Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
लोकमानस

धर्मनिरपेक्षता फक्त कागदावरच!

 

आपला देश हा फक्त कागदावरच सर्व-धर्मसमभावाचे पालन करणारा आहे! कारण बऱ्याच वेळा उघडपणे जातीयवादी संघटना आपल्या आगलाऊ जातीयवादी कृतीने संपूर्ण समाजाला वेठीस धरताना दिसतात. काही जातीयवादी संघटना पुढे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे एक अंग म्हणून वावरताना दिसतात, तर बऱ्याच जातीयवादी संघटना या केवळ कायद्याच्या कचाटय़ातून मुक्त राहण्यासाठी अनेक नावांनी व रूपात समाजासमोर येत असून अशा जातीयवादी संघटना या काही राजकीय पक्षांचे आधारस्तंभ होताना दिसतात. किंबहुना काही राजकीय पक्ष हे केवळ अशा जातीयवादी संघटनेमुळेच तग धरून आहेत हे दिसून येईल.
हे कमी की काय म्हणून बऱ्याच वेळा अनेक धार्मिक पुढारी, साधू हेसुद्धा मागे न राहता जातीयवादी प्रचार करण्यास व जातीयवादी पक्षात मदत करण्यास पुढे सरसावलेले दिसतील. खेदाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जातीयवादी संघटनांची सरकारदरबारी अधिकृत नोंद नसल्यामुळे त्यांच्यावर कोणाचेच बंधन नसते. बऱ्याच वेळा काही वृत्तपत्रे, मासिकेसुद्धा जातीयवादी लिखाणाने व अतिरंजित बातम्यांनी जातीयवादी पक्षांना मदत करीत असतात तर काही वृत्तपत्रे व मासिके ही ठराविक पक्षांची मुखपत्रे म्हणून काम करताना दिसतात. अशा वेळी निवडणूक काळात त्यांच्याकडून सदसद्विवेकाची व निष्पक्ष बातम्यांची अपेक्षा कशी करणार?
जातीयवादी संघटना, पुढारी, साधू व जातीयवादी पक्षास मदत करणारी मुखपत्रे, वृत्तपत्रे व मासिके यावर कायद्याचा अंकुश असणे फारच गरजेचे आहे, तसेच निवडणूक काळात जातीयवादी संघटनांच्या जातीयवादी हालचालींबरोबरच जातीयवादी पक्षाची मुखपत्रे, वृत्तपत्रे व मासिके यावर बंदी घालून नि:पक्ष निवडणुका कशा होतील याकडे निवडणूक आयोगाने लक्ष देणे फारच महत्त्वाचे आहे; नाही तर निवडणुका हा फक्त कागदावरचा व वरवरचा देखावाच ठरेल!
अशोक देसाई, अंधेरी, मुंबई

घराडीच्या ‘स्नेहज्योती’
कोकणाकडे येणारे पर्यटक प्रामुख्याने निसर्गरम्य ठिकाणे व देवस्थाने याकडे आकृष्ट होतात. मात्र, त्यांनी काही वेगळी ठिकाणी निवडायला हरकत नाही. रत्नागिरी जिल्ह्यात लक्षवेधी संस्था आहेत. घराडी, ता. मंडणगड येथे छोटय़ा गावात, निसर्गरम्य वातावरणात ‘स्नेहज्योती’ नावाची एक अंधशाळा प्रतिभा सेनगुप्ता आणि आशा कामत या सख्ख्या बहिणींनी मोठय़ा जिद्दीने व प्रशासकीय आणि इतर अडथळ्यांची शर्यत पार करून चालवली आहे. मुख्याध्यापिका प्रतिभाजी तर अनेक मराठी पुस्तकांचे ब्रेल रूपांतर करून ती पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात.
त्या अंध मुलांचा आत्मविश्वास आणि संगीत कलागुण प्रत्यक्ष अनुभवल्यावर मला खूप समाधान वाटले. अशा ठिकाणी सहकार्याचा हात देण्यासाठी पाहुण्यांनी मुद्दाम जावे. घराडी निसर्गरम्य तर आहेच, पण स्नेहाच्या या ज्योती आपले मन प्रकाशित करतील.
माधव गवाणकर, दापोली

जगजितसिंग बोलले ते खरेच!
‘स्लमडॉग’च्या ‘जय हो’ गाण्यावरील, गझल-गायक जगजितसिंग यांची प्रतिक्रिया (९ एप्रिल अंक) योग्यच आहे. परदेशीयांना आकृष्ट करणारे काही शब्द आपल्याकडे आहेत. ‘जय हो’ त्यातीलच एक. एरवी गुलजार यांनी कित्येक आशयसंपन्न कविता, गीतं दिली आहेत. ‘ज्योतीने तेजाची आरती’ असं लिहिणाऱ्या आधुनिक वाल्मीकी ग.दि.मांना कित्येक ऑस्कर मिळायला हवी होती. उद्या ‘चांगभलं’ या शब्दावर काम केलं तर तेही अशा पारितोषिकाच्या कसोटीला उतरेल.
रहमान या संगीतकाराच्या गीतामध्येही तोच तोच चटपटीतपणा असतो. मसक्कली, मटक्कली हे काय आहे? या गाण्यातील एका विशिष्ट ठिकाणी बांधलेली चाल अगदी टपोरी आणि थर्डरेट वाटते. दोन महिन्यांच्यावरही न टिकणारी ही गीतं आणि ते संगीत आजची पिढी डोक्यावर घेऊन नाचते.
संदीप राऊत, वसई

