Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

रात्री उशिरापर्यंत जनसंपर्काचा धडाका
बुलडाणा लोकसभा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे
सोमनाथ सावळे, बुलडाणा, १३ एप्रिल

जिल्हा बँकेचे दहा वर्षे अध्यक्ष, पंधरा वर्षांपासून सिंदखेडराजाचे आमदार, त्यातील आठ वर्षे राज्यमंत्री, अलीकडेच कॅबिनेट मंत्री, वडील सहकार महर्षी भास्करराव शिंगणे यांच्या पुण्याईचे वारसदार म्हणून कायम वलय, घरीदारी माणसांचा कायम राबता, माणसांच्या गराडय़ात राहण्याची नेहमीचीच सवय ही बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ.

 

राजेंद्र शिंगणे यांची खासियत!
सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दौरे व लोकांची कामे करण्याची सवय डॉ. राजेंद्र शिंगणे यांना झाली आहे. राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघ खेचून आणला आणि उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात घातली. कधी पराभव पत्करायची सवय नसलेल्या डॉ. शिंगणोंनी विजयासाठी परिश्रमपूर्वक प्रचाराचा धडाका चालवला आहे.
रविवार बुलडाण्याच्या बाजाराचा व शासकीय सुट्टीचा दिवस. सकाळपासूनच शहर पिंजून काढायचे त्यांनी ठरवले. २०-२५ कार्यक्रम ठरवले व सकाळी साडेसात वाजता डॉ. राजेंद्र शिंगणे तयार. जिल्ह्य़ातील प्रचार नियोजनाचा मोबाईलवरून आढावा घेऊन त्यांनी मोर्चा वळवला तो जैस्वाल ले-आऊटमधील संपर्क कार्यालयाकडे! तेथे नितीन शिंगणे, सुधीर काळे, सोनुने यांना आवश्यक सूचना देऊन उपस्थित कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला. त्यानंतर त्यांनी बोलेरो गाडी मलकापूर मार्गावरील मिलिंद नगर व सावित्रीबाई नगराकडे वळवली. तेथे राष्ट्रवादीचे युवा नेते संजय गायकवाड व सुरेश कुळकर्णी कार्यकर्त्यांसह स्वागतासाठी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधताना. ते म्हणाले, ‘या लोकसभा निवडणुकीत मी उमेदवार नसून आपणच उमेदवार आहात असे समजून जोमाला कामाला लागा.’ त्यानंतर परदेशीपुरा, भीमनगर, गजानन महाराज मंदिर परिसरात त्यांनी कॉर्नर सभा घेतल्या. एकता नगरात भ्रातृ मंडळाने आयोजित केलेल्या बैठकीस मोठय़ा संख्येने लेवा पाटील बांधव उपस्थित होते. विष्णुवाडी, चैतन्यवाडी, लहाने ले-आऊट, रामनगर, तिरूपती नगर असा सगळा परिसर पायाखालून घालत सर्वाच्या भेटीगाठी घेत डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी चिखली मार्गावरील ढगे फार्महाऊस गाठले. तेथे शहरातील वकील मंडळींशी संवाद साधला. तेथेच घाईघाईने भोजनाचा आस्वाद घेत तातडीने गर्दे वाचनालयात पोहोचले. प्रथम अल्पसंख्याक बांधवाचा व नंतर मातंग समाजबांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दोन्ही मेळाव्याला गर्दी होती. या मेळाव्यांना संबोधित करताना शिंगणे म्हणाले की, ही लढाई धर्माध शक्तीविरुद्ध धर्मनिरपेक्ष शक्ती अशी आहे. विचारांची लढाई आहे.
शहरातील दोन-तीन वॉर्डात कॉर्नर सभा, नंतर व्यावसायिक किंवा सामाजिक समूहाच्या सभा घ्यायच्या, असा धडाका डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा दिवसभर सुरू होता. ऑटो युनियन, टपरीधारक, कामगार, धर्मवीर, सम्राट अशा सर्व संघटनांची गांधीभवनात डॉ. शिंगणे यांनी सभा घेतली.
सिंधी समाज, राजस्थानी समाज, जमाते इस्लामी, एस.टी. कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या बैठकादेखील त्यांनी घेतल्यात. मच्छी ले-आऊट, आरस ले-आऊट, शिवशंकर नगर, इथापे ले-आऊट, संभाजीनगर, तेलुगुनगर, सराफा लाईन, अशा कॉर्नर मिटिंग आटोपल्यानंतर डॉ. िशगणे यांची रात्री मस्तान चौकात जाहीर सभा झाली. त्यानंतर दादावाडीत स्नेहीजनांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक भंडाऱ्यात ते हजर झाले आणि भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी उपस्थित शहरातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. डॉ. िशगणे शहरात जेथे जेथे जात होते तेथे त्यांना प्रतिसाद मिळत होता.
डॉ. राजेंद्र शिंगणे शहरात होते तरी त्यांचे लक्ष पूर्णपणे मतदारसंघावर होते. ते मेहकरात श्याम उमाळकर, देऊळगावराजात डॉ. शेळके, अशोक पाटील, खामगावात सानंदा, शेगावात दयाराम वानखेडे, जळगावमध्ये टापरे, इंगळे प्रसेनजीत अशा सगळ्यांशी संपर्क साधून होते. ‘आता दिल्ली दूर नाही’ असे विचारले असता, ते म्हणाले, "मी कामावर विश्वास ठेवतो. अजून फार काम करावे लागेल. रात्र थोडी सोंगे फार अशी स्थिती आहे. विरोधकांच्या सभांवर जाऊ नका. बुलढाणा मतदारसंघातील जनता शिंगणे घराण्यावर प्रेम करते. काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाइं-शेकाप सगळे जोरात कामाला भिडले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारास पराभूत करूनच ते स्वस्थ बसणार आहेत. तरी पण जागते रहा रात्र वैऱ्याची आहे, असा सल्ला सर्वाना दिला आहे. फिल्डींग टाईट लावली आहे."
शिंगणेंच्या भेटी व जनसंपर्काचा हा धडाका रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. शिंगणे सर्वाना आपले करण्याचा प्रयत्न करीत होते. हसत खेळत सर्वावर जबाबदाऱ्या टाकत होते. अकरा..बारा.. रात्रीच्या गर्भात उद्याचा सोनेरी उष:काल.. त्यांना विजयाचा आत्मविश्वास आहे!