Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात पार्क चौकातील त्यांच्या पुतळ्यास सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील उमेदवार, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

भीमभक्तीचा फुलला मळा!
सोलापूर, १४ एप्रिल/प्रतिनिधी

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ११८ वी जयंती विविध कार्यक्रमांनी अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. पार्क चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहर व जिल्ह्य़ातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील मंडळींनी महामानवास अभिवादन केले. या निमित्ताने शहरातील आंबेडकरी समाजात भीमभक्तीचा मळा फुलला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पहाटेपासूनच पार्क चौकातील त्यांच्या पुतळय़ास अभिवादन करण्यासाठी मोठी रांग लागली होती.

आरोप खोटा ठरल्यास मंडलिकांनी जनतेची माफी मागितली पाहिजे- पवार
मुलीच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी ५०० एकर जागा खरेदी

कोल्हापूर, १४ एप्रिल / विशेष प्रतिनिधी

आपल्या मुलीच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी ५०० एकर जागा खरेदी केल्याचा आरोप सिद्ध केल्यास आपण पडेल ती शिक्षा भोगावयास तयार आहोत. मात्र हा आरोप खोटा ठरल्यास सदाशिवराव मंडलिक यांनी कोल्हापूरच्या जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, असे थेट आव्हान राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी कागल येथील गैबी चौकातील विराट सभेत बोलताना दिले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांचे मंगळवारी दुसऱ्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर आगमन झाले. तेव्हा हजारोंच्या संख्येने खचाखच भरलेल्या जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

अतिरेक्यांचे लाड पुरविण्याचे काम केंद्रातील सरकारने केले- उद्धव ठाकरे
इचलकरंजी, १४ एप्रिल / वार्ताहर

सार्वभौम देशावर हल्ले करणाऱ्या अफजल गुरू, अजमल कसाबला कठोर शिक्षा करण्याऐवजी त्यांचे लाड पुरविण्याचे काम मनमोहनसिंगांचे कणाहीन सरकार करीत आहे. हे दुर्दैवी चित्र बदलण्यासाठी लोकशाहीच्या युध्दात युतीच्या उमेदवारांना मत देण्याची हिमत दाखवावी. युती, शेतकरी व मतदारांची वज्रमूठ एकत्रित झाल्याशिवाय दुतोंडय़ा रावणाचा वध होणार नाही असे आव्हानात्मक वक्तव्य शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे उमेदवार रघूनाथदादा पाटील यांच्या प्रचारासाठी येथील जिम्नॅशियम मैदानात उध्दव ठाक रे यांची मंगळवारी सायंकाळी सभा झाली.

दुसऱ्या टप्प्यात प्रचाराला माढा व सोलापूरमध्ये गती
सोलापूर, १४ एप्रिल/जयप्रकाश अभंगे

सोलापूर आणि माढा मतदारसंघांत प्रचाराचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून, प्रमुख राजकीय पक्षांनी पदयात्रा, कोपरा सभांवर भर देऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणूक आठ दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे नेत्यांच्या सभांचे आणि निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी प्रचार कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांत घाईगडबड, धावपळ सुरू झाली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी अक्कलकोट तालुक्याचा किल्ला ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे लढत आहेत. शहर उत्तर मतदारसंघाची धुरा माजी आमदार विश्वनाथ चाकोते सांभाळत आहेत.

लोकसभा प्रचाराच्या व्यासपीठावर कलगीतुरा विधानसभेचाच!
कोल्हापूर, १४ एप्रिल / राजेंद्र जोशी

कोल्हापूर जिल्हय़ात निवडणूक लोकसभेची आणि प्रचार विधानसभेचा, अशी काँग्रेस आघाडीच्या प्रचारयंत्रणेची अवस्था झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची युती झाल्यामुळे आघाडीधर्मातून जिल्हय़ात ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये एकमेकांविरुद्ध बाहय़ा सरसावणारे नेते एका व्यासपीठावर आले असले, तरी त्यांच्या दरम्यान लोकसभेच्याच व्यासपीठावर विधानसभेचाच कलगीतुरा रंगू लागला आहे. यामुळे ऐन उन्हाळय़ाच्या सुटीत सर्कस, मेळे लागण्यापूर्वीच मतदारांना बिनपैशाची करमणूक उपलब्ध झाली आहे.

