Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

तरुण कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ अपक्ष नाना पटोले
वामन तुरिले, भंडारा, १३ एप्रिल

सर्वसामान्यांचा नेता अशी प्रतिमा प्राप्त झालेले अपक्ष उमेदवार नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया

 

लोकसभा मतदारसंघात प्रतिस्पर्धाच्या तोंडचे पाणी पळवले आहे. हा चमत्कार घडवून आणला छावा संग्राम परिषद, प्रहार यांच्या तरुण कार्यकर्त्यांनी. दोन आमदारकीच्या काळात भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्य़ात नाना पटोले यांनी विविध उपक्रम राबवून आणि जनसामान्यांच्या समस्यांवर उत्तरे शोधूना लोकांशी सतत संपर्क ठेवला. त्यामुळे प्रत्येकच गावात ‘घरचा माणूस यावा’ असे त्यांचे स्वागत होताना बघायला मिळाले.
नाना पहाटे लवकर उठून व्यायाम, पूजा आटोपून, आई-वडिलांना नमस्कार करून सकाळी ७.३० पासून जमलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दाखल होतात. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते प्रचारातील कडूगोड अनुभव नानाला ऐकवतात, मार्गदर्शन घेतात आणि पुढे भराभर कामाला लागतात. दिवसभराच्या कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेले असते. नानाभाऊंनी तिरोडा तालुक्यात दौरा केला. सकाळपासून अनेक गावे पिंजून झाली. खुर्सीपार येथे त्यांच्या ताफ्यात सामील होता आले, तेव्हा दुपारचे ३ वाजले होते. मोठय़ा जमावासमोर जीपवर उभ्या राहून प्रहार संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्ष शारदा पडोळे आवाहन करीत होत्या, ‘सेनापती असा निवडा, जो ५ वर्षे तुमच्याकरिता लढू शकेल’ ही लढाई धनशक्ती विरोधात ‘धान’ शक्तीची आहे. मत विकू नका.’ चार-पाच गाडय़ांचा ताफा बिरसीकडे निघाला. छावा संग्राम परिषदेचे संजय बैस, देवेंद्र तिवारी, सलामभाई, महेंद्र भांडारकर, राजू पारधी, दुर्गा कोठे ही चमू श्रोत्यांना गोळा करून उभी होती. गावचे सरपंच बोलले, ‘नाना आता जातीची समीकरणे तुमच्यामुळे तुटतील. कर्तृत्वाला मत दिले जाईल. तुम्ही लढाऊ आमदार म्हणून नाव कमावले. आता खासदार बनून देशाचे नाव उज्ज्वल करा.’ इतक्यात महिलांकडून घोषणा आली,
ना घडी, ना कमल, ना हत्ती पाहिजे,
मला, माझ्या भाऊची ‘टोपली’ पाहिजे!
नंतर मेंढा येथे ताफा आला. तेथील हनुमान मंदिरात भागवत सप्ताहाची समाप्ती होती. संपूर्ण गाव महाप्रसादाला लोटला होता. प्रमुखांनी दोन शब्द बोलण्याची नानाला विनंती केली. नाना म्हणाले,‘मी अधिक बोलणार नाही. सर्व जातीधर्माचा एकोपा आपली शक्ती आहे. जातीपातीला मत न देता आम आदमीला मत द्या. मला तुमचा आशीर्वाद पाहिजे’. थोडक्यात बोलून विधानसभेत शेतकऱ्यांकरिता, बेकारांकरिता, बुरड, मच्छिमारांच्या प्रश्नाकरिता आकाशपाताळ एक करणाऱ्या नानाने ही मोठी सभा जिंकली होती.
