Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
विशेष लेख

दलित आणि सवर्ण एक होतील का?

लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. आणि आज घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव दिन. निवडणुकीच्या रणधुमाळीत आंबेडकरी विचारधारेचे प्रेम किती खरे आणि खोटे आहे याचा मागोवा यानिमित्ताने घेणे आवश्यक वाटते.
ठिकठिकाणी प्रचाराच्या सभा होत आहेत. त्यात आश्वासनांचा पाऊस, घोषणांचा पाऊस. ‘काँग्रेस पक्षाला धूळ चारा’, ‘दलित शोषित, कामगार, शेतकरी सुखी नाहीत,’ ‘आमच्या सरकारकडे जीवदान देणाऱ्या योजना असतील’ अशी सगळी घोषणांची खिरापत ऐकायला, वाचायला मिळते आहे. विजय आपल्याच दारी येणार आहे अशा नशेत माणसे/पुढारी काहीही बोलतात त्यालाच ‘शहाणपण’ म्हटले जाते आहे. असे सगळे वातावरण. त्यात परवा बसपाच्या अध्यक्षा व उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री मायावती मुंबईत शिवाजी पार्क येथे प्रचाराला अडीच तास उशिरा पोहोचल्या. तरी भर उन्हात शिवाजी पार्क येथे गर्दी कमी झाली नाही. त्या दिवशी सुटी नव्हती, तरी जनता मायावतींची आतुरतेने वाट पाहत बसली होती. असे का घडते आहे? जनतेला बदल हवा आहे का?
‘उत्तर प्रदेशात झोपडपट्टीवासीयांना घरासाठी ३० चौरस मीटर जागा,व व्यवसायासाठी १५ चौरस जागा देऊनही, त्यांना बांधकामाचा खर्चही दिला आहे. हे धोरण देशभर राबविले जाईल,’ असे मायावती टाळ्यांच्या गजरात म्हणाल्या. हे नेमके कार्य मायावती उत्तर प्रदेशात करू शकतात. हे त्या सभेत जाणवत होते. पण महाराष्ट्रात हे कोण करू शकते? या प्रश्नावर कुणाकडेच उत्तर नव्हते. त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस सतीश मित्रा हे सवर्ण आहेत. त्यांचा पक्ष एका वर्गाचा नसून ब्राह्मण- मुस्लिम-बनिया-ठाकूर-दलित-शोषित- ओबीसींचा झाला आहे. महाराष्ट्रात असा पक्ष उदयाला येईल का? अथवा बसपात फुले- शाहू- आंबेडकर विचारधारा मानणारा समाज विलीन होईल का, हा प्रश्न आता आंबेडकरी शिक्षित वर्गाला पडू लागला आहे.

 


‘सारा भारत जातिविरहिीत व्हावा’ हे स्वप्न बाबासाहेबांनी उराशी बाळगलेले होते. त्यासाठी मायावती आपल्या प्रचारसभेत हे स्वप्न पुरे करण्याचा आग्रह धरतात का? असा आग्रह त्या का धरीत नाहीत? या निवडणुकीत ब्राह्मण-दलित एकत्र येणार असतील तर त्यांची टक्केवारी किती असेल? ही निवडणूक मायावतीच्या विचाराने थोडय़ाफार फरकाने यशस्वी झाली तर! महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत ब्राह्मण- दलित- मुस्लिम- शोषित- ओबीसी यांना विचार करावा लागेल. असेही म्हटले जाते.
बाबासाहेबांचे निशाण हत्ती बसपाला मिळाले. बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा देताना ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्यात ‘देव मानणार नाही’ या प्रतिज्ञेचा मायावतींना विसर पडलेला दिसतो. मराठी आंबेडकरी समाजाला यातला विरोधाभास सतत जाणवत राहिला आहे. मागच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत ‘हाथी नहीं, गणेश है; ब्रह्मा विष्णू महेश है’ ही घोषणा मराठी मुलुखात फुले- शाहू- आंबेडकरी समाजाला मात्र संभ्रमात टाकणारी होती. मग मायावतींना हिंदुत्ववादीम्हणायचे की आंबेडकरवादी? मायावतींनी बुद्धापासून, बाबासाहेबांपासून कोणत्या विचारांची प्रेरणा घेतली? मायावतींचा आदर्श कोणता? असे अनेक प्रष्टद्धr(२२४)न संवेदनशील, आंबेडकरी समाजालाच नव्हे तर महाराष्ट्रातील जागृत जनतेला पडत आहेत. राजकारणात सत्तेच्या हत्तीवर विराजमान होणाऱ्या मायावतींना महाराष्ट्रातल्या या विचारधारेचे भान आहे का?
