Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘हाथी’ चले ‘कॅडर’ की चाल!
नागपूर लोकसभा मतदारसंघ बसपचे माणिकराव वैद्य
राजेश्वर ठाकरे, नागपूर, १३ एप्रिल

नागपूर लोकसभा मतदार संघाच्या लढतीत निर्णायक भूमिका बजावू शकणारे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार माणिराव वैद्य यांच्या प्रचाराला बसपाच्या ‘कॅडर’च्या शिस्तीची जोड मिळाल्याने

 

एका दिवशी जास्तीतजास्त भागात प्रचार करणे त्यांना शक्य झाले आहे.
भर उन्हात खुल्या जीपमध्ये उभे राहून छोटय़ाछोटय़ा गल्लीतून ‘रॅली’ निघते. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून माणिकराव दोनतीन कांदे निळ्या रंगाच्या गमछ्यामध्ये ठेवून डोक्याला बांधतात. काशीनगर, रामेश्वरी, भगवाननगर, कैलासनगर, बालाजीनगर, ज्ञानेश्वरनगर, सुभेदार ले-आऊट, सोमवारी क्वॉटर्स, तुकडोजी चौक, विश्वकर्मानगर, बजरंगनगर, वसंतनगर, मेडिकल कॉलनी, चंद्रमणीनगर, कौशल्यानगर, कुकडे ले-आऊट, वंजारीनगर, उंटखाना, चंदननगर, वकीलपेठ, सिरसपेठ आदी भागातून रॅली फिरते. जागोजागी हार घालून माणिकरावांचे स्वागत होत असते. काही भागात महिला-मुले घराबाहेर येऊन रॅलीत काहीवेळ सहभागी होतात. उंटखाना येथील प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून माणिकरावांचा विश्वास दुणावतो.. आणि ‘बहुजनांचे पंचप्राण, कांशिराम.. कांशिराम’ असा जोरदार नारा ते देतात. सायंकाळी ७ वाजतापासून नागपुरात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभांना ते संबोधित करतात.
त्रिमूर्तीनगरातील माणिकरावांच्या निवासस्थानाहून सकाळी त्यांच्या प्रचारयात्रेचा कार्यक्रम सुरू होतो. घराबाहेर पडण्यापूर्वी आदल्यादिवशी केलेल्या प्रचार कार्याचा आढावा घेणे, दिवसभराच्या कार्यक्रम पत्रिकेवर नजर टाकणे, महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे, विविध विधानसभा मतदारसंघातील पक्ष प्रमुखांच्या सूचना ऐकणे असा त्यांचा कार्यक्रम असतो.
मानेवाडा मार्गावरील सूरजभवन येथील त्यांच्या प्रचार कार्यालयाकडे माणिकराव निघतात. यावेळी त्यांच्यासोबत अगदी दोन-चार कार्यकर्ते होते. कार्यकत्यांची उर्वरित फौज शहरातील विविध ठिकाणी जाहीर सभांचे आयोजन करण्याच्या कामात गुंतलेली असते. बसपाच्या प्रचारांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे कार्यकर्ते ‘हत्ती’ला मते मागतात. यात उमेदवार कोण आहे, ही बाब गौण ठरते. एका मिशनवर निघाल्यागत प्रत्येक कार्यकर्ता प्रचारात गुंतलेला दिसतो. त्यामुळे उमेदवार आमच्या भागात आलाच नाही, अशी ओरड बसपाने टारगेट केलेल्या मतदारांमध्ये दिसून येत नाही. दरम्यान, माणिकराव वैद्य यांचे भ्रमणध्वनीवरून कुणान्कुणाशी अखंड संपर्क सुरुच असतो.
नियोजित कार्यक्रमानुसार सभास्थानी माणिकराव पोहोचतात तेव्हा सारी तयारी पूर्ण करून कार्यकर्ते त्यांची वाटच पाहात असतात. आल्याआल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, चर्चा होतात. कोणत्या भागात काय करावे लागेल याविषयी ते माहिती घेतात. दुपारी दोनपर्यंत सभा आणि प्रचार फेरींचा हा कार्यक्रम सुरु असतो. त्यानंतर जेवणासाठी सारेजण सूरज भवनला पोहोचतात. साधेच पण रुचकर जेवण आणि थोडी विश्रांती घेतल्यानंतर दुपारी चारपासून कार्यकर्त्यांच्या बैठकी, ‘नुक्कड सभा’ंना पुन्हा सुरुवात होते. बसपाचा प्रत्येक ‘कॅडर’ कार्यकर्ता स्वत:च उमेदवार असल्यागत या प्रचारात स्वत:ला झोकून देतो, असे टप्प्याटप्प्यावर माणिकराव वैद्य यांच्यासोबत प्रचार फेरीत फिरताना जाणवते. ‘मनुवादी विचारधारेला’ प्रतिउत्तर ‘मानवतावादी विचार’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आणि त्याची जोपासना करण्याचे काम बसपाने केले, असा दावा ते प्रचारयात्रेत करतात.
भाजपच्या संस्कृतीत काही काळ राहलेले माणिकराव वैद्य यांची दैनंदिनी या निवडणूक प्रचारामुळे पार बदलून गेली आहे. सकाळी ७ वाजता उठून दिवसभराच्या अशा अतिव्यस्त कार्यक्रमानंतर रात्री २ वाजता झोपी जाणे असा सध्या नित्यक्रम झाला आहे.