Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्रात जात फॅक्टर पवारांनी आणला -राऊत
राखीव मतदारसंघांची पद्धत बंद करा
बुलढाणा, १३ एप्रिल / प्रतिनिधी

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जात फॅक्टर आणला तो नष्ट करायचा असेल तर प्रथम जातीच्या आधारावरील राखीव मतदारसंघ रद्द केले पाहिजेत, अशी ही शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना कधीही जात-पात मानत नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी

 

येथे रविवारी आयोजित पत्रपरिषदेत केले.
शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी संजय राऊत बुलढाणा जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले होते. शनिवारी सकाळी हॉटेल राधेयमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीवर शिवसेना नेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्यामुळे शिवसेना लोकसभेच्या ज्या जागा आहेत, त्या टिकवून त्यामध्ये पाच खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. देशाचे राजकारण वेगळ्या मार्गाने सुरू आहे. सत्ताधारी केवळ स्वार्थी राजकारण करत आहेत. हिंदुस्थानात वेगवेगळ्या मुद्दय़ावर निवडणुका लढवल्या जातात. परंतु, महाराष्ट्रातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष एकत्र येत नाहीत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. शिवसेना हा लोकांना आपला वाटणारा पक्ष आहे. मराठीच्या मुद्दय़ावर शिवसेना ठाम असून, शिवसेना प्रमुखांची मराठी अस्मिता जपण्याची भूमिकाही सर्वानाच माहीत आहे. एनडीएत असताना महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी माणसासाठी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. मराठीच्या मुद्दय़ावर शिवसेनेची मुळे रुजलेली आहेत. प्रांतीय पक्षांची मुहूर्तमेढ शिवसेना प्रमुखांनी रोवली तेव्हा त्यांना हिणवलं. परंतु, त्यांनतर सर्वत्रच प्रांतीय पक्ष निर्माण झाले. आता तर शरद पवारांचा पक्षही मराठी मराठी करत फिरत आहे. अखंड महाराष्ट्रासाठी विदर्भ-मराठवाडय़ातील अनेकांनी बलिदान दिले आहे, तसेच सीमा प्रश्नाकरिता ६९ हुतात्मे विदर्भ-मराठवाडय़ाने याच महाराष्ट्रातून दिले. संपूर्ण राज्याच्या विकासाचा समतोल राखला तरच राज्य अखंड राहील.
याच विदर्भातील सुधाकरराव नाईकांसह अनेक नेत्यांनी सत्ता गाजवली, तेवढी कोणीच गाजवली नाही. विदर्भातील नेते मुंबईत स्थायिक होतात, त्यानंतर मात्र विदर्भालाच विसरून जातात, हे विदर्भाचं दुर्दैव म्हणावे लागेल. सध्या पवारांनी आणलेला जात फॅक्टर नष्ट करण्याची गरज आहे. त्यासाठी राखीव मतदारसंघ रद्द करा, म्हणजे दुर्बल घटकातील लोकांना निवडून देता येईल व गोरगरिबांना न्याय मिळेल, असेही ते म्हणाले.
पत्रकारांनी राणेंबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, नारायण राणे हा लहान विषय आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध वैचारिक लढाई आहे. स्वत:च्या एजंटाशी काय लढायचं. शिवसेना सातबारा कोरा करायला निघाली पण, उद्धव ठाकरे यांना सातबारा कळतो काय या पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत सडेतोड उत्तर देताना म्हणाले, पवारांना सातबारा चांगला कळतो, कारण त्यांच्या जमिनी, मालमत्ता सिंगापूरसह अन्य काही देशात आहेत. कार नाही, घर नाही, असे ते अर्ज भरताना दाखवतात, मग ते काय बसने प्रवास करतात की, बारामती ते मुंबई सायकलने जातात, असा सवालही राऊत यांनी केला. शिवशक्ती-भीमशक्तीचा विचार शिवसेनेने ४० वषार्ंपूर्वीच दिला आहे. तो काही आजचा नाही. ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’ ची नीती आमची नाही. बीओटी तत्त्वाचे धोरण मुळीच नाही. शिवसेनेने सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांला निवडून आणले आहे. शिवसेनेत कोणीच ‘स्टार’ प्रचारक नाही, आहेत ते केवळ उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवार, असेदेखील त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.