रिपब्लिकन पक्ष आणि डॉ. बाबासाहेबांच्या नावाने अनेकांनी स्वत:च्या अनेक चुली आणि उपचुली मांडल्या आहेत. त्या सगळ्या चुली बंद करून एकच चूल मांडावी लागेल.
‘शासनकर्ती जमात व्हा’ हे जरी बाबासाहेबांचे स्वप्न बसपाने यशस्वी केले असले तरी महाराष्ट्रात, आर.पी.आय.चे नेते आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून मायावतींच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन निवडणुका लढविल्या तरच महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा विजय होऊ शकला असता. पण तीही आता वेळ निघून गेली आहे. कारण निवडणुका तोंडावर आहेत. आणि ‘एकी’चा पत्ता नाही! कधी होणार ही ‘एकी’?
आर.पी.आय.चे एकूण ३३-३४ गट म्हटल्यास आणि महाराष्ट्रात बौद्ध समाज नऊ ते दहा टक्के धरला तरी, रिपब्लिकन पक्षाची किती मोडतोड झालेली आहे ते लक्षात येईल. त्यात बसपाच्या एकूणच हत्तीच्या चालीमुळे डाव्यांनासुद्धा विचार करायला भाग पाडले आहे. उत्तर प्रदेशातल्या भाजपच्या धार्मिक राजकारणातली हवा तिथल्या जनतेने काढून घेतली आहे, हा मायावतींच्या विचाराचा विजय आह, हेही आपल्याला मान्य करावे लागते. कारण मायावतींनी सगळ्या बहुजन समाजाला अधिक वरच्या वर्गाला सत्तेत सामील करून घेतले आहे. हाच प्रयोग २००९ च्या निवडणुकीत त्या दाखवून द्यायला सज्ज झाल्या आहेत. त्यांचे अंतिम लक्ष्य ‘हत्तीची सत्ता’ हेच आहे. पण महाराष्ट्रात फुले- शाहू- आंबेडकर समाज नेते हे स्वत:ला काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यांच्या दावणीला बांधून घेत आहेत. त्यामुळे इथे असे प्रयोग यशस्वी होतील का?
मायावती जरी आंबेडकरांच्या विचारधारेत पूर्ण चपखल बसत नसल्या तरी ‘शासनकर्ती जमात व्हा’ या परीक्षेत त्या पास मात्र होताना उत्तर प्रदेशात दिसत आहेत. शोषित समाजातली एक स्त्री धर्माधवादी उत्तर प्रदेशाची मुख्यमंत्री होते, ही बाब साधी नाही. या प्रतिगामी राज्यात परवा-परवापर्यंत दलितांना गावाकडे हॉटेलच्या मागच्या बाजूने कान तुटलेल्या कपात चहा मिळत होता. (शाहजहाँपुरला मी प्रत्यक्ष पाहिले आहे.) तिथे मायावतींनी सगळ्या प्रवाहांना एकत्र आणून यशस्वी राजकारण केले. हे एका रात्रीत घडत नसते. म्हणूनच मायावतींचे रसायन म्हणजे संशोधनाचा विषय होऊ शकतो. यावर महाराष्ट्रातील अभ्यासूंनी पीएच. डी. करायला हरकत नाही!
डॉ. बाबासाहेबांचे निकट सहकारी दलितेतर होते. मनुस्मृती तर एका ब्राह्मण सद्गृहस्थाने जाळली. म्हणजे बदल अथवा परिवर्तनाची सामाजिक, राजकीय लढाई ही दीर्घकालीन असते, ही बाबासाहेबांची शिकवण मायाावतींनी घेतली आहे. पण दुसरीकडे बसपाचे संस्थापक कांशीराम, ‘फुले- शाहू- आंबेडकर या महामानवांमुळेच बहुजनांची चळवळ उभारली’ असे जगजाहीर सांगणारे कांशीराम मात्र पक्ष सत्तेवर यावा म्हणून तेव्हा कधी समाजवादी तर कधी भाजपची मदत घेत. मायावतींनी यापुढचे पाऊल नक्कीच उचलले आहे.
