Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

‘समग्र चं. प्र.’ वेबवर!
एखाद्या लेखकाचं समग्र साहित्य वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याची कल्पना कितीही उत्तम असली तरी स्वत: तो लेखकच याला आक्षेप घेईल. कारण असं केलं तर त्याच्या पुस्तकांचा खप होणं मुश्कील होईल. वेबसाइटवर समग्र साहित्य टाकल्यामुळे तो लेखक सर्वदूर पोहचण्याची शक्यता वाढत असली, तरी त्याला त्यातून काहीच आर्थिक लाभ मिळणार नाही. कुठलाही लेखक हा आपल्या सृजन-ऊर्मीतूनच लेखन करीत असला (पोटार्थी लेखकू इथे अभिप्रेत नाहीत!) तरी त्यापासून होणारा अर्थलाभ, यश, प्रसिद्धी, मान-सन्मान यांसारखे आनुषंगिक फायदे कुणाला नको असतात? शेवटी लेखक हाही एक ‘माणूस’च असतो; संत नव्हे! लेखकाच्या बाजूनं असे काही मुद्दे असले तरी वाचकांच्या दृष्टीनंही या माध्यमांतरात काही अडचणी आहेतच. पुस्तक आपल्या सवडीनं वाचकाला कुठंही वाचता येतं. तसं वेबसाइटवरील साहित्य कुठंही ‘वाचता’ येत नाही. मात्र, आजच्या ग्लोबल युगात वेबसाइटवर आपलं साहित्य उपलब्ध करून देण्याची कल्पना निश्चितच स्वागतार्ह आहे. नाटककार, कवी, साहित्यिक, नाटय़-चित्रपट-साहित्य समीक्षक असलेल्या चं. प्र. देशपांडे यांनी आपलं समग्र साहित्य www.champralekhan.com वर उपलब्ध करून दिलं आहे.

स्टेम सेल जतनाची क्रांती
देशभरात स्टेम सेलच्या जतनाबाबत दिवसेंदिवस जनजागृती वाढत आहे. कारण माणसाच्या आयुष्यातील याचे महत्त्व लोकांना पटू लागले आहे. स्टेम सेल आपल्या शरीरातील पेशी वाढविण्याचे काम करीत असतात. या सेल्स प्रामुख्याने जन्म झाल्यावर काही तासांमध्येच जतन करण्यासाठी काढून घ्याव्या लागतात. जतन केलेल्या पेशींच्या आधारे भविष्यात आपल्याला उद्भवू शकणाऱ्या ७५ आजारांवर सहज मात करता येऊ शकते. सध्या माध्यमांद्वारे होणाऱ्या प्रचारामुळे स्टेम सेल्सच्या जतनाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहे, पण हे स्टेम सेल जतन करायचे म्हणजे नेमके काय करायचे? त्याचे जतन कशाप्रकारे होते? ते कशाप्रकारे जतन केले जातात? आपण ज्या बँकांमध्ये या सेल्स जतन करतो त्या बँका किती विश्वासू असतात? आदी प्रश्न उपस्थित होतात. हे प्रश्न साहजिकच आहेत. साधारणत: २००४ च्या सुमारास स्टेम सेल जतन करणाऱ्या बँकांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. याआधी स्टेम सेल जतन करणाऱ्या बँँका नव्हत्या असे नव्हे, पण त्यांच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. त्याचदरम्यान स्टेम सेल बँकांमध्ये आपल्या सेल्स साध्या फ्रिजमध्ये जतन करण्यात येत असल्याचे वृत्त पसरल्याने सामान्यांमध्ये अशा बँकांबाबत भलतीच घबराट पसरली होती. मात्र आता त्याचे प्रमाणीकरण ठरल्याने ही भीती दूर झाली आहे. यातील विविध प्रकारच्या पेशींसाठी विविध प्रकारची जतन प्रक्रिया वापरण्यात येते.

‘ऑल दि बेस्ट’ : ४००० व्या प्रयोगाकडे!
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते मुहूर्त झालेल्या ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २९ डिसेंबर १९९३ साली झाला आणि आतापर्यंत या नाटकाचे ३९०० प्रयोग होऊन गेलेत. चार हजाराव्या प्रयोगाच्या निमित्ताने ‘ऑल दि बेस्ट’ची नवीन टीम तयार करण्यात आली असून, नवा सेट, नव्या वेशभूषेसह सर्व काही नव्याने करण्यात आले आहे. त्यातील नवीन कलावंत आहेत- सनीभूषण मुणगेकर (बहिरा), रोहन कदम (मुका), डॉ. श्रीराम कुलकर्णी (आंधळा) आणि अमृता सकपाळ (मोहिनी) लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम यांनी नव्याने या टीमची तयारी करून घेतली असून, मोहन वाघ यांनीही नेपथ्यात बदल केला आहे.

