Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

जनशक्ती प्रबळ होण्याची गरज -शत्रुघ्न सिन्हा
भंडारा, १३ एपिल / वार्ताहर

लोकशाहीच्या रक्षणासाठी देशातील जनशक्ती प्रबळ होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन

 

भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी येथे केले.
भाजप उमेदवार शिशुपाल पटले यांच्या प्रचार सभेत बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर कडाडून टीका केली.
शिशुपाल पटले यांच्या ५ वर्षांतील जनहिताच्या कार्याचा आढावा शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतला आणि धनशक्तीसमोर जनशक्तीच्या संघर्षांत जनशक्ती प्रबळ ठरेल, असे भाकीत केले.
देशात गेल्या पाच वर्षांत दारिद्रय़रेषेखालील लोकांची संख्या २० टक्क्यांनी वाढल्याचा ‘नॅशनल स्टॅस्टीकल इन्स्टीटय़ूट’चा अहवाल असल्याचे त्यांनी सांगितले.
एकटय़ा भारतातून भूकबळी जगाच्या तुलनेत २७ टक्के आहेत. आजचे सरकार ७५ टक्के खर्च श्रीमंतावर आणि केवळ २०.२५ टक्के खर्च गरिबांवर करते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप शत्रुघ्न सिन्हा यांनी केला.
रखरखत्या उन्हात पायी फिरून प्रचार करणाऱ्या कडव्या कार्यकर्त्यांना उद्देशून, विरोधी पक्षात राहूनच कार्यकर्ते संघर्ष करीत परिपक्व होतात, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक उमेदवार शिशुपाल पटले यांनी केले. संचालन जिल्हाध्यक्ष डॉ. प्रकाश आमगाबे यांनी केले.
याप्रसंगी शिवसेनेचे नरेश डहारे, आमदार मधुकर कुकडे, नितीन कडव, कृष्णकुमार बतरा, डॉ. श्याम झिंगरे, रेखा रहांगडाले उपस्थित होते.