Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
अग्रलेख

पत्रकारितेचा मानदंड

 

काही वर्षांपूर्वीपर्यंत वृत्तपत्रे व पुस्तकांमध्ये प्रसिद्ध होणारा प्रत्येक शब्द हा अखेरचा वाटत असे. आजही या शब्दाला विशेष प्रतिष्ठा आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर दिसणारे चेहरेही आता बरेच बोलू लागले आहेत. तरुणांमध्ये या दोन्ही माध्यमांबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून येते. या दोन्ही माध्यमांमध्ये अफाट कामगिरी करून प्रकाशमान होणाऱ्या गुणीजनांना परवा राजधानी नवी दिल्लीत ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले. वृत्तपत्र माध्यमाच्या क्षेत्रात रामनाथ गोएंका यांनी केलेली कामगिरी अपूर्व आहे. ते लढवय्ये तर होतेच, पण त्यांनी पत्रकारितेला वेगळे वळण दिले, धाडसाची दीक्षा दिली. आधी केले, मग सांगितले, या उक्तीवर त्यांची श्रद्धा होती, म्हणून तर ‘एक्सलन्स इन जर्नालिझम’ या भारतातल्या सर्वाधिक रकमेच्या पुरस्कारांना सर्वोच्च मान दिला गेला आहे. रामनाथजी हे स्वत:च एक साहसवीर होते. त्यांनी १९३२ मध्ये तेव्हाच्या मद्रासमध्ये डबघाईला आलेले एक वृत्तपत्र घेतले आणि प्रत्यक्षात पार्सल टाकणाऱ्या मोटारीचा ताबा घेऊन वृत्तपत्राची पार्सले टाकण्यातही त्यांनी कमीपणा मानला नाही. १९३६ मध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’ची स्थापना झाली आणि मग या वृत्तपत्राचा धडाकेबाज प्रवास सुरू झाला. जी गोष्ट दुसऱ्याला जमणार नाही, ती आपण करायचीच, पण जी आपल्याला चांगली जमते, ती अधिक उत्तम करून दाखवायची, हा त्यांचा बाणा होता. स्वातंत्र्यानंतर जी पहिली घटना-समिती तयार करण्यात आली, तिचे ते सदस्य होते. अन्यायाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध, बेबंदशाहीविरुद्ध जेव्हा जेव्हा आवाज उठवायची वेळ येत असे, तेव्हा तेव्हा रामनाथजींनी आपण त्यात कुठेही कमी पडणार नाही, हे पाहिले. ‘इंडियन एक्स्प्रेस - लोकसत्ता’ यांनी तो वारसा जपला आहे. अगदी अलीकडच्या काही खळबळजनक माहितीचा स्फोट करतानाही त्या मानदंडाचे आम्ही विस्मरण होऊ दिलेले नाही. काही वृत्तपत्रांनी त्यास कुरघोडी मानले, काहींनी एका गुन्हेगाराचे आत्मचरित्र कसले छापायचे, म्हणून नाके मुरडली. ‘आमच्या हातातही तो मजकूर होता, पण आम्ही तो प्रसिद्ध केला नाही,’ यासारखी भेकड पळवाट त्यांच्यापैकी काहींनी शोधली. विकृती, कलंक आदी दूषणे द्यायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. मात्र पंडित नेहरूंसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे ‘चारित्र्यहनन’ करताना ज्यांना आजही वृत्तपत्रीय नीतीची आठवण होत नाही, इंदिरा गांधींसारख्या धाडसी पंतप्रधानांची सवंग बदनामी करताना ज्यांच्या लेखणीतील शाई संपत नाही, अशांना आता प्रवीण महाजनच्या मजकुरात वृत्तपत्रीय अनीती दिसू लागली आहे. ही ढोंगबाजी तर आहेच, पण त्यात राजकारणही आहे. प्रवीण महाजनचा ‘माझा अल्बम’ तो खुनी असल्याने त्याज्य, पण गोपाळ गोडसेंचे ‘गांधीहत्या आणि मी’ चवीने वाचण्यालायक, ही त्यांची एकूण वैचारिक उंची आहे. सध्या संघपरिवाराला महात्मा गांधी प्रात:स्मरणीय आहेत, याचेही विस्मरण या हिंदुत्त्ववाद्यांना झाले आहे. ‘मी नथूराम बोलतोय’चे पोटभर कौतुक करणारीही हीच मंडळी आता ऐन निवडणुकीच्या काळात प्रवीण महाजनचे आत्मवृत्त प्रसिद्ध करण्यामागल्या ‘कारस्थाना’चा शोध घ्यायला निघाली आहेत. असो. या ‘एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्काराचे वैशिष्टय़ असे, की ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाच्या प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनाही सवरेत्कृष्ट पत्रकारितेचा हा पुरस्कार दिला जात असतो. या वर्षी तो २९ जणांना देण्यात आला आहे. ‘हिंदू’चे ग्रामीण घडामोडींविषयीचे संपादक पालगुम्मी (पी.) साईनाथ आणि पेचात पकडणाऱ्या प्रश्नांच्या भडिमाराने भल्याभल्यांना हैराण करणारे ‘डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट’ करण थापर या दोघांना सवरेत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात आला आहे. करण थापर हे जनरल पी. एन. थापर यांचे शेंडेफळ. डून स्कूल आणि स्टो स्कूलचे ते विद्यार्थी. केम्ब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक्स आणि पोलिटिकल फिलॉसॉफी हे विषय घेऊन पदवी मिळविणारे करण यांनी ऑक्स्फर्डच्या सेंट अँटनी कॉलेजमधून ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयावर डॉक्टरेटही