Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लोणारमध्ये मुस्लिम कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
बुलढाणा, १३ एप्रिल / प्रतिनिधी

मेहकरचे नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या उपस्थितीत लोणारला शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी

 

शिवसेनेत प्रवेश केला.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोमीन खान पठाण यांनी हा प्रवेश सोहोळा घडवून आणला. मोमीन खान यांच्या घरासमोरील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रौनक अली सिद्दीक होते. प्रकाश मापारी, बळीराम मापारी, पंकज चंदेल, संदीप कटके, भुजंग काळे, दौलत पठाण, लक्ष्मण गायकवाड, फिरोज पठाण, राहुल मापारी याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रवेश केलेल्या मुस्लिमांचा नगराध्यक्ष संजय जाधव यांनी गळ्यात भगवा रूमाल टाकून सत्कार केला.
आमदार प्रतापराव जाधव यांनी मुस्लिम समाजाला प्रथम नागरिकाचा बहुमान दिला. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असताना तसेच १७ पैकी ८ नगरसेवक मुस्लिम समाजाचे असताना त्यांनी एकालाही नगराध्यक्ष संधी दिली नाही. आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लिमांचा केवळ उपयोग करून घेतला पण, संधी मात्र शिवसेनेने दिली. मुस्लिम समाजाचा विकास करायचा असेल तर, जाधव यांना विजयी करावे, असे आवाहनही पठाण यांनी केले. फिरोज खान पठाण यावेळी म्हणाले की, मुस्लिम समाज हा ४५ वर्षांपासून काँग्रेससोबत आहे. त्या भरवशावर काँग्रेसने सत्ता मिळवली परंतु, आम्ही १५ वर्षांपासून आमदार प्रतापराव जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहोत. त्यांनी मेहकर येथे मुस्लिम समाजाच्या कासम गवळी यांना नगराध्यक्ष बनवले. आता लोणारचे नगराध्यक्षपदी मुस्लिम समाजालाच दिले आहे.