एसटीत पन्नास हजारांचे दागिने हातोहात लंपास
इचलकरंजी, १४ एप्रिल / वार्ताहर

खचाखच भरलेल्या एसटीमधून ५० हजार रुपये किमतीचे दागिने हातोहात लंपास करण्याचा प्रकार सोमवारी येथील बसस्थानकात घडला. चोरटय़ाचा तपास करण्यासाठी बस पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तेथे ५५ प्रवाशांची तपासणी करण्यात येऊनही हा ऐवज सापडला नाही. पोलिसात चोरीची नोंद झाली आहे. आक्काताई पांडुरंग पाटील (रा. जगन्नाथ चौक, पुणे) ही महिला माहेरी आलेल्या विद्या धनंजय थोरवत (वय २४, रा. टाकळवाडी, ता. शिरोळ) या मुलीस सासरी सोडण्यासाठी आली होती. पुण्याहून एसटीने येथे आल्यावर मायलेकी दुपारी अडीच वाजता इचलकरंजी-खिद्रापूर या एसटीमध्ये चढल्या. विद्या थोरवत यांनी साडेतीन तोळय़ांचे गंठण, मुलाच्या गळय़ातील सोन्याचे बदाम, चांदीचे पट्टे आदी दागिने पर्समध्ये ठेवले होते. ही पर्स त्यांनी बॅगमध्ये ठेवली होती. बसमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने थोरवत यांनी पर्स ठेवलेली बॅग प्रथम बसमध्ये नेली. ती सीटवर ठेवून खाली ठेवलेल्या तीन बॅगा नेण्यासाठी त्या उतरल्या व पुन्हा गर्दीतून त्या आईसह बॅग ठेवलेल्या सीटजवळ पोहोचल्या. या अवधीत त्यांची बॅग उचकटून चोरटय़ाने ५० हजार रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स लंपास केली होती. चोरटय़ाने पर्स कधी लांबवली हे शेजारी बसलेल्या युवतीलाही लक्षात आले नाही. हा प्रकार लक्षात आल्यावर मायलेकींनी बस शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्याचा आग्रह केला. पोलिसांनी चालक, वाहकासह सर्व प्रवाशांची झडती सुमारे तासभर घेतली, पण दागिने, पैसे मिळाले नाहीत.

‘माढय़ातील राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडून काढू’
सोलापूर, १४ एप्रिल/प्रतिनिधी

सामान्य जनतेच्या आशीवार्दाने सत्तास्थाने मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने माढा लोकसभा मतदारसंघात जनतेशी गद्दारी केली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासह या पक्षाची मक्तेदारी आपण मोडून काढू, अशी गर्जना करीत शिवसेना पंढरपूर विभागप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी भाजप-सेना युतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्याचा निर्धार केला. माढा तालुक्यातील तुळशी व बेंबळे येथे देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी उमेदवार खासदार देशमुख यांनीही मनोगत व्यक्त करून युती व लोकमंगल उद्योग समूहाच्या माध्यमातून माढा मतदारसंघाचा कायापालट करण्याचे अभिवचन दिले. या वेळी शिवसेना माढा तालुकाप्रमुख राजाभाऊ गायकवाड, लोकमंगल साखर कारखान्याचे उपाध्यक्ष महेश देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष आदिनाथ जाधव, गणेश देशमुख आदींसह युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आंबेडकरांना सांगलीत अभिवादन
सांगली, १४ एप्रिल / प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील मुख्य बसस्थानकानजीकच्या त्यांच्या पुतळ्यास रोहयोमंत्री मदन पाटील, जिल्हाधिकारी श्याम वर्धने व आयुक्त दत्तात्रय मेतके यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंगळवारी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सायंकाळी विविध दलित संघटनांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी रोहयोमंत्री मदन पाटील व जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यांच्यासह आयुक्त दत्तात्रय मेतके, महापौर मैनुद्दीन बागवान, काँग्रेसचे खासदार प्रतीक पाटील, उपमहापौर शेखर इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिनकर पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संभाजी पवार व नगरसेवक पै. अनिल पाटील- सावर्डेकर यांनीही डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सुरेश दुधगावकर, बाळासाहेब गोंधळे, नगरसेवक हणमंत पवार, सुब्राव मद्रासी, हारूण शिकलगार, किरण कांबळे, श्रीमती सरला कांबळे, ज्योती आदाटे व महापालिकेचे उपायुक्त रमेश वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काँग्रेसला धडा शिकवा - नीलम गोऱ्हे
सोलापूर, १४ एप्रिल/प्रतिनिधी