अडवाणींची अर्थवाणी..
सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सुमार विकास, धर्माध प्रक्षोभक वक्तव्यं, फोडाफोडीचा घोडेबाजार इत्यादी असंख्य प्रश्नांना उधाण येत आता दहशतवाद- काळा पैसा याची खमंग चर्चा ऐरणीवर आहे. मूळ प्रश्नांना बगल, नको त्या प्रश्नांची चंगळ-भोंगळ चर्चा चालू आहे. अनेक उमेदवारांची गडगंज संपत्ती जाहीर होत आहे. हा पैसा कोठून आला याचा मात्र उलगडा होत नाही. या पैशाबाबत मौन तर स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशाची माहिती खणून काढण्याची भाषा अडवाणींनी केली आहे. हा पैसा जाहीर होईल हा भविष्यकाळ आहे; परंतु वर्तमानकाळातील उमेदवारांच्या पैशाबाबत ‘सोर्स ऑफ इन्कम’ जाहीर करण्याची सुरुवात अडवाणींनी स्वपक्षाच्या उमेदवारापासूनच केल्यास इतर पक्षांनापण हे पथ्य पाळणे क्रमप्राप्त ठरेल.
रोजगार- अन्न- वस्त्र- निवारा या मूलभूत ज्वलंत समस्यांचे निराकारण हा महत्त्वाचा मुद्दा असताना हिंदुत्व- राम मंदिर वा दहशतवाद हे मुद्दे पुढे रेटून भारताचे सार्वभौमत्व कसे टिकणार? विकास निधींचे प्रामाणिक विनियोग- नियोजन, लोकप्रतिनिधींनी या निधीचा कसा वापर केला आहे याची माहिती जाहीर होणे तथा त्या निधीच्या वापराचा ‘ऑडिट’ रिपोर्ट आम जनतेला उपलब्ध होणे आवश्यक ठरावे. म्हणजे विकास नेमका कुणाचा झाला हे कळून घेऊन तरी जनताजनार्दनाला ‘मत’ कुणाला द्यायचे हे ठरवता येईल!
सुधीर साळुंके, लालबाग, मुंबई

पुनश्च राष्ट्र सेवा दल हवे!
समाजपरिवर्तन, राष्ट्रनिर्माण हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असायला हवे. ते साध्य करण्यासाठी साधन म्हणून सत्ता संपादन करण्याचा कार्यक्रम राजकीय पक्षांचा जरूर असावा. पण दुर्दैवाने येनकेनप्रकारेण ‘सत्ता संपादन’ करणे एवढेच एक उद्दिष्ट सध्या राजकीय पक्षांचे बनले आहे. त्यामुळे सत्तेसाठी ‘वाट्टेल ते’ प्रवृत्ती फोफावली आहे. गुणवत्तेपेक्षा निवडून येण्याच्या निकषावर तिकिटाचे वाटप होते. परिणामी भल्यापेक्षा बुऱ्या प्रवृत्तींनाच जास्त वाव मिळतो.
त्यामुळे भ्रष्टाचारी, गुंड प्रवृत्तीचे लोक, नेत्यांची चापलुसी करणारे कावेबाज, धनदांडगे, वारसा हक्काने नेता म्हणून जन्माला आलेले सरंजामदार आदी प्रवृत्तीच राजकारणात वाढत, पसरत चालल्या आहेत. परिणामी आपली अवघी लोकशाही व्यवस्थाच विकृत बनली आहे. तत्त्वनिष्ठेचा, साधनशुचितेचा आग्रह धरणाऱ्यांची आणि विकासाचे मुद्दे घेऊन काम करणाऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस केविलवाणी होत असून, प्रामाणिकपणाला राजकारणात कुत्रे भीक घालत नाही. त्यामुळे सद्वर्तनी, सरळमार्गी लोक राजकारणापासून फटकून वागताना दिसतात.
‘पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा’ हे एकमेव लक्ष्य सर्व राजकीय पक्षांचे बनल्याने कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी फारसा फरक पडणार नाही, अशी हतबलता आणि त्यातून निर्माण झालेली बेफिकिरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाढत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. स्वातंत्र्याची एकसष्टी साजरी करताना जात, धर्म, प्रांत, भाषा विरहित समाज आपण निर्माण करू शकलो नाही.
हे चित्र बदलण्यासाठी निवडणुकीचे राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करणाऱ्यांनी पुढाकार घ्यावा लागेल. यासाठी सुसंस्कृत समाज व राष्ट्रनिर्माणाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कार्य करणारी राष्ट्र सेवा दलासारखी संघटना पुन्हा एकदा निर्माण होणे ही आता काळाची गरज वाटू लागली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्र सेवा दलाच्या विचार-आचारातून विधायक कार्यकर्त्यांची ‘शक्ती’ उभी राहिली होती. स्वातंत्र्योत्तर काळातही अशी एखादी शक्तीच राजकारणाला विधायक वळण देऊ शकेल. मात्र त्यासाठी खरे समाजसेवक, विचारवंत, पत्रकार, शास्त्रज्ञ यांना पुढाकार घ्यावा लागेल.
दिनेशचंद्र हुलवळे, मुंबई