Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सेना-भाजपचा जाहीरनामा फसवा -राणे
आर्णी, १३ एप्रिल / वार्ताहर

भाजप-सेनेचा जाहीरनामा फसवा असल्याची टीका काँग्रेसचे नेते उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथे

 

केली. काँग्रेसचे उमेदवार नरेश पुगलिया यांच्या सभेत राणे बोलत होते.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नरेश पुगलिया यांच्या प्रचारार्थ येथील धुमाजी नाईक मंगल कार्यालयाजवळील पटांगणात ही जाहीर सभा झाली. भाजप-सेना सत्तेत येणार नसल्याने त्यांनी जनतेला मोठी प्रलोभने जाहीरनाम्यातून दिली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकाने शेतकऱ्यांपासून सामान्य माणूस, मजूर, युवक, अल्पसंख्याक समाजासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांवरील ६५ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला आणि आता भाजप नेते सातबारा कोरा करण्याची भाषा वापरत आहेत, असे त्यांनी सांगितले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार उत्तमराव पाटील होते. पाटील यांनी यवतमाळ-वाशीमची उमेदवारी न मिळाल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. पुगलिया यांनी पाटील हे पक्षासाठी काम करीत असून सर्व जबाबदारी त्यांच्यावरच असल्याचे स्पष्ट केले.
माजी मंत्री शिवाजीराव मोघे, संजय देशुख, नरेश पुगलिया यांची यावेळी भाषणे झाली. या कार्यक्रमाला आमदार जैनुद्दीन जव्हेरी, नीलय नाईक, रामजी आडे, भारत राठोड, राजीव नीलावार, डॉ. चिंतावार, प्रवीण वानखडे, मुबारक तंवर, रमेश फेंडर, शौकत सोलंकी, डॉ. रामचरण चव्हाण, नरेश रामटेके, बाळासाहेब शिंदे, खलील बेग आदी उपस्थित होते. संचालन जाफर पेन्टर यांनी केले.