Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मेळघाटातील हत्तीघाट विकासापासून कोसो दूर
वीजपुरवठा नाही; पाण्यासाठी ५ किमी.ची पायपीट
मधुसूदन कुलथे, चांदूर बाजार, १३ एप्रिल

मेळघाटच्या कुशीत वसलेले हत्तीघाट हे गाव व त्यात राहणाऱ्या ४५० लोकांना स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही वीजपुरवठा व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दर पाच वर्षांत

 

निवडणुका येतात व जातात. दरवेळी उमेदवार आश्वासने देतात व त्या आश्वासनांना भुरळून आदिवासी मतदान करतात परंतु, कोणत्याही उमेदवाराने आजपर्यंत त्यांच्या आवश्यक असलेल्या सुविधांकडे डोकावून पाहिले नाही. आजही या गावात विद्युत पुरवठा नाही. पिण्याच्या पाण्यासाठी ५ ते १० किमी. पायपीट करावी लागत आहे. घाटमाथ्यावर दिसणाऱ्या या गावात आदिवासींचे कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात मात्र, त्यांच्या रोजगाराकडे किंवा मुलांच्या शिक्षण व आरोग्याकडे आजही शासन दुर्लक्ष करीत आहे.
या गावाची तहसील व पंचायत समिती चिखलदरा असून गावापासून ३० ते ३५ किमी. अंतरावर आहे. मतदान केंद्र गावापासून ५ किमी. अंतरावर असलेल्या बेलखेडा या गावात आहे. गावातील बहुतांश तरुण आदिवासी रोजगार नसल्यामुळे मोलमजुरी करण्याकरिता गाव सोडून महिना महिना बाहेरगावी राहतात, तर वृद्ध मात्र त्यांची आतुर नजरेने वाट पाहतात. या गावाची ग्रामपंचायत कोहाना असून तेथील सरपंच जिजा (भांद्री) येथील आहेत. कधीही त्या गावाकडे फिरकून पाहत नाहीत. गावात सौरऊर्जेची योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न झाला परंतु, आज सौरऊर्जेचे खांब शोभेची वस्तू बनून राहिले आहेत. गावाच्या ५-६ किमी. अंतरावर असलेल्या विहिरीवरून हे आदिवासी पिण्याचे पाणी आणतात. त्या विहिरीला कठडा नाही, औषधही टाकले जात नसल्याची तक्रार गावकरी करतात. पहाडी भागात हे गाव येत असले तरी पावसाळ्यातील पाणी साठवण्यासाठी कोणतेही उपाय आजपर्यंत प्रशासनाने केले नसल्याचे प्रकर्षांने जाणवते.
शासन आदिवासी विकासाकरिता कोटय़वधींच्या योजना तयार करते परंतु, उदासीन लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांमुळे योजना त्यांच्यापर्यंत कधीही पोहोचत नाहीत.
शिक्षण, आरोग्य, दैनंदिन सुविधा, रोजगार यापासून वंचित असलेल्या या आदिवासींना निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आश्वासनांची खैरात वाटतात तर आमिषांवर यांची मते घेऊन पाठ फिरवतात. या गावाला निसर्गसौंदर्याचे कोंदण असले तरी आदिवासींचे विव्हळ चेहरे त्यांच्या दारिद्रय़ाची कथा सांगतात.