Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

नवे सरकार अल्पायुषीच!
राजकीय निरीक्षकांचा अंदाज
नवी दिल्ली, १४ एप्रिल/वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकांनंतर नव्याने अस्तित्वात येणारे केंद्रसरकार आपला पूर्ण कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. दोन ते तीन वर्षांच्या अवधीतच देश पुन्हा राजकीय अस्थिरतेच्या खाईत ओढला जाईल, असे भाकित देशातील १४ प्रमुख राजकीय निरीक्षकांनी नोंदवले आहे. सध्या आघाडय़ांमध्ये वादंग निर्माण होत असताना व सातत्याने पक्षांची नवी जुळवाजुळव चालू असताना गेले काही दिवस काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’ला सरकार स्थापण्यासाठी डाव्या पक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा निरीक्षकांचा दावा आहे.

पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला; ‘जुळवाजुळव’ सुरू!
नागपूर, १४ एप्रिल /प्रतिनिधी

विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ-वाशीम, अकोला, बुलढाणा आणि अमरावती या दहाही लोकसभा मतदारसंघ तसेच मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या तीन मतदारसंघातील जाहीर प्रचार आज सायंकाळी संपला आणि गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी शेवटच्या दोन दिवसांत करण्यात येणाऱ्या निर्णायक ‘जुळवाजुळवी’ने वेग पकडला.

पेट्रोल सिर्फ एक लिटर,
चले सौ किलोमीटर

मुंबई, १४ एप्रिल / प्रतिनिधी

लाख रुपये किंमत असलेल्या नॅनोमुळे स्वत:ची कार बाळगण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार असले, तरी पेट्रोलवरील खर्चामुळे ही स्वस्तातील कारदेखील किती लोकांना परवडेल, याबाबत अद्याप साशंकता व्यक्त होत आहे. मात्र जर्मन मोटार कंपनी व्होक्सवॅगनने एक लीटर पेट्रोलमध्ये १०० किमी इतके जबरदस्त ‘अ‍ॅव्हरेज’ देणारी कार विकसित केली आहे.

राम मंदिर उभारणी हा तर आंबेडकरांचा अजेंडा- जावडेकर
मुंबई, १४ एप्रिल/प्रतिनिधी

राम मंदिराची उभारणी, ३७० वे कलम, समान नागरी कायदा, गोरक्षा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अ‍ॅ जेंडा असून तो च आम्ही राबवत आहोत, असे उद्गार भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत काढले. योगायोग म्हणजे आंबेडकर जयंती असताना जावडेकर यांनी हे वक्तव्य केले.

आधी निर्णय वाघमारेंचा आणि मग सुनावणी कसाबची!
मुंबई, १४ एप्रिल / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाब आणि अन्य दोन आरोपींविरुद्धच्या प्रकरणाची सुनावणी पहिल्यांदाच आर्थर रोड येथील विशेष न्यायालयात बुधवारी होणार आहे. मात्र या सुनावणीच्या वेळी न्यायालय सुरूवातीला कसाबच्या वकील अ‍ॅड. वाघमारे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या वकिली आचारसंहितेप्रकरणी निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्या. वाघमारे या पुढेही कसाबच्या वकील म्हणून कामकाज पाहणार की त्यांचे वकिलपत्र रद्द होणार याचा निर्णय उद्या होण्याती शक्यता आहे. न्यायालयाने कसाबच्या वकील म्हणून नियुक्ती करण्याआधी अ‍ॅड. वाघमारे यांनी याच प्रकरणातील पीडित आणि साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्यावतीने वकीलपत्र स्वीकारले होते. कामा रुग्णालयाजवळ कसाब आणि त्याचा साथीदार इस्माइल यांनी केलेल्या गोळीबारात श्रीवर्धनकर यांना गोळी लागली होती. त्यानंतर त्यांनी अ‍ॅड. वाघमारेंच्यामार्फत नुकसानभरपाईसाठी दावा केला होता. मात्र एकाच खटल्यातील साक्षीदार आणि आरोपीचे वकीलपत्र स्वीकारणाऱ्या अ‍ॅड. वाघमारेंनी ही बाब न्यायालयापासून लपवून ठेवत वकिली आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार अ‍ॅड. के. बी. एन. लाम यांनी विशेष न्यायालयासमोर केली होती. त्यामुळे अ‍ॅड. वाघमारे यांच्याबाबतच्या निर्णयानंतरच प्रकरणाचे पुढील कामकाज होईल की नाही हे अवलंबून आहे.

