Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अब जमाना बदल गया है
किरण राजदेरकर

निवडणुकीचा आजचा काळ अनुभवताना ‘जाने कहा गये वो दिन’ असाच आठव सध्या समस्त पोलिसांना येत आहे. लोकशाहीत निवडणूक होणारच. मात्र, ही प्रक्रिया पार पाडताना आज येणारे

 

अनुभव पाहता पोलिसांनाही स्वप्नरंजन केल्याशिवाय राहवत नाही. मात्र, याची कबुली पोलीस ‘ऑफ द रेकॉर्ड’च देतील. आजच्यासारखी आचारसंहिता तेव्हा फक्त कागदावरच होती. त्यामुळे पोलिसांवर आज इतके ‘ओझे’ही नव्हते. १९९४ पासून आचारसंहितेच्या पालनाविषयी आग्रह होऊ लागला. आचारसंहितेचा बडगा उगारल्याने आता मूळ पोलिसिंगपेक्षा इतरच कामे जास्त वाढली आहेत. १९९४ पूर्वीही निवडणुका होत होत्या. काही ठिकाणचा अपवाद सोडला तर निवडणुकीत फारसे तंटे होत नसत. मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदान वा मतमोजणीत थोडीफार भांडणे व्हायची ती फक्त शहरी भागात. बोगस व्होटिंग, मतपेटी पळवणे आदीही घटना फारच कमी घडायच्या आणि त्याही शहरी भागात. त्यामुळे आतासारखे ‘टेंशन’ नसायचे.
मतदानाच्या दिवशी ग्रामीण भागात नेहमीप्रमाणे वामकुक्षीही व्हायची, असे काही पोलीस अधिकारी (हळू आवाजात) सांगतात. बोगस व्होटिंगच्या तक्रारी किरकोळ असायच्या आणि त्या गावातच मिटत. त्याचा फारसा बोभाटाही होत नसे. तक्रार करणाराही असा प्रकार फारसा ताणून धरत नसे. एका मतदान केंद्रात एक शिपाई असला तरी चालत असे. कारण, तंटा होण्याचे चान्सेस फारच कमी असायचे. काही ठिकाणी विशेषत: गडचिरोली जिल्ह्य़ातील एखाद्या भागात अपवाद असू शकतो. प्रचार मिरवणुका तेव्हाही निघत. आचारसंहितेचा आग्रह होत नसल्याने मिरवणुकीत किती लोक आहेत, किती वाहने आहेत, लाऊडस्पिकर, झेंडे आहेत काय, घोषणा कोणत्या देत आहेत, याचा विचारच होत नसे. उमेदवाराला संपत्तीचे विवरण, रोजचा हिशेब मागितला जात नसल्याने पोलिसांनाही त्याचे सोयरेसुतक नसायचे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी तेवढी घ्यावी लागत असे. मात्र, बंदोबस्त ही डोकेदुखी तेव्हाही शहर व ग्रामीण भागातही होती. उमेदवारांच्या सभा, मिरवणुकांना कालमर्यादा नसायची. सभा वेळेवर सुरू झाल्याची उदाहरणे सापडणे विरळाच. दिवस कसाही निभून जायचा. डोकेदुखी असायची ती रात्रीची. आजच्यासारखी रात्री दहाची मर्यादा नसल्याने सभा रात्री उशिरापर्यंत चालायच्या. त्याही एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या. दिवसभर काम करून थकलेल्यांची कसोटी लागायची. आचारसंहितेचा आग्रह नसल्याने नेहमीच्या पोलिसिंगलाही वेळ देता येत असे. १९९४, ९८ नंतर चित्र पालटले. आचारसंहितेचे कडक पालन होऊ लागले. त्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त जबाबदारी (ओझे) येऊन पडली. सभा, मिरवणुकींना परवानगी द्या, मिरवणुकीत किती लोक आहेत, याचा अंदाज घेऊन बंदोबस्त तैनात करा, मिरवणुकीत किती वाहने आहेत, किती झेंडे आहेत, घोषणा कुठल्या दिल्या जात आहेत, ठरवून दिलेल्या मार्गानेच मिरवणूक जात आहे काय, सभा कुठे आहे, सभेच्या जागेबाबत ना हरकत प्रमाणपत्र आहे काय, विजेचे कनेक्शन कुठून घेतले त्याचे ना हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक ठिकाणी प्रचार फलक वा झेंडे, लाऊडस्पिकर लागले आहेत काय, असल्यास ते किती, त्याची परवानगी घेतली आहे काय, भिंतीवर प्रचाराचा मजकूर आहे काय, असल्यास त्याची परवानगी घेतली आहे काय, प्रचार रात्री दहा वाजेनंतर कुठे सुरू आहे काय, याचा शोध घेणे आणि संबंधितांवर कारवाई, समाजकंटकांवर कारवाई ही आचारसंहितेनुसार करावयाची कामे पोलिसांनाच करावी लागतात. यासह इतर नेहमीच्या कामाबरोबरच नेहमीची कामेही असायचीच. किमान एक ते दोन महिने हे ओझे कायम असते. आजच्यासारखी आहे त्या ठिकाणी तीन वर्षे झाली असतील आणि होम टाऊन असेल तर बदली ठरलेली. नव्या ठिकाणी गल्लीही माहिती नसते. त्यामुळे काम करणे कठीणच जाते. याआधी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बदली होणे हा अपवाद होता. आचारसंहितेचे हे कडु-गोड अनुभव असले तरी त्यास विरोध असण्याचे कारण नाही. ‘अब जमाना बदल गया है’ अशी स्वत:च स्वत:ची समजूत घालायची नि गुमान डोळे मिटायचे. ‘कालाय तस्मै नम:’ म्हणत सकाळी उठायचे नि रोलकॉलसाठी पळायचे.