Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

कडवी चुरस
गणेश कस्तुरे

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नांदेड मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. तथापि मतदारांचा कौल अजूनही कोणाला न उमगल्याने लढत अतिशय चुरशीची आणि अटीतटीची होईल, हे स्पष्ट आहे. निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा न करता विविध पक्षांचे पदाधिकारी ‘हत्ती’ किती पळतो याच विवंचनेत आहेत. सामान्य मतदारांनाही याबाबत औत्सुक्य आहे.
महाराष्ट्र-आंध्र प्रदेश सीमेवर गोदावरीकाठी असलेल्या नांदेड मतदारसंघात पहिल्या टप्प्यात म्हणजे गुरुवारी (दि. १६) मतदान होणार आहे.

रात्र वैऱ्याची
आसाराम लोमटे

शक्तिप्रदर्शन संपले, राजकीय समीकरणांची जुळवाजुळव थांबली. आता एका रात्रीत ‘भूमिगत कारवायां’ना वेग येईल. आपापला टापू सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जाईल. बंडखोरीनंतर शिवसेनेने पणाला लावलेली सारी शक्ती आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या लोकसभा मतदारसंघात एकवटलेले आपले प्रभुत्व या पाश्र्वभूमीवर सुरेश वरपूडकर आणि गणेश दूधगावकर यांच्यातील तुल्यबळ लढत अंतिम टप्प्यात चुरशीच्या वळणावर आली आहे.

ही आश्वासने शेतकऱ्यांच्या अडचणीची - शरद जोशी
लक्ष्मण राऊत
जालना, १४ एप्रिल

काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या जाहीरनाम्यात दोन व तीन रुपये किलो दराने गरिबांना धान्य देण्याचे आश्वासन आहे. ही आश्वासने शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी आहेत, अशी टीका स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केला. ‘लोकसत्ता’शी बोलताना श्री. जोशी म्हणाले, ‘‘आगामी निवडणुकीनंतर देशात कोणाही एका पक्षाचे सरकार येणार नाही आणि बजबजपुरी माजेल! काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात ‘आम आदमी’च्या हितरक्षणाचा मुद्दा मांडला आहे.

घशाला कोरड, मतांसाठी ओरड!
प्रदीप नणंदकर
लातूर, १४ एप्रिल

निवडणुकीचा ज्वर वाढतो आहे. वातावरणातील उष्मा उच्चांक गाठतो आहे. निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी तुरळक गाडय़ा झेंडय़ांविना फिरत आहेत. मतदारसंघातील बहुतेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या महाकठीण झाली आहे. लोकसभेचा पुनर्रचित लातूर मतदारसंघ १७५ किलोमीटर लांब व १४० किलोमीटर रूंद आहे. लोहा, कंधार, जळकोट व अहमदपूर तालुक्यांतील काही भाग हा डोंगरी म्हणून ओळखला जातो.

लाख रुपये जागेवरच!
*माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेस मोठय़ा जोरात आहे बुवा. मतदारसंघातील देवर्जन येथे काँग्रेसची सभा सुरू होती. काँग्रेस पक्ष सर्वात जुना कसा आहे, सामान्य माणसांपर्यंत तो कसा पोहोचला आहे, याचे पाढे वक्त्यांनी वाचायला सुरुवात केली. एक वक्ता तावातावात सांगत होता, ‘ काँग्रेसच्या नेत्यांची नावे व त्यांच्या वडिलांची नावेही खेडय़ापाडय़ातील लोकही सांगतात. याउलट भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची नावे ग्रामीण भागापर्यंत पोहोचली नाहीत. अडवाणी किंवा अटलजींच्या वडिलांचे नाव या सभेत कोणी सांगितले तर मी याच ठिकाणी १ हजार रुपये द्यायला तयार आहे.’

शपथ
केंद्रीय, तसेच राज्य विधि-मंडळाच्या निवडणुकी-संबंधात उमेदवारी अर्ज सादर करताना प्रत्येक उमेदवारास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर शपथ घ्यावी लागते. या शपथेचा मसुदा राज्यघटनेच्या तिसऱ्या परिशिष्टामध्ये दिलेला आहे. उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक उमेदवार अशी शपथ घेतो की, त्याचा भारतीय राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे आणि राज्यघटनेवर त्याची पूर्ण श्रद्धा आहे.