कसाबची आई मुलाला भेटण्यासाठी भारतात येणार
जांगीपूर (प. बंगाल), १४ एप्रिल/पी.टी.आय.
मुंबई हल्ल्यातील पकडण्यात आलेला प्रमुख दहशतवादी अजमल अमीर कसाब याच्यावर खटला चालविण्याची तयारी एका बाजूने जोरात चालू असताना कसाबची आई आपल्या मुलाला भेटण्यासाठी पाकिस्तानमधून मुंबईत येत आहे. परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी येथे ही माहिती देतानाच पाकिस्तानने आता मुंबई हल्ल्यासंदर्भात चालू असलेला तपासात भारताकडून आणखी काही माहिती हवी आहे या कांगाव्याखाली दिरंगाईवर टाकू नये अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. पाकिस्तानने आता चालढकल न करता प्रत्यक्ष कृती करून दाखवावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनीही नवी दिल्लीत व्यक्त केली आहे. अजमल अमीर कसाबला सध्या कडेकोट बंदोबस्तात मुंबईत आर्थर रोड तुरुंगामध्ये ठेवण्यात आले आहे.

हिमकडा कोसळून सात जवानांना जिवंत समाधी!
श्रीनगर, १४ एप्रिल/पी.टी.आय.

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील सीमावर्ती परिसरात आज एक हिमकडा कोसळून त्याखाली सात जवान जिवंत गाडले गेले. सुदैवाने अन्य आठ जवान या दुर्घटनेतून सुखरूप वाचले. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार कुपवाडा जिल्ह्यातील कर्नाह सेक्टरमध्ये ही दुर्घटना घडली. या वेळी अन्य आठ जवान सुदैवाने सुखरूप वाचले. हिमकडय़ाखाली गाडल्या गेलेल्या सर्व जवानांची प्रेते मदत पथकाने बाहेर काढली आहेत.

हिमाचलमध्ये बस दरीत कोसळून १९ प्रवासी ठार
चम्बा, १४ एप्रिल/पीटीआय
हिमाचल प्रदेशमधील चम्बा जिल्ह्यातल्या बदाईगड गावाजवळ आज एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १९ प्रवासी ठार झाले. यासंदर्भात अतिरिक्त पोलिस अधीक्षक डी. के. चौधरी यांनी सांगितले की, १९ प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. ही बस तिस्सा येथून चम्बा शहराकडे रवाना होत असताना वाटेत ५०० फूम्ट खोल दरीत कोसळली.

‘एक्झिट पोल’वर निवडणूक आयोगाची बंदी
नवी दिल्ली, १४ एप्रिल/पी.टी.आय.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी होत असून त्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज दुपारी तीन पासून मतदारांच्या कलाविषयी अंदाज तसेच त्यांनी केलेल्या मतदानानुसार निवडणूक विजयाचे अंदाज या बाबींवर प्रसारमाध्यमांकडून काही टिप्पणी करण्यास मज्जाव केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही बंदी लागू करण्यात आल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ही बंदी लागू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी रोजी या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. खाजगी वृत्तवाहिन्या, सरकारी मालकीचे सॅटेलाइट चॅनेल्स तसेच केबल व डीटीएच वाहिन्यांना याबाबत मतदारांचा कोणताही कौल लोकांपर्यंत पोहोचविण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

लालूप्रसाद यांना अटक व सुटका
गरवाह,झारखंड, १४ एप्रिल/ पीटीआय

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना आज निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्यामुळे अटक करण्यात आली व लगेचच जामिनावर सोडण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक साकेतकुमार सिंग यांनी सांगितले की, लालूप्रसाद यांना निवडणूक प्रचारसभेच्या मंचावरच अटक करण्यात आली. झारखंडमधील प्रचाराच्या वेळी लालूप्रसाद यांचे हेलिकॉप्टर ७ एप्रिलला हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी सभेच्या ठिकाणी उतरवण्यात आले होते. त्यामुळे वैमानिकासह लालूंवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. गटविकास अधिकारी सुभाष सिंग यांनी हा एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने लालूंना या प्रकरणी खुलासा करण्यासाठी उद्या ४ वाजेपर्यंत मुदत देणारी नोटीस बजावली होती.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी