Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्रचारादरम्यान डॉ. बाबासाहेबांसोबतचे मालतीबाईंचे दोन अविस्मरणीय दिवस
आज डॉ. आंबेडकर जयंती
वामन तुरिले, भंडारा, १३ एप्रिल

१९५४ च्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीतील एक उमेदवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहवासात दोन दिवस राहिलेल्या, आज वयाची सत्तरी ओलांडलेल्या डॉ. मालतीबाई रहाटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना, बाबासाहेबांच्या आत्मीयतेचा त्यांना आलेला

 

अनुभव सांगितला.
मालतीबाईंचे वडील पंढरीनाथ मेंढे हे भंडारा येथे फर्निचर तयार करणे तसेच सिलाई मशीन दुरुस्तीच्या कामाकरिता प्रसिद्ध होते. निवडणूक काळात ठिकठिकाणी डॉ. आंबेडकरांकरिता ‘स्टेज’ उभारण्याचे काम त्यांच्याकडेच आले होते, तर बाबासाहेब आणि सोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था सुभद्रा पंढरीनाथ मेंढे आणि त्यावेळी नुकतीच ११वी मॅट्रीकची परीक्षा दिलेल्या, मालती मेंढे यांच्याकडे होती. बाबासाहेबांना विजयी करण्याचा विडा उचलून रात्रंदिवस खपणारे दादासाहेब गायकवाड, भातनकर, भालेराव, माने, बी.सी. कांबळे ही नाशिक-मुंबईची मंडळी भंडारा येथे निवडणूक काळात मुक्कामाला होती. ही मंडळी अगदी पहाटे विहिरीवर आंघोळ करायची आणि लवकरच प्रचारकार्याला बाहेर जायची. मिळेल तसा नास्ता, जेवण बाहेर करीत. रात्रीचे जेवण मात्र मेंढे यांच्याकडे होई. तेथे स्थानिक कार्यकर्त्यांसोबत गप्पा रंगत. त्यानंतर पाहुणे कार्यकर्ते शेजारच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झोपत.
बाबासाहेबांकरिता डबा जायचा. हा डबा भातनकर स्वत: तयार करायचे. मालतीला बाबासाहेबांना भेटायची प्रबळ इच्छा होती. डबा घेऊन भातनकर कोलत्यांच्या बंगल्याकडे, जेथे बाबासाहेब व माईसाहेब मुक्कामाला होते, तिकडे निघाले. त्यांनी मालतीला सोबत घेतले. भातनकरांनी टेबलावर डबा लावला, प्रचाराच्या दगदगीने बाबासाहेब थकलेले दिसत होते. हळूहळू भिंतीचा आधार घेत ते टेबलाजवळ आले. सोबतीला माईसाहेब होत्या. जेवताना भातनकरांनी मालतीची बाबासाहेबांना ओळख करून दिली व सांगितले, "आम्ही यांच्याकडे जेवण करतो." मालतीने नुकतीच ११वीची परीक्षा दिल्याचेही त्यांनी सांगितले. बाबासाहेब मालतीला म्हणाले, "पुढे काय शिकायचे?" मालतीने डॉक्टर व्हायची इच्छा व्यक्त केली. त्यावर आनंद व्यक्त करीत बाबासाहेब म्हणाले, "कोणतीही मदत लागली तर सांग." उद्या, वडिलांना घेऊन ये, असेही बजावले.
सायंकाळी भंडाऱ्याकत प्रचारसभा होती. भव्य व्यासपीठावर माई आंबेडकरांसोबत मालती आणि तिची मैत्रीण द्रौपदी गजघाटे देखील बसल्या होत्या. दोघींनाही बाबासाहेबांचे भाषण फारसे समजले नाही. बाबासाहेबांच्या भाषणाच्या वेळी माईसाहेबांनी बाबासाहेबांना घातलेल्या मोगऱ्याच्या फुलांच्या हारांमधून दोन वेण्या बनवून मालती व तिच्या मैत्रिणीला माळून दिल्या. तिसरी वेणी स्वत:करिता केली. त्यादिवसाबाबत बोलताना मालतीबाईंनी सांगितले, "बाबासाहेबांचे भाषण कळले नाही. जे काही कळले असेल तेही आता विसरले, परंतु वेण्यांची आठवण विसरली नाही. तधीच विसरणारही नाही."
दुसऱ्या दिवशी साकोली येथे जाताना बाबासाहेबांनी त्यांची गाडी पंढरीनाथ मेंढे यांच्या घरासमोर उभी केली. मालतीची आई सुभद्रा यांना बाबासाहेब भेटले व धन्यवाद दिले. जातांना त्यांना आवर्जून म्हणाले," पोरीला खूप शिकवा!"