मराठवाडय़ाची राजधानी असे बिरुद असलेला औरंगाबाद जिल्हा आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय प्रश्नाबरोबर स्थानिक प्रश्नही महत्त्वाचे आहेत. स्थानिक प्रश्नावर शिवसेना, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष या चार पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना प्रमोद माने यांनी बोलते केले.

सुरक्षा आणि विकासाला अग्रक्रम
राष्ट्रीय हिताला प्राधान्य, विकासाला अग्रक्रम आणि मतदाराच्या सुरक्षेची जोपासना असा संकल्प शिवसेनेने या मतदारसंघात सोडला आहे. शिवसैनिकांची एकजूट आणि निर्धार या मतदारसंघावर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित. प्रचारात आमचा भर सेवेची कामगिरी आणि जाहीरनामा यावरच आहे. लोकसभेच्या तयारी प्रत्यक्षात सहा महिन्यांपूर्वीच झाली आहे. संघटनेचे एक मजबूत जाळे या जिल्ह्य़ात विणले गेले आहे.

कर्जमुक्तीचा फायदा आघाडीला
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळेच भारतातील दोन हेक्टर शेती असलेल्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने घेतला. तसेच राज्यातील आघाडी सरकारनेही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा दिला. केंद्र व राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा निश्चितपणे होईल. मुस्लिम, मराठा आणि इतर समाजाला आरक्षण देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.

मराठी माणसाच्या हक्कासाठी
मराठी माणसाच्या हक्कासाठी दिल्लीत आपला खासदार पाठवायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या आग्रहामुळे नवीन मतदार निश्चितपणे आकृष्ट होणार आहे. राज्यात मराठीचा आग्रह धरला तर कारवाई केली जाते. महाराष्ट्राचा एकही प्रतिनिधी संसदेत राज्याच्या मराठी भाषेसाठी बोलत नाही, हे आपले दुर्दैव आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी म .न. से.ला निवडून दिले पाहिजे. मराठी अस्मिता जागविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी माणसाबरोबरच बेरोजगारी हा विषयही तितकाच महत्त्वाचा आहे.

ताकद युतीचीच
औरंगाबाद आणि जालना या मतदारसंघात युतीचेच प्राबल्य आहे. मी सिल्लोडचा असून, आमचा विधानसभा मतदारसंघ जालन्यामध्ये येतो. या दोन्ही मतदारसंघांमध्ये युतीच विजयी होणार. जालन्यातून रावसाहेब दानवे व औरंगाबादमधून खासदार खैरे पुन्हा निवडून येतील आणि देशाच्या पंतप्रधानपदी लालकृष्ण अडवाणी आरुढ होतील, यात मला शंका नाही. अतिरेक्यांचा धोका दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोहोचला आहे.

भावनिक प्रश्न निर्माण करणे भाजपचे धोरणच - राणे
सिल्लोड, १४ एप्रिल/वार्ताहर

त्यागाचा इतिहास रचणाऱ्या काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने देशासाठी आजपर्यंत काय केले व काय करणार ते सांगितले पाहिजे. भावनिक प्रश्न निर्माण करून निवडणुका लढविणे हे भा. ज. प.चे नेहमीचेच धोरण आहे, अशी टीका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली. जालना मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आज शहरात सभा झाली. त्यात श्री. राणे बोलत होते. अध्यक्षस्थानी औरंगाबादचे संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे होते. माजी आमदार अब्दुल सत्तार, कैलाश गोरंटय़ाल, माजी मंत्री नामदेव गाडेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे,रंगनाथ काळे, शांता पाडळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीरंग साळवे या वेळी उपस्थित होते.

आमचा जाहीरनामा
खासदारांनो, कृपया अडथळा आणू नका!

निवडणुकीची आपली पद्धतच अशी आहे की, त्यात ‘खरा लोकप्रतिनिधी’ निवडलाच जात नाही. एक तर निम्मे लोक मतदानच करीत नाहीत. जे करतात, त्याचे विभाजन होऊन कोठे २० टक्के मते घेणारा तर कोठे १८ टक्के मते घेणारा निवडून येतो. ही एवढी मते मिळविण्यासाठी कोठे धर्म, जात तर मोठय़ा प्रमाणात पैसा कामाला येतो. अशा परिस्थितीत ‘आपला खासदार कसा असावा?’ हे सांगणे कठीण आहे. पन्नास टक्क्य़ांपेक्षा जास्त मते घेणाराच निवडून येईल, अशी पद्धत आपण जोपर्यंत स्वीकारीत नाहीत तोपर्यंत निवडून येणारे लोक जनतेचे खरे प्रतिनिधी म्हणताच येणार नाही.

बीड मतदारसंघातील सर्व उमेदवारांना.
*अंबाजोगाईकरांना वर्षांनुवर्षे झुलवत ठेवणारी महत्त्वाची कार्यालये आता आली आहेत. यंदा नक्कीच म्हणणारे अंबाजोगाई जिल्ह्य़ाचा प्रश्न सोडवणार की विद्यापीठ उपकेंद्राप्रमाणेच जिल्हा जाहीर करणार?
अमोल उमाकांत स्वामी, अंबाजोगाई.
बीड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांना.
*राज्यातील मागासवर्गीय समाज आर्थिक व सामाजिक विकासापासून मागे आहे. या समाजाच्या प्रगतीसाठी नवीन धोरण राबवणार आहात काय?
राम शेंडगे, धारूर.
बीड मतदारसंघातील भा. ज. प.चे उमेदवार गोपीनाथ मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर यांना.
*या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी लक्ष दिले नाही. आपण निवडून आल्यास भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी काय उपाययोजना करणार का?
संदिपान थोरात, धारूर.

‘दफनभूमीची जमीन हडप करणाऱ्याला मतदान करणार का?’
भोकर, १४ एप्रिल/वार्ताहर

नांदेड तालुक्यातील वाजेगाव येथील मुस्लिम दफनभूमीची २२ एकर जमीन हडप करणाऱ्या उमेदवाराला मुस्लिम समाज मतदान करणार काय, असा सवाल बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकवाड यांनी सभेत केला. ब. स. प.चे उमेदवार माजी उपमहापौर मकबूल सलीम यांच्या प्रचारार्थ मिठी कारोर, भोकर येथे काल सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात श्री. गायकवाड बोलत होते. अध्यक्षस्थानी हाजी निखारोद्दीन होते. उमेदवार मकबूल सलीम, मतलूब गोंदवाले, माजित काका, बाबाखान आदी उपस्थित होते.श्री. गायकवाड म्हणाले की, नांदेडमध्ये दंगलीत झालेल्या नागरिकांना तुटपुंजी मदत करून मुस्लिमांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला. उत्तर प्रदेशात मायावती यांनी ५५ मुस्लिमांना उमेदवाऱ्या देऊन २६ मुस्लिमांना आमदार केले.श्री. सलीम म्हणाले की, मुस्लिम-दलित मतदारांना आजपर्यंत काँग्रेसने झुलवत ठेवून दिशाभूल केली. या वेळी जावेद उमरी, अनिस अहेमद, कमलेश आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शमीम इनामदार यांनी केले.

‘दलित-मुस्लिमांची काँग्रेसने उपेक्षाच केली’
नांदेड, १४ एप्रिल/वार्ताहर

दलित व मुस्लिमांची मते मिळविणाऱ्या काँग्रेसने आजपर्यंत या समाजाची उपेक्षाच केल्याने या निवडणुकीत मतदार त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी व्यक्त केला. हिंगोली मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ किनवट येथे श्री. कदम यांची सभा झाली शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुहास सामंत, उपजिल्हाप्रमुख विनोद चिखलीकर, आमदार वानखेडे, सोपानराव केंद्रे उपस्थित होते. राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना श्री. कदम म्हणाले की, वक्फ मंडळाची जमीन हडप करून कोटय़वधी रुपये हडप करणाऱ्या काँग्रेस पुढाऱ्यांचे खरे रूप जनतेसमोर आले आहे. न्यायालयानेही या प्रकरणात ताशेरे ओढले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही काँग्रेसला ‘जळते घर’ असे संबोधले होते. कर्जमाफीचा किती लोकांना फायदा झाला, अशी विचारणा करून श्री. कदम म्हणाले की, राज्यात शिवसेनेचे सरकार येणार आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आमचे वचन आहे. केंद्रीय मंत्री असूनही या भागाचा काय विकास झाला?

