Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

चंद्रपुरात अनाथ दत्तक बालक-पालक मेळावा
चंद्रपूर, १३ एप्रिल/प्रतिनिधी

किलबिल प्राथमिक बालगृह व दत्तक संस्थेत नवजात अनाथ दत्तक बालक-पालक मेळावा

 

उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमल जगशेट्टीवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य दंडाधिकारी गोसावी, नीता गोसावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रमेश बांडेबुचे व नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मनोरुग्ण तज्ज्ञ डॉ. मनीष ठाकरे उपस्थित होते.
डॉ. मनीष ठाकरेंनी जैविक बाळ नसल्यास निपुत्रिक दांपत्यांनी अपत्यहीनतेच्या वेदना सोसण्यापेक्षा अनाथ बाळालाच दत्तक घ्यावे, हे आवर्जून सांगितले. कोणतेही बाळ मग ते नात्यातील असो वा अनाथ बाळ असो. दत्तक घेतल्यास काही काळ समस्या येतातच. बाळाच्या बाल्यात बाळ व दत्तक आईवडिल यांच्या जीवनात आनंदच आनंद अनुभवास येतो पण, जसजसे बाळ मोठे होते त्याला समज येते त्यावेळी काही काळ अनेक प्रश्न दत्तक मात्यापित्यांना येतात. नात्यातले बाळ घेतल्यास कधीही ते जन्मदाते आईवडिल बाळ परत नेतात अथवा जन्मदाते आईवडिल समजल्यावर बाळाच्या मनात भावनात्मक कल्लोळ माजतो. अशावेळी दत्तक आईवडिलांना विलक्षण वेदना होतात म्हणूनच ज्याला कोणीही नाही ते अनाथ बाळ दत्तक घेणे हाच उत्कृष्ट पर्याय आहे. जैविक इतकेच संस्कारालाही महत्त्व आहे, हे आवर्जून सांगितले. सिव्हिल सर्जननी आरोग्य व योगाचा संबंध सांगितला. कधीही कोणतीही वैद्यकीय अडचण आल्यास प्रत्यक्ष माझ्य़ाशी नि:संकोच संपर्क साधावा, हे सांगून स्वत:चा मोबाईल नंबर दिला. सर्व सामान्य लोकांशी सरळ संबंध प्रस्थापित करू इच्छिणारे सिव्हिल सर्जन विरळेच असतील, असे त्या म्हणाल्या. त्या नवजात अनाथ बाळाच्या दत्तकाद्वारे कायम स्वरूपी पुनर्वसनासाठी कायद्याचे काटेकोर पालन अत्यंत महत्त्वाचे आहे संस्था त्याबाबतीत दक्ष आहे , असे प्रा. प्रभावती मुठाळ यांनी सागितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. ज्योती राखुंडे यांनी केले. आभार संस्थेच्या अध्यक्षा आशा ठाकरे यांनी केले.