Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अकोल्यातील २४८ मतदान केंद्रे संवेदनशील
अकोला, १३ एप्रिल/प्रतिनिधी

अकोला लोकसभा मतदारसंघातील २४८ मतदान केंद्र संवेदनशील ठरवण्यात आली असून, या

 

केंद्रांवरील पोलीस बंदोबस्तात वाढ केली जाणार आहे.
सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी केलेल्या शिफारशीवरून केंद्रीय निवडणूक निरीक्षकोंनी अकोला लोकसभा मतदारसंघातील २४८ मतदान केंद्र संवेदनशील ठरवली आहेत.
या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. ही केंद्र संवेदनशील ठरवण्यासाठी जे मुद्दे ग्राह्य़ धरण्यात आले त्यामध्ये, मतदारांकडे कमी प्रमाणात छायाचित्र ओळखपत्र असणे, ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होणे, विशिष्ट पक्षाच्याच उमेदवाराला ७५ टक्क्यांहून अधिक मतदान होणे, मतदान केंद्र बळकावण्याचा प्रयत्न होणे आणि निवडणूक काळात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक असणे या मुद्यांचा समावेश आहे.
संवेदनशील मतदानकें द्रांमध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७४ केंद्र आहेत. मूर्तीजापूर मतदारसंघात ४१, बाळापूर आणि अकोट मतदारसंघात प्रत्येकी ३९, अकोला पूर्व मतदारसंघात ३५, तर रिसोड विधानसभा मतदारसंघात २० केंद्र संवेदनशील ठरवण्यात आली आहेत. या कें द्रांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाची मदतही घेण्यात येणार आहे.
गृहरक्षक दलाचे ४०० जवान शनिवारी अकोल्यात दाखल झाल्याची माहिती असून, यामध्ये नंदुरबार जिल्ह्य़ातील २०० आणि औरंगाबाद येथील २०० जवानांचा समावेश आहे. रेल्वे पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या तुकडय़ाही बंदोबस्तासाठी अकोल्यात येणार आहेत.