Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
विविध

‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, १३ एप्रिल/खास प्रतिनिधी

देशातील २६ सर्वोत्तम पत्रकारांना विविध विभागांतील ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. २००६ साली पहिल्या रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर २००७ सालचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रमुख पाहुणे म्हणून समारंभाला उपस्थित होते.

नेपाळ लष्कर आणि माओवादी सरकार यांच्यातील तणाव विकोपाला
काठमांडू, १३ एप्रिल/पीटीआय

नेपाळातील ९५ हजार सैनिकांचा समावेश असलेल्या सेनादलांतील अत्यंत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी एक बैठक आयोजित केल्याने माओवादी सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अर्थात, सरकारला अशा बैठकीची चिंता वाटत नाही किंवा त्यात आम्ही हस्तक्षेपही करणार नाही, असा वरकरणी पवित्रा सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे.

ओरिसात चकमकीत ‘सीआयएसएफ’चे ११ जवान शहीद; चार माओवादी ठार
भुवनेश्वर, १३ एप्रिल/पीटीआय

ओरिसातील कोरापूत जिल्ह्यामध्ये दमनजोडी भागात ‘नाल्को’ कंपनीच्या मालकीच्या बॉक्साइट खाणीवर हल्ला चढविणारे सशस्त्र माओवादी बंडखोर व सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत केंद्रीय ओद्यौगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) ११ जवान शहीद झाले तर ४ माओवादी बंडखोर ठार झाले. माओवादी बंडखोरांनी रविवारी रात्री साडेनऊ वाजता या बॉक्साइट खाणीवर हल्ला चढविला त्यावेळी या खाणीमध्ये १०० कर्मचारी कामावर उपस्थित होते. हल्ल्यानंतर हे सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सत्तेत सहभागी होण्याबाबत शरीफ यांचा तूर्त नकार
इस्लामाबाद, १३ एप्रिल/पीटीआय

लोकशाहीच्या हितासाठी सत्तेत सहभागी होण्यापेक्षा विरोधी बाकांवर बसून सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासच आपण महत्त्व देतो, असे स्पष्ट करीत ‘पाकिस्तान मुस्लिम लीग (एन गट)’ या पक्षाने सरकारमध्ये सहभागी होण्याचा पाकिस्तानी पीपल्स पार्टीचा प्रस्ताव धुडकावला. पाकिस्तानी मुस्लिम लीग-एन या पक्षाचे प्रवक्ते सिद्दिकुल फारूक यांनी सांगितले की, लोकशाहीच्या हितासाठी सरकार व विरोधक हे दोन पक्ष कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष नवाज शरीफ यांच्यावरच सोपविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिका-पाकिस्तामधील तणाव आणखी वाढला
इस्लामाबाद, १३ एप्रिल/पीटीआय

पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतामध्ये अमेरिकी लष्कर ड्रोन विमानांतून करीत असलेले हल्ले तसेच अफगाणिस्तानमधील भारताची भूमिका यासहित अनेक मुद्दय़ांवर अमेरिका व पाकिस्तानदरम्यानचे संबंध वरकरणी दिसतात त्याहूनही आणखी तणावाचे बनले आहेत. यासंदर्भात एका राजदूताचा हवाला देऊन ‘डॉन’ या वृत्तपत्राने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

दंतेवाडा चकमकीचा नक्षलवाद्यांना फटका
नवी दिल्ली, १३ एप्रिल/पीटीआय

छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा येथे शुक्रवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफच्या) जवानांशी झालेल्या चकमकीत ३० हून अधिक जास्त नक्षलवादी ठार झाल्याचा दावा सीआरपीएफचे प्रवक्ते अजय चतुर्वेदी यांनी आज केला. चकमकीच्या ठिकाणी तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले असले तरी आपल्या अन्य साथीदारांचे मृतदेह सोबत घेऊन नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले अशी माहिती चकमकीत सहभागी झालेल्या जवानांनी सीआरपीएफचे महासंचालक ए. एस. गिल यांना दिली. या चकमकीदरम्यान सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट दिवाकर तिवारी आणि एका उपनिरीक्षकासह १० जवान शहीद झाले असल्याचे अजय चतुर्वेदी यांनी पुढे सांगितले.दंतेवाडाच्या घनदाट जंगलामध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा असिस्टंट कमांडंटसह १० जण जखमी झाले. त्यापैकी एक कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

