Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘विजयी भव’ ने दिनचर्येला सुरुवात
न.मा. जोशी, यवतमाळ, १३ एप्रिल

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे हरिभाऊ राठोड
निवडणूक प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वी अगदी पहाटे घरी आलेल्या पहिल्या अतिथीला शाल-श्रीफळ देऊन, त्याला नमस्कार करून व त्याच्याकडून ‘विजयी भव’ असा आशीर्वाद घेऊन यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार हरिभाऊ राठोड त्यांच्या दिनचर्येला सुरुवात

 

करतात. त्यांच्या सोबतीला पत्नी मालती उपाख्य कमल राठोड या देखील असतात.
रोज सकाळी हरिभाऊ, त्यांचे कुटुंबीय जगदंबेची आरती केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. दिवसभराच्या निवडणूक सभांना जितके महत्त्व हरिभाऊ देतात, त्यापेक्षा जास्त मतदारसंघातील भागवत कथा, समारंभ, रामनवमी उत्सव, हनुमान जयंती, तरुणसागर महाराजांची प्रवचने, इत्यादी धार्मिक कार्यक्रमांना महत्व देतात. बंजाराबहुल हा मतदारसंघ असल्यामुळे स्वाभाविकच ‘अपणो मणक्यो’ म्हणून बंजारा बांधवांची अमाप गर्दी हरिभाऊंच्या घरी सूर्योदयापासून सुरूहोते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. या पक्षांच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मोटारगाडय़ांचा ताफा सकाळीच दारव्हा मार्गावरील त्यांच्या घरासमोरील मैदानात धडकतो. हरिभाऊंचे विश्वासू कार्यकर्ते गोपाल राठोड, काँग्रेस नेते अशोक बोबडे, अरुण राऊत, संजय राठोड, नीरज आणि पंकज राठोड व्यवस्थापन करून मोटारगाडय़ांचा ताफा मार्गी लावतात. दरम्यान, हरिभाऊ थोडीशी भाजीभाकर आणि बिनासाखरेचा चहा घेऊन,काही औषधे घेऊन प्रचारासाठी रवाना होतात.
शनिवारी तर त्यांनी सकाळी ७.३० ते ११ वाजेपर्यंत यवतमाळ शहरातच लहान-लहान बैठकी घेतल्या. तरुणसागर महाराजांच्या प्रवचनाला हजेरी लावली, तेव्हा सेना उमेदवार भावना गवळीदेखील हजर होत्या. आयोजक खासदार विजय दर्डा यांनी दोन्ही उमेदवारांचे रंगमंचावर आदरातिथ्य केले आणि या दोन्ही उमेदवारांनी तरुणसागर महाराजांचे आणि उपस्थित श्रोत्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर हरिभाऊंनी लगेच अल्पसंख्य समाजाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर स्कार्पिओ गाडीत बसून रुई गावाकडे कूच केले. रुई येथे बाबासाहेब गाडे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा हरिभाऊंच्या प्रचारासाठी आयोजित केला होता. रुई सारख्या ग्रामीण भागात ५० च्या वर सुमो गाडय़ांचा ताफा आणि ५ हजारच्यावर जनता हरिभाऊंच्या स्वागतासाठी तयार होती. ढोलताशांच्या निनादात हरिभाऊंची मिरवणूक सुरू झाली. उन्हात सभास्थानी पोहोचण्यापूर्वी हरिभाऊंनी जागृत देवस्थान असलेल्या नृसिंह मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
खासदार असताना रेणके आयोग स्थापन करवून त्याच्या शिफारशीच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करीत होतो. आताही या शिफारशी माझी प्रतीक्षा करीत आहेत. संसदेत पोहोचवल्यावर या शिफारशींची मी अंमलबजावणी करणार आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी येथील सभेत सांगून धमाल उडवून दिली, कारण त्यांच्या म्हणण्याचा आशय ‘मी मंत्री होणारच आहे’ असा होता.
राष्ट्रवादीच्या सभेत वक्तयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना हरिभाऊंनी दिलखुलास उत्तरे दिली. भारतीय जनता पक्षाला मनमोहन सिंग सरकार पाडायचे होते आणि अणुकराराचा विरोध करायचा होता. मात्र, राष्ट्रहितापेक्षा भाजपला पक्षहित जास्त प्रिय आहे, याची मला खात्री झाली म्हणून मी पक्षादेश झुगारला, खासदारकीचा त्याग केला आणि मनमोहन सिंग सरकार वाचवले. माझ्यावर कोटय़वधी रुपये घेतल्याचाही चौफेर आरोप झाला. मात्र, जेव्हा काँग्रेसने माझी उमेदवारी जाहीर केली तेव्हा भल्या-भल्यांचाही गैरसमज दूर झाला. मी पैसे घेतले असते तर काँग्रेसने मला उमेदवारी दिलीच नसती, असे हरिभाऊंनी सांगितले. भाषणात हरिभाऊ जागोजागी दिलखुलास विनोदाची पेरणी करतात आणि श्रोत्यांना खिळवून ठेवतात. खासदारकीच्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा आणि लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांचा आढावा ते घेतात. वर्धा-नांदेड मार्गे यवतमाळ या मार्गासाठी केलेले प्रयत्न असो की, रेणके आयोगाच्या अंमलबजावणीसाठी उपसलेले कष्ट असोत, हरिभाऊ पोटतिडिकीने बोलत असतात.
निवडणूक प्रचाराला जाताना हरिभाऊ एक बॅग हातानी घ्यायचे, इन्सुलीनचे इंजेक्शन इत्यादीची तयारी कमल राठोड करून देतात. दोन मोबाईल आणि दोन स्कार्पिओ गाडय़ा ठेवतात. सोनिया गांधींचा यवतमाळात दौरा झाल्यापासून हरिभाऊंचा उत्साह शिगेला पोहोचला आहे आणि त्यांना विजयाची शंभर टक्के खात्री आहे. मानोराच्या आदिवासी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आदिवासी नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी तर हरिभाऊ राठोड हे ६० हजार मताधिक्याने निवडून आल्याचे आताच जाहीर करून हरिभाऊंना ‘आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ ची खात्री दिली.
सकाळी आठ वाजता पोटात दोन घास घालून निवडणूक प्रचाराला निघालेले हरिभाऊ ४ वाजेपर्यंत काहीही खात नाहीत. ४ वाजता एखाद्या कार्यकर्त्यांच्या घरी मिळेल त्याच्यावर ताव मारून औषध गोळ्या घेऊन सुसाट वेगाने पुढील गावात आयोजित सभेसाठी जातात. प्रत्येक सभेत त्यांच्या भाषणाचे मुद्दे मात्र ‘माहोल’ पाहून असतात. कुठे रेणके आयोग, कुठे कर्जमाफी, कुठे पॅकेज, कुठे रेल्वे, कुठे संसदेतील प्रश्न, तर कुठे विरोधी उमेदवार भावना गवळी यांच्या तुलनेत संसदेत घेतलेली आघाडी.. असे त्यांच्या भाषणाचे स्वरूप असते. रात्री १० पर्यंत हरिभाऊंचा प्रचारदौरा, कार्यकर्त्यांशी भेटीगाठी, त्यांचे रुसवे फुगवे दूर करणे, प्रचार साहित्य, मोटारगाडय़ांची व्यवस्था इत्यादी सांभाळण्यात वेळ जातो. हरिभाऊंवर लक्ष्मी प्रसन्न असल्याचा दावा एका ज्योतिष्याने कुंडली काढून केला आहे आणि ही कुंडली कार्यकर्त्यांंजवळ पोहोचली असली तरी निवडणुकीचा जगन्नाथांचा रथ देशभरातील असंख्य कार्यकर्ते ओढतात, असा हरिभाऊ दावा करतात.
‘सोनियाची संजीवनी’
प्रकृती अचानक बिघडल्याने येथील ‘संजीवनी’ सुपर स्पेश्ॉलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले हरिभाऊ राठोड यांच्यावर उपचार करून निवडणूक प्रचार दौऱ्यासाठी ‘फिट’ केले असले तरी खरी ‘संजीवनी’ त्यांना सोनिया गांधींच्या दौऱ्यानेच प्राप्त झाली. हा मजेदार किस्सा स्वत: हरिभाऊ आपल्या अनेक प्रचारसभांमध्ये सांगून हास्याची खसखस पिकवतात. अर्थात ही ‘सोनिया संजीवनी’ किती प्रभावी व उपचारकारक ठरली, हे बाकी मे महिन्यात दिसणारच आहे.