प्राप्त केली. नायजेरियात लागोसमध्ये असणाऱ्या ‘टाइम्स’मध्ये त्यांनी आपल्या पत्रकारितेचा पाया रचला. बीबीसी, दूरदर्शन, न्यूज एशियासाठी त्यांनी काम केले. ‘हिंदुस्तान टाइम्स टेलिव्हिजन ग्रुप’साठीही त्यांनी काम केले. ‘इन्फोटेन्मेंट टेलिव्हिजन’चे ते सध्या अध्यक्ष आहेत. आक्रमक पत्रकारितेसाठी ते ख्यातनाम आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव हा त्यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान आपले अश्रू दडवू शकला नव्हता, तर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अवघ्या चार मिनिटांत या मुलाखतीतून पळ काढावा लागला होता. ‘तुम्हाला प्रतिमेची काही समस्या आहे काय’, या प्रश्नावरच ते अडले आणि तिथून निसटले. आज गुजरातच्या ‘मोदीफिकेशन’ विषयी भरभरून बोलणाऱ्यांनी थापर यांच्या समोरचा मोदींचा तो चेहरा आठवून पाहायला हरकत नाही. पी. साईनाथ यांचा ‘दुष्काळ आणि उपासमार यांच्याविषयीचा जगातला सर्वोत्तम तज्ज्ञ’ म्हणून प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी गौरव केला होता. साईनाथ हे वर्षांतले अडीचशे ते तीनशे दिवस देशाच्या विविध ग्रामीण भागात हिंडत असतात. इतर कोणत्याही मराठी वृत्तपत्रापेक्षा ‘लोकसत्ता’ने ग्रामीण व शेतीविषयक प्रष्टद्धr(२२४)न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व खेडय़ांचे मागासलेपण यावर प्रकाशझोत टाकला आहे. पी. साईनाथ यांचे लेखनही ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले आहे. ग्रामीण प्रश्नांची माहिती घेऊन त्यावर आकडेवारीसह लिखाण करणे ही पी. साईनाथ यांची खासियत आहे. माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचे पणतू असणारे साईनाथ यांना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच सामाजिक आणि ग्रामीण समस्यांचे बाळकडू मिळाले. ते ‘ब्लिट्झ’ सारख्या एकेकाळच्या स्फोटक पत्रकारिता करणाऱ्या साप्ताहिकात होते. पत्रकारितेत ‘सध्या दोन प्रकार आढळतात, पहिल्यात पत्रकार मोडतात, तर दुसरे फक्त स्टेनोग्राफर बनतात’, असे ते म्हणतात, तेव्हा आपण नेमके कुठे आहोत, याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे. प्रसिद्ध लेखक, समीक्षक, पत्रकार, के. ए. अब्बास हे नेहमी साईनाथ यांची ‘अपरिवर्तनीय पत्रकार’ अशी ओळख करून देत. साईनाथ त्याला पुष्टी जोडत म्हणायचे, की ‘हा भ्रष्ट न बनवता येण्याजोगाही पत्रकार आहे, हे माझ्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे’. एका वृत्तपत्राच्या खास अभ्यासवृत्तीसाठी त्यांनी जेव्हा अर्ज केला, तेव्हा ‘तुम्हाला ती का हवी’, असा प्रश्न मुलाखतकर्त्यांनी त्यांना विचारला. त्यावर साईनाथ यांनी आपल्याला ग्रामीण भागाचे प्रश्न समजावून घेण्यासाठी ती अभ्यासवृत्ती हवी आहे, असे म्हटले. त्यावर मुलाखत घेणाऱ्यांनी त्यांना ‘तुमच्या या असल्या (त्यांच्या मते अर्थातच सामान्य) मजुकरात आमच्या वाचकांना काडीमात्र रस नसल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले तर’, असे म्हटले. त्यावर साईनाथ यांनी ‘असा दावा करायला तुम्ही तुमच्या वाचकांना अलीकडे केव्हा भेटला होता,’ असा प्रतिप्रश्न केला. त्यांना ती अभ्यासवृत्ती मिळाली आणि त्यांनी पाच राज्यांमधल्या गरिबीने अतिशय गांजलेल्या दहा जिल्ह्य़ांचा अभ्यास केला. त्यासाठी एक लाख किलोमीटरचा प्रवास त्यांनी वाहतुकीची १६ तऱ्हेची साधने वापरून केला. त्यापैकी पाच हजार किलोमीटरचा त्यांचा प्रवास हा पायी होता. सांगायचा मुद्दा हा, की एवढी धडाडी असणारे पत्रकार हे ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारासाठी निवडले जातात. ‘इंडिया आफ्टर गांधी’ या सवरेत्कृष्ट ग्रंथाचे लेखक रामचंद्र गुहा हेही या पुरस्कार विजेत्यांमध्ये आहेत. प्रादेशिक भाषेत काम करणाऱ्यांना संधीच मिळत नाही, त्यांचे कार्य कुणाच्या नजरेत भरत नाही, अशी तक्रार करणारे अधून मधून पाहायला मिळतात. त्यांच्या त्या तक्रारीत तथ्य नाही, हेही या पुरस्काराने सिद्ध केले आहे. ‘लोकमत’ पासून ‘माध्यमम्’ पर्यंत आणि ‘सहारा समय’ पासून ‘एनडीटीव्ही’ (हिंदी) पर्यंत अनेकजण त्यात आहेत. पत्रकारितेचे हे आहेत दीपस्तंभ. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात हिंदुत्ववादी शक्तींचा हात असल्याचे वृत्त देऊन पहिला हादरा देणाऱ्या ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या स्मिता नायर त्याच परंपरेतल्या. अन्य पत्रकारांनी त्यांच्यापासून स्फूर्ती घ्यावी, यासाठी या उपक्रमाचे मोल निश्चितच अधिक आहे.