Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘कोरी पाटी’ मतदारांच्या भेटी!
नागपूर लोकसभा मतदारसंघ भारिप बहुजन महासंघ डॉ. यशवंत मनोहर
ज्योती तिरपुडे, नागपूर, १३ एप्रिल

मी भारतीय समाजाचा अभ्यासक आहे. सांप्रदायिक सद्भाव नांदावा, वृद्धिंगत व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. आरोग्य, स्वच्छतेबरोबरच माणसाच्या मनाची स्वच्छताही महत्त्वाची आहे. स्वच्छ

 

मनांच्या निर्मितीचे स्वप्न लोकसभा उमेदवारीच्या रूपात आपण पहात असतो. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आमच्या भारिप बहुजन महासंघ आणि लोकमोर्चाकडे काँग्रेस, भाजप आणि बीएसपी सारखा बक्कळ पैसा नाही. त्यांच्यासारखा प्रचाराचा भपकाही आम्ही निर्माण केला नाही. अतिशय शिस्तबद्धपणे आणि गुप्तपणे आम्ही आमच्या बैठका, घरगुती सभा, पदयात्रा, मिरवणूक आदींचा सनदशीर मार्गाने आणि लोकसभा निवडणुकीत अपेक्षित असे प्रचार कार्यक्रम आम्ही घेतले आहेत. ‘पाटी’ या चिन्हावर मतदान करून मला विजयी करण्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांचा आणि तुमचा विजय करा, असे भावपूर्ण आवाहन डॉ. यशवंत मनोहर यांनी आज प्रचार सभांमधून केले.
साठी ओलांडलेले डॉ. मनोहर आज तरण्या उत्साहाने लोकांच्या भेटीगाठी त्यांच्या अडीअडचणींना सामोरे जात होते. सकाळी त्यांची सभा आनंदनगर येथे इंदिरा जीवने यांच्या घरासमोर केशव मेश्राम, अ‍ॅड. संजय नगरारे, गीता जीवने, विठाबाई खोब्रागडे, रूपा तिरपुडे, कवी प्रमोद वाळके, धनराज हनवते, लीलाधर गौरखेडे, वनमाला उके आदींच्या सहकार्याने पार पडली. या भागातील कार्यकर्त्यांनी ‘पाटी’लाच मत देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर लगेच दुसरी कॉर्नर मिटिंग बेझनबाग येथील राजेश घरडे यांच्या घरासमोर घेण्यात आली.
दुपारी गिट्टीखदान चौकापासून पदयात्रेला सुरुवात झाली. गिट्टीखदान, पंचशीलनगर, गवळीपुरा, आझादनगर, धम्मनगर, कृष्णनगर, गोंड मोहोल्ला आदी भागातून पदयात्रा निघाली आणि धम्मनगर येथे एका चौकात तिचे सभेत रुपांतर झाले. सभेचे नेतृत्व ज्येष्ठ नागरिक श्रीमती वाघ यांनी केले. या भागातील विविध विहारांच्या परिसरामध्ये उद्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जय्यत तयारी सुरू होती. विहारांची रंगरंगोटी स्त्रिया आणि लहान मुले करीत होते. त्यांच्यासोबतच अनेक स्त्रीपुरुष मनोहरांच्या सभेला उपस्थित होते.
मिरवणूक केवळ मुख्य रस्त्याने जात असल्याने रस्त्याच्या कडेची घरे, दुकाने, लहान मुलांच्या हाती पत्रके सोपवून मिरवणुकीतील कार्यकर्ते पुढे सरकत होते. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूला आतमध्ये असलेल्या घरांपर्यंत उमेदवार वेळेअभावी तयेच डोक्यावर असलेल्या कडक उन्हं आणि पुढील सभांच्या आयोजनामुळे पोहोचू शकत नव्हते. वाटेत विविध जातीधर्माचे लोक डॉ. मनोहर यांना येऊन भेटत होते. त्यांच्या अडीअडचणी सांगत होते. सभेतील कार्यकर्ते व नगरसेवक डॉ. मिलिंद माने यांना काही महिलांनी उमेदवार वस्तीत सुधारणा करीत असल्याचा अनुभव कथन केला. त्यांचे शंका निरसन डॉ. माने यांनी केले. सायंकाळी ख्रिश्चन समाजाची बैठक जरिपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टिननगर येथे पार पडली. त्यानंतर लगेच पडोळेनगरच्या जयभीम चौकात सभा झाली. याही ठिकाणी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या भागात पत्रकांचे वाटप करून महिला पुरुष कार्यकर्त्यांनी ‘पाटी’ला मत देण्याची विनंती वस्तीतील नागरिकांना केली.
सरतेशेवटी दीपक वासे यांच्या घराजवळ लष्करीबाग या ठिकाणी शेवटची सभा पार पडली. प्रत्येक सभेमध्ये त्रिमूर्तीनगर विहारातील भदंत एन. बोधिरत्न नायकथेरो, नगरसेवक राजू लोखंडे, रंजना रंगारी, कुसुम घुटके, पारंबा सोमकुंवर, करुणा बागडे, हिरालाल रंगारी, पुरुषोत्तम पुडके, किरण डोंगरे, शेखर मेश्राम, प्रवीण पाटील आणि सुनील मेश्राम आदी कार्यकर्ते डॉ. मनोहर यांच्या सोबत संपूर्ण सभा, मिरवणूक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.