महिलांना संरक्षण देण्याचे काम सरकारचे आहे; परंतु सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिलांवरील अत्याचारात वाढच होत असून, ते रोखण्यासाठी काँग्रेसला धडा शिकवा, असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्या प्रचारार्थ शिवस्मारकात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी अ‍ॅड. बनसोडे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, नांदेड शिवसेना महिला आघाडीप्रमुख सुमती निहाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. देशात समान नागरी कायदा आला पाहिजे, महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायद्याचे संरक्षण आवश्यक असल्याचे सांगून हे काम काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करू शकत नाही, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. महिला शक्ती एकवटली तर आपल्या मताधिक्यात वाढ होईल, असा विश्वास अ‍ॅड. बनसोडे यांनी व्यक्त केला.

सुशीलकुमारांच्या प्रचारार्थ सिनेस्टार श्रीहरीच्या आज सभा
सोलापूर, १४ एप्रिल/प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी तेलुगू सिनेस्टार श्रीहरी हा उद्या बुधवारी सोलापुरात येत असून, त्याच्या पूर्व भागात पाच सभा आयोजिल्या आहेत. पूर्व भागात तेलुगू भाषिकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपकडे झुकलेल्या या तेलुगू समाजाला आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने तेलुगू सिनेस्टार श्रीहरी यास पाचारण केले आहे. उद्या बुधवारी त्याची पहिली सभा सकाळी ८.३० वाजता विडी घरकुलमध्ये संभाजीराव शिंदे प्रशालेजवळ होणार आहे. त्यानंतर नीलम श्रमजीवीनगर, घोंगडे वस्तीतील इंदिरा वसाहत, दत्तनगर व न्यू पाच्छा पेठेतील हनुमान मंदिराचे पटांगण येथे श्रीहरी यांच्या प्रचार सभा होणार असल्याचे पूर्व विभाग काँग्रेस मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे प्रमुख सिद्राम जिंदम यांनी सांगितले.

सोलापुरात बेरोजगारांचा गुरुवारी मेळावा
सोलापूर, १४ एप्रिल/प्रतिनिधी

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ बेरोजगारांना मिळण्यास राष्ट्रीयीकृत बँकांची यंत्रणा अकार्यक्षम ठरली असल्याचे दिसून आल्याने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी बेरोजगार निर्मूलन संघटनेच्या वतीने गुरुवारी १६ एप्रिल रोजी शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बसवराज येरनाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या मेळाव्यास ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, अ‍ॅड. प्रदीपसिंग रजपूत, अविनाश महागावकर आदी उपस्थित राहणार आहेत. ५ हजार ते २५ लाखांपर्यंत कर्ज बेरोजगारांना मिळण्याची योजना आहे; परंतु अशी शेकडो प्रकरणे अनेक महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत, असे येरनाळे म्हणाले.