डॉ. मा. प. मंगुडकर यांच्या मते, उच्चवर्णीय आणि दलित एकत्र येतात, हा संदेश अधिक महत्त्वाचा आहे. दलित उमेदवाराला ब्राह्मण, तर ब्राह्मण उमेदवाराला दलित मतदान करतो ही गोष्ट सामाजिक समरसतेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मायावती यांना ही समरसता ध्येय म्हणून आणायची नसली तरी राजकारणातली व्यूहनीती म्हणून तिचा उपयोग करताना मिळालेला तो निवडणुकीतील सर्वात मोठा लाभ आहे.
महाराष्ट्रात आंबेडकरी पुढाऱ्यांमध्ये संवाद होत नाही. संवादाचा हा अभाव, ही दरी शहरात शिक्षित तरुणांना लिपून टाकावी असे सतत वाटत राहते. तसे प्रयत्नही झाले, पण सामाजिक पाठबळ कमी पडल्याचे जेव्हा जाणवते, तेव्हा असे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व कुठेच दिसत नाही. ही मोठीच शोकांतिका आजच्या निवडणुकीत दिसत आहे.
उत्तर प्रदेशात सवर्णाचे प्रमाण १० टक्के आहे. बिगर दलित, कनिष्ठ ओबीसी, यादव, कुर्मी अशा एकूण बहुजन समाजाचा मायावतींना भरपूर पाठिंबा आहे. तरी मायावती ब्राह्मणांशिवाय पूर्ण बहुमत मिळवू शकत नाहीत, हे काही खरे नाही.
मायावतींच्या हत्तीने मुंबईत प्रवेश केला तेव्हा इथल्या आंबेडकरी पुढाऱ्यांवर अंतर्मुख होण्याची वेळ आली, हे नाकारून चालणार नाही. नुसत्या राजकीय ज्ञानाला किंमत नसते. त्या राजकीय ज्ञानाबरोबर अनुभव असावा लागतो. मायावती आता हिंदू धर्मावर अजिबात टीका करीत नाहीत. आता त्यांच्या मुखातून ‘मनुवादी’, ‘बम्मनवादी’ घोषणा ऐकायला मिळत नाहीत ही त्यांची जमेची बाजू समजावयाची का? राजकारणात कालचे शत्रू उद्याचे मित्र होऊ शकतात, याचीही त्यांना उत्तम जाण आहे. म्हणूनच या निवडणुकीत पक्षाचे संघटन कसे असावे, हेही त्या जाणून आहेत.
या सगळ्या प्रक्रियेत आंबेडकरी समाजाची मानसिकता तपासून पाहावी लागते. आजच्या शिक्षित पिढीने बाबासाहेब वाचला आहे. इतिहास गोल करता येत नाही. इतिहास गोल करण्याचा प्रयत्न केलाच कुणी, तरी मागून येणारा इतिहासकार त्या इतिहासाला सरळ करीत पुढे जातो.
मायावती अथवा फुले- शाहू- आंबेडकरी चळवळीतर्फे खऱ्या अर्थाने जेव्हा माणसाच्या कल्याणाची ग्वाही मतदारांना दिली जाईल, तेव्हाच मतदार त्यांच्यापाठीशी उभा राहील. मग तो महाराष्ट्र असो, की उत्तर प्रदेश असो. म्हणजेच आंबेडकरप्रेम खरे आहे की खोटे-बेगडी आहे, हे आता होऊ घातलेली निवडणूकच दाखवून देईल.
अन्यथा बाबासाहेबांवरील एक कविता आठवते, त्यातली गत होईल-
तुमच्या उद्रेकाने चळवळ
आता सळसळ उठत नाही।
तुमच्या विचाराने बाबा,
आता आभाळसुद्धा दाटत नाही।।
नाही उमजले आम्हां!
तुम्ही रोखलेले बोट आजपावेतो।
निर्वाण अन् जयंतीशिवाय
तुमचे जगणेसुद्धा आठवत नाही।।
रमाकांत जाधव