Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पदयात्रा.. रिअल की मॅनेज्ड?
लोकसभेच्या िरगणात उतरलेल्या उमेदवारांना अनेक कटकटींना रोजच तोंड द्यावे लागत असले, तरी दोन गोष्टींमुळे त्यांचा उत्साह खचित रोजच वाढत असणार! पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या पदयात्रांना मिळत असलेला उत्स्फूर्त, भरघोस प्रतिसाद आणि या पदयात्रांच्या, जीपयात्रेच्या,

 

रथयात्रेच्या छापून येणाऱ्या तितक्याच भरघोस बातम्या!
निवडणुकीतील पदयात्रा किंवा जीपयात्रा हा एक सोहोळाच असतो. ही यात्रा जिथून सुरू होणार असते, तेथील ‘स्थानिक’ कार्यकर्ते कडक कपडय़ांनिशी वेळेपूर्वीच ‘रेडी’ असतात. उमेदवार त्याच्या घरून निघाल्याचा मोबाईल कुणा स्थानिक भाऊ वा दादाला वा ‘माननीया’ला आला, की मग तर लगबग विचारायलाच नको. आसपासच्या घरात स्वागताचे आदेश सुटतात. मग घराघरांतली मंडळी सहकुटुंब स्वागताला सिद्ध होतात. मग उमेदवाराचा ताफा येतो. यात्रेच्या प्रारंभी औक्षण, उमेदवाराला पेढा भरवणे, हार घालणे असे सोपस्कार आणि मग फेरी सुरू होते..
प्रत्येक घरात, जुन्या वाडय़ांत, वस्तीवस्तीत, सोसायटीत, अपार्टमेंट्समध्ये, दुकानांमध्ये अगदी सगळीकडे जावे तिकडे उमेदवाराचे स्वागतच होते. जयजयकार होतो. फार कशाला, आम्ही सारे तुमचेच, अशी ग्वाहीसुद्धा जागोजागी मिळते. तीन-चार तासांची अशी प्रचारफेरी आटोपली, की उमेदवार, कार्यकर्ते आणि नेते खूश होतात. प्रतिसादाने भारावतात. कौतुकाने सुखावतात. दुसऱ्या दिवशी बातम्या वाचून आणखीच खूश होतात.
पूर्वीचे दिवस गेले आता. आताच्या मानाने पूर्वीचे लोक ठाम मतांचेच म्हणायचे. ज्या पक्षाचा जोर ज्या भागात असायचा, त्या पक्षाच्या उमेदवाराचेच फक्त त्या भागात स्वागत व्हायचे. दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आला, तर त्याला बघायलाही कुणी जायचे नाही. पदयात्रा आणि सभांच्या प्रतिसादावरून पूर्वी निवडणूक निकालाचा अंदाज लावला जायचा. पदयात्रेत खरोखरी कार्यकर्तेच असायचे. आता पदयात्राही ‘मॅनेज’ होतात. ‘स्टार्ट टू एन्ड’ चालण्यासाठी पन्नास, शंभरजण पैसे मोजून आणले जातात. त्यांची वेळ संपली की मग ते पदयात्रा सोडून जायलाही कमी करत नाहीत.
त्यामुळेच प्रत्येक पक्षातील जुने-जाणते कार्यकर्ते सध्या खासगीत म्हणतायत, अरे बाबांनो, या पदयात्रेच्या, जीपयात्रेच्या ‘प्रतिसादा’वर जाऊ नका. लोक फार हुशार झालेत आता. ते प्रत्येक उमेदवाराचेच ‘जंगी’ स्वागत करतात आणि शेवटी त्यांनी जे ठरवलेले असते तेच करतात..
पण अशा जुन्या-जाणत्यांचे काही ऐकायला सध्याच्या ‘प्रचारयुद्धा’त कुणापाशीच वेळ नाही. जुने, अनुभवी आता अडगळीत गेलेत. त्यांचे राजकीय शहाणपण कोणी विचारातच घेत नाही. अगदी गेल्या आठवडय़ात पक्षात आलेला कार्यकर्ता जुन्या कार्यकर्त्यांला ‘तुम्ही सायकलीवर प्रचार करायचात. म्हणून आता आम्ही पण तसंच करायचं का,’ असा प्रश्न करायला कमी करत नाही. परवा एका पक्षाच्या कार्यालयात काही जुने कार्यकर्ते बसले होते. पत्रकाराला ते म्हणाले, आमचं तर कुणी ऐकतच नाही, निदान तुम्ही तरी आमच्या उमेदवाराला सांगा, नाहीतर लिहा, की तुमच्या प्रचारफेऱ्या किती ‘रिअल’ आणि किती ‘मॅनेज’ आहेत याचा जरा शोध घ्या. नाहीतर..
फिरस्ता