प्रक्षोभक वक्तव्ये न करण्याच्या हमीवर वरुण गांधी यांना जामीन मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली, १३ एप्रिल/ पीटीआय

राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटकेत असलेल्या वरुण गांधी यांनी, अंतरिम जामीन मिळून तुरुंगातून सुटका झाल्यास बाहेर प्रक्षोभक वक्तव्ये करणार नाही अशी हमी दिल्यास त्यांना जामीन मिळू शकतो असे सूतोवाच सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या बाजूने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील हरिष साळवे आणि पिलभितचे जिल्हा दंडाधिकारी यांनी म्हटले आहे, की तुरुंगातून सुटका झाल्यानंतर बाहेर पडल्यावर वरुणने प्रक्षोभक वक्तव्य करून अनुचित परिस्थिती निर्माण न करण्याची कोर्टाला हमी दिल्यास त्याला अंतरिम जामीन मिळण्यास हरकत नाही. राज्य सरकारकडून याला होकार मिळाल्यानंतर वरुणचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार वरुण गांधी हमीपत्र देतील. पिलभित मतदारसंघातून वरुण गांधी यांना उमेदवारी अर्ज भरायचा आहे. तसेच प्रचारालाही सुरुवात करायची असल्याने ते तुरुंगात एकएक दिवस मोजत आहेत. पिलभित मतदारसंघातील अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ तारखेपासून सुरू होत आहे. या प्रकरणावरील सुनावणी आता १६ तारखेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. वरुण गांधी यांना पिलभित येथील प्रचारसभेत प्रक्षोभक आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणणारे वक्तव्य केल्यावरून गेल्या २८ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानने कसाबचा जबाब मागितला
इस्लामाबाद, १३ एप्रिल/पी.टी.आय.

भारताने २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई हल्ल्यासंदर्भात दिलेली माहिती पुरेशी नसल्याचा पुन्हा एकदा कांगावा पाकिस्तानने केला असून पकडण्यात आलेला दहशतवादी अजमल अमीर कसाब याच्यावर खटला चालविण्यासाठी त्याने दिलेल्या जबाबाची प्रतही मागितली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याच हल्ल्यामध्ये शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी समझोता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या स्फोटामध्ये कर्नल पुरोहित यांचा जो हात होता त्याविषयी केलेल्या वक्तव्याची प्रतही मागवली आहे. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी स्थानिक मदतीशिवाय एवढा मोठा हल्ला चढविणे शक्य नव्हते आणि मुंबईतील कोणकोणत्या लोकांनी दहशतवाद्यांना मदत केली त्याची यादीही भारताचे हंगामी उच्चायुक्त मनप्रीत व्होरा यांच्याकडे मागितली आहे. भारताने पाकिस्तानकडून उपस्थित झालेल्या ३० शंकांवर ४०१ पानी अहवाल देऊनही पाकिस्तानला अद्याप भारताकडून आणखी माहिती हवी आहे. कसाब आणि हल्ल्यामध्ये मारला गेलेला दहशतवादी इस्माईल यांच्यावरील डीएनए चाचणीचे अहवाल भारताने सादर केले आहेत ते सारखेच आहेत आणि हे जन्माने जुळे असलेल्यांमध्ये अगदी अपवादाने घडू शकते. त्यामुळे याबाबतही भारताकडून पाकिस्तानला खुलासा हवा असल्याचे रहमान यांनी सांगितले.

पोलंडमधील आगीत १८ जणांचा मृत्यू
वॉर्सा, १३ एप्रिल / पीटीआय

कामिन पोमोरस्की शहरातील एका तीन मजली इमारतीतील वसतिगृहाला लागलेल्या आगीत १८ जणांचा भाजून मृत्यू झाला. ही दुर्घटना काल रात्री १ नंतर घडल्याचे पोलंडच्या राष्ट्रीय अग्निशमन यंत्रणेच्या प्रवक्त्याने सांगितले. प्रवक्ता म्हणाला, की बेघर आणि निराधार लोकांसाठी हे वसतिगृह चालविले जात होते. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र आगीत १८ जण मृत्यू पावले तर २० जणांना होरपळलेल्या अवस्थेत इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.