कलाघरची अभिनय शिबिरे
‘कलाघर’ संस्थेने एप्रिल आणि मे महिन्यात अभिनय शिबिरे आयोजित केली आहेत. ठाणे (सकाळी १० ते १२) आणि दहिसर येथे (शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी, दु. ३ ते ५) १५ ते २४ एप्रिलदरम्यान, तर पेण-पनवेल येथे २५ ते ३० एप्रिलपर्यंत (संपूर्ण दिवस. संपर्क- सुषमा- ९८२०७६३४५३), ठाण्यात १ ते २२ मे (सकाळी १० ते २) आणि साहित्य संघ, गिरगाव येथे १ ते १० मेपर्यंत दुपारी ४ ते ६ दरम्यान ही शिबिरे होतील. त्याचप्रमाणे लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे (दर रविवारी दुपारी ३ ते ८ या वेळात) वर्षभर चालणारी अभिनय कार्यशाळा घेण्यात येते. अधिक माहितीसाठी संपर्क- रामनाथ थरवळ, संचालक- कलाघर- ९८२१३३०९६३.

‘अवतरण’चा जागतिक रंगभूमीदिन सोहळा
अवतरण केंद्रातर्फे जागतिक रंगभूमी दिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय स्पर्धेत २३ संघांनी आणि एकांकिका लेखन स्पर्धेत २८ लेखकांनी भाग घेतला होता. अभिनेते रामकृष्ण गाडगीळ यांनी सोहळ्याचे उद्घाटन केले. विजय लाड यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली व संभाजी सावंत यांनी जागतिक रंगभूमी दिवसाचे महत्त्व विशद केले. जागतिक रंगभूमी दिवसानिमित्त प्रसृत झालेला, संभाजी सावंत यांनी अनुवाद केलेला ब्राझिली लेखक- दिग्दर्शक ऑगस्टो बोअल यांचा आंतरराष्ट्रीय संदेश राजन जोशी यांनी वाचून दाखविला. अभिनेता सुनील तावडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. मध्यंतरात प्रकाश पानसे यांनी सुनील तावडे यांची घेतलेली मुलाखत खूपच रंजक झाली. आशीष खरात यांनी ‘तथाकथित’ या एकांकिकेसाठी लेखनाचे प्रथम पारितोषिक पटकाविले, तर द्वितीय व तृतीय पारितोषिके अनुक्रमे मनीष अनसूरकर यांना ‘शवागार’ आणि सागर दुबळे यांना ‘डेजर्ट’ या एकांकिकेसाठी मिळाली. उत्तेजनार्थ पारितोषिके डॉ. सुधीर सावंत यांना ‘म्लेंदू’ व मनिष अनसूरकर यांना ‘सरहद्द’ या एकांकिकांसाठी मिळाली. द्विपात्री अभिनय स्पर्धेत मनीष सोपारकर व निलेश गोपनारायण यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. द्वितीय पारितोषिक संदीप रेडकर व मंगेश कांगणे, तर तृतीय पारितोषिक विद्या रेगे व श्याम निंबाळकर यांनी मिळविले. चंदर पाटील, सतीश येलवे, गौरव गावकर, अजय कांबळे, हर्ष आतकरी, महेश कीर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. परीक्षक म्हणून देवदत्त पाठक, अनंत घोगळे व प्रतिभा पाटील यांनी काम पाहिले.

बोरिवली नाटय़ परिषद शाखेचे नाटय़ प्रशिक्षण शिबीर
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या बोरिवली शाखेने २७ एप्रिल ते १७ मेपर्यंत मोठय़ांसाठी व मुलांसाठी नाटय़ प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले आहे. शिबिरात अरुण नलावडे, अविनाश नारकर, वंदना गुप्ते, प्रदीप कबरे, प्रदीप पाटील, अरुण कानविंदे, उन्मेश वीरकर, राजेश देशपांडे या रंगकर्मीचे मार्गदर्शन लाभणार आहे. मोठय़ांच्या शिबिरांचे संचालन संभाजी सावंत करणार असून मुलांच्या शिबिराचे संचालन लीला हडप व अनुराधा खरे करणार आहेत. शिबिर समारोपप्रसंगी शिबिरार्थीच्या नाटय़ प्रयोगांचे सादरीकरण केले जाणार आहे. इच्छुकांनी अधिक माहिती व प्रवेशासाठी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, बोरिवली शाखा, प्रबोधनकार ठाकरे नाटय़मंदिर, सोडावाला लेन, बोरिवली (प.), दूरध्वनी क्र. ६५७२८३२० येथे सुट्टीचे दिवस वगळून सायं. ७.३० ते ९ या वेळेत संपर्क साधावा.