Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

संपुआ, रालोआला जनता कंटाळली - गोविंद पानसरे
गोंदिया, १३ एप्रिल / वार्ताहर

काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी व भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशातील जनता कंटाळली असून डाव्यांनी आता तिसरा पर्याय उभा केला आहे, असे भाकप नेते

 

गोविंद पानसरे यांनी सांगितले.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शिवकुमार गणवीर यांच्या प्रचारसभेत कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय परिषद सदस्य गोविंद पानसरे बोलत होते. पानसरे, नामदेव चव्हाण, प्रा. राम बाहेती, आशा मोकाशी व हौसलाल रहांगडाले यांनी गेल्या १० दिवसात गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जुनी, मोर/अर्जुनी तालुक्यातील सुमारे १२५ गावात जाहीर सभा घेतल्या. या निवडणुकीत कोटय़वधी रुपयाची उधळन करणारे बिडी मालक एकीकडे तर कष्टकऱ्यांचे सतत आंदोलन करणारे बिडी कामगाराचा मुलगा शिवकुमार गणवीर सारखे उमेदवार दुसरीकडे आहेत. कोटय़वधी रुपये खर्च करणाऱ्यांना दूर ठेवण्याचे आवाहन पानसरेंनी ठिकठिकाणच्या प्रचारसभेत केले. प्रफुल्ल पटेलांनी २००४ च्या निवडणुकीत आपली संपत्ती ३२ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते, २००९ च्या निवडणुकीत त्यांनी आपली संपत्ती ६७ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या पाच वर्षांत दुपटीपेक्षा जास्त संपत्ती पटेलांची वाढली आहे. दुसऱ्या बाजूला शेतकरी कर्जबाजारीमुळे आत्महत्या करीत आहे, शेतमजूर रोजगारविना उपासमारीचे जीवन जगत आहे, गोरगरीब कष्टकऱ्यांची गरिबी मात्र वाढत चालली आहे, असे प्रतिपादन पानसरे यांनी केले.
संयुक्त पुरोगामी आघाडी व राष्ट्रीय लोकशाही आघाडींना देशभरातील जनता कंटाळली असून जनता आता तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहे व डाव्या आघाडीने निर्माण केलेल्या तिसऱ्या आघाडीला देशभर चांगला प्रतिसाद असल्याचा दावा पानसरे यांनी केला. या तिसऱ्या आघाडीचे उमेदवार भाकपचे शिवकुमार गणवीर यांनाच निवडून द्यावे, असे आवाहन भाकप नेत्यांनी केले. हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, देवाजी वासनिक, शालू भोयर, नारायण भलावी, चंद्रप्रकाश शेंडे, यांनी विविध ठिकाणी प्रचारफेऱ्या काढल्या.