प्रत्येक गावात स्थानिक मुद्दे, भारनियमन, महागाईसारखे कळीचे मुद्दे प्रकाशात आणत ठाणेगाव, डोंगरगाव, खडकी, खमारी, चिखली गावात ‘माहोल’ निर्माण करीत ताफा सुकळी येथे पोहोचला. सर्वानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्या दिवशी सुकळीचा बाजार होता. ताही नेत्यांनी काँग्रेसचे खच्चीकरण करून, काँग्रेसच्या आमदारांना कसे खिशात घातले, शेतकरी, सर्वसामान्य लोक गरीबच राहावे याकरिता धनदांडगे कसा प्रयत्न करतात, बिडी उद्योगाचे कसे बारा वाजवले, हजारो कोटीचा विमानतळ एक वर्षांत होतो आणि गोसेखुर्द, बावणथडी व अन्य सिंचन प्रकल्पांना पुरेसा पैसा मिळत नाही, राजीव गांधी विमान उड्डाण प्रशिक्षण संस्थेत २५ लाख रुपये खर्चून जिल्ह्य़ातले किती लोक वैमानिक बनतील, असे उपस्थितांशी सुसंवाद साधत नानांनी भाषण केले. ‘रोड-शो’ मध्ये एका वयोवृद्ध सुकळीकराने नाना पटोलेंची खास चौकशी करून त्यांना आशीर्वाद दिला व म्हटले वासुदेवाने भगवान कृष्णाला टोपलीतून पुरातून वाहून नेले होते. भगवानाच्या या ‘टोपली’त भरभरून ‘व्होट’ पडतील! पुढे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बन्सोड यांचे ठाणेगाव येथे ताफा आला. नानांनी येथे गायत्री शक्तिपीठात जाऊन पूजन केले. प्रत्येक ठिकाणी मिळणारा युवकांचा भक्कम प्रतिसाद व त्यांची धावपळ ध्यानात येण्याजोगी होती.
लाखांदूर हे दोन्ही जिल्ह्य़ातील मध्यवर्ती स्थान. सडकअर्जुनी, मोरगाव अर्जुनी ही त्यांची बलस्थाने. येथील ५७ टक्के दलितांनी त्यांना मागील निवडणुकीत गठ्ठा मते दिली होती. विदर्भात सर्वाधिक मते घेऊन ‘पंजा’ चिन्हावर नाना निवडून आले होते. रात्री उशिरा नाना लाखांदूरला घरी पोहोचले. परंतु, दुसऱ्या दिवशी ८.३० ला सकाळी भंडारा येथे छावा कार्यालयात हजर झाले. गोंदियानंतर भंडारा जिल्ह्य़ातील गावे त्यांना घ्यायची होती. थोडय़ाच वेळात कार्यालयात ‘लोकधारा’ या भटक्या विमुक्त व मागास वर्गाच्या संघटनेचे प्रमुख तसेच भटके विमुक्तांकरिता स्थापित रेणके आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके, नानाला भटक्या विमुक्तांकरिता झटणारा म्हणून आशीर्वाद द्यायला आले. कार्यालयाच्या बाहेर निघता निघता ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कार्यकर्त्यां आवर्जून नानांना भेटून म्हणाल्या, "नाना प्रचाराला निघताना, एकदा तरी ‘ओम नम: शिवाय’ म्हणायचे. कार्यकर्त्यांनाही सांगा." ताई धन्यवाद, म्हणत नाना समोर निघाले. एक वृद्ध गृहस्थ त्यांना ‘मजारी’वर घेऊन गेले. ताफा गणेशपूरकडे वळला. तेथे महाराष्ट्र प्रदेश भोई समाज संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करीत नानांचा ताफा पिंडकेपार येथे लोकांचे व कार्यकर्त्यांचे अभिवादन घेत कोरंबी येथे आला. वटवृक्षाखाली मोठय़ा संख्येत गावकरी जमले होते. सरपंच शांता नागदेवे यांनी, कोरंबी देवस्थानाला पर्यटन केंद्र बनवण्याचा प्रस्ताव धूळखात पडला असल्याबद्दल खंत व्यक्त केली.
प्रतापगड यात्रेतील हिंदू-मुसलमान ऐक्य आपण कसे जपतो, याबद्दल सांगून, ‘या पटेल कंपनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अशोक मेहता, डॉ. श्रीकांत जिचकार यांना हरवले, हे फक्त स्वार्थाचा विचार करतात हे ओळखा. मत विकू नका,’ असे नानांनी आवाहन केले. पुढे बेला गावात भरदुपारी पायी फिरून नानांनी अनेकांच्या भेटी घेतल्या. हे सारे करताना अदम्य उत्साहासोबतच प्रचंड आत्मविश्वास नाना पटोले यांच्यात जाणवत होता.