ली तालुक्यात काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे दुर्गम भागात उमेदवारांची प्रचार यंत्रणा विस्कळीत झालेली आहे. विशेषत: धानोरा तालुक्यात नक्षलवाद्यांनी मोठय़ा प्रमाणावर हैदोस सुरू केल्याने या तालुक्यावर दहशतीचे सावट आहे. त्यामुळे या तालुक्यातील दुर्गम भागात उमेदवार तर दूरच, कार्यकर्तेही प्रचाराला जाऊ शकले नाहीत. प्रचाराच्या गाडय़ा या भागात फिरकल्याच नाहीत. शिवाय कोणत्याही पक्षाचे बॅनर्स, पत्रके अंतर्गत भागात आढळली नाहीत. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक निवडणुकीच्या विषयावर बोलायलाही टाळाटाळ करीत असल्याचे जाणवले. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे दुर्गम भागात मतदानावर परिणाम होऊन मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धानोरा तालुका मुख्यालयी मात्र प्रचार यंत्रणा पोहोचली.