Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

बुलढाण्यात मुस्लिम समाजाचा मेळावा
बुलढाणा, १३ एप्रिल / प्रतिनिधी

दहशतवाद संपविण्याच्या नावावर मते मागणाऱ्यांनीच दहशतवादाला सुरुवात केली आहे. हात तोडण्याची भाषा व त्याचे सामर्थन करणाऱ्यांना मुस्लिम समाजाने मतदान करू नये तर धर्मनिरपेक्षतेवर चालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मतदान करण्याचे आवाहन अल्पसंख्याक

 

सेलचे प्रदेशाध्यक्ष हबीब फकीब यांनी केले.
रविवारी गर्दे हॉलमध्ये मुस्लिम मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय अंभोरे होते. यावेळी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे शब्बीर विद्रोही, माजी प्रदेशाध्यक्ष कदीर मौलाना, एम.एम. शेख, रशीद खाँ जमादार, अ‍ॅड. नाझेर काझी, अजीम नवाज राही, विश्वनाथ माळी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना हबीब फकीब पुढे म्हणाले की, अफजल गुरुला भर चौकात फाशी देण्याची ओरड करणाऱ्या पक्षातील लोकांनीच त्यांचे वकीलपत्र घेतले आहे. मसूद अझरसारख्या दहशतवाद्याला भाजप सरकारच्याच काळात कंधारमध्ये नेऊन सोडण्यात आले. त्यावेळी त्याला शिक्षा दिली असती तर २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला टळला असता. भाजपच्या गुजरात राज्यात गोद्रा हत्याकांड झाले. त्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. अक्षरधाममध्येही हल्ला झाला. तेच लोक आता दहशतवाद संपविण्याच्या गप्पा मारत आहेत, असे ते म्हणाले. यावेळी अल्पसंख्याक सेलेचे माजी प्रदेशाध्यक्ष कदीर मौलाना म्हणाले की, निवडणुकीत अनेक पक्ष उभे असून ताकद वाढविण्यासाठी ते मते मागत आहेत. आघाडी सरकारची विकासात्मक कामे पाहता देशात चांगले सरकार येण्यासाठी मुस्लिम समाजाने या आघाडीच्या पाठीशीच उभे राहणे आवश्यक आहे.यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, मी पहिल्यांदा जेव्हा अपक्ष निवडून आलो त्यावेळेस शिवसेनेने मला दोन वेळेस मंत्रीपदाची ऑफर दिली; परंतु जातीयवादी पक्षाच्या सरकारमध्ये मी सामील झालो नाही. ही निवडणूक सर्वात मोठी असून या देशाची सत्ता जातीयवाद्यांच्या हातात द्यायची की धर्मनिरपेक्ष शक्तीच्या हातात ठेवायची याचा निर्णय मतदारांना घ्यायचा आहे, असेही ते म्हणाले.