जाहीर प्रचार थंडावला
हिंगोली, १४ एप्रिल/वार्ताहर

कडक उन्हाळ्यात गेल्या १५ दिवसांपासून चालू असलेला जाहीर प्रचार आज सायंकाळी थंडावला. उमेदवार आता दोन दिवस भेटीगाठी घेण्यावर भर देत आहेत. हिंगोली मतदारसंघात एकूण ११ उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी शरद पवार, रामदास आठवले, छगन भुजबळ, नारायण राणे, आर. आर. पाटील, बबनराव पाचपुते, चंद्रकांत हंडोरे, आमदार भाऊ पाटील-गोरेगावकर यांच्या सभा झाल्या. शिवसेनेचे उमेदवार आमदार सुभाष वानखेडे यांच्याकरिता उद्धव ठाकरे, दिवाकर रावते आणि श्री. माधवराव नाईक यांच्याकरिता शालिनी पाटील, अण्णासाहेब जावळे या प्रमुख नेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचारसभा झाल्या.

राजकीय कार्यकर्त्यांसह पोलीस यंत्रणाही सावध
नांदेड, १४ एप्रिल/वार्ताहर
नांदेड मतदारसंघात गुरुवारी (दि. १६) होणाऱ्या मतदानाच्या पाश्र्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. आज व उद्याची रात्र वैऱ्याची असल्याने सर्वाचा जीव भांडय़ात आहे. मागणीपेक्षा कमी मनुष्यबळ उपलब्ध असले तरी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, आज सायंकाळी जाहीर प्रचार समाप्त झाला. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. कर्मचाऱ्यांचे तिसऱ्यांदा होणारे प्रशिक्षण आज पूर्ण झाले.

मुख्यमंत्री-चिखलीकर दिलजमाई
नांदेड, १४ एप्रिल/वार्ताहर

मतदानाच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्र्यांना आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्याकडे सहकार्याचा हात पुढे करावा लागला. मध्यरात्री त्यांच्यात दिलजमाई झाल्यानंतर लातूरचा व्याप थोडा बाजूला ठेवून प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड मतदारसंघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. माजी मुख्यमंत्र्यांचे समर्थक असलेल्या प्रतापरावांना काल मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बोलावून घेतले. उमेदवार भास्करराव खतगावकरांच्या उपस्थितीत दोन तास चर्चा झाल्यानंतर झाले-गेले विसरून एकत्र येण्याचा निर्णय झाला. ते लगेचच पेठवडज व कुरुळा गटांममध्ये प्रचाराला लागले. श्री. खतगावकरांसाठी काम करण्याची सूचना श्री. चिखलीकर यांनी दिली.

बारा किलो गांजा जप्त
औरंगाबाद, १४ एप्रिल/प्रतिनिधी

औरंगाबाद शहरामध्ये गांजा विक्रीसाठी आणण्यात येत असतानाच पोलिसांनी सापळा लावून एकास अटक केली. बाबुखान जानीखान पठाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १२ किलो ६०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. बाबुखान हा बीड बायपास येथे आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार तो तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यापूर्वीही त्याने शहरात गांजा आणून विकला असल्याचा पोलिसांना संशय आहे.

औरंगाबादमध्ये संकीर्तनयात्रा
औरंगाबाद, १४ एप्रिल/खास प्रतिनिधी

श्री योगवेदान्त सेवा समितीच्या वतीने संतश्री आसाराम बापू यांच्या ६९ व्या अवतरणदिनानिमित्त शहागंज येथील गांधी पुतळ्यापासून संकीर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आसाराम बापू आणि विविध देवी देवतांच्या प्रतिमा वाहनावर आरुढ करण्यात आल्या होत्या. साधकांच्या नृत्यांच्या संगतीने आणि टाळ-मृदंगाच्या साथीने ही यात्रा सिटीचौक, गुलमंडी, औरंगपुरा या मार्गाने खडकेश्वर येथील महादेव मंदिरात पोहोचली आणि त्या ठिकाणी यात्रेची सांगता झाली. बुधवारी अवतरण दिनानिमित्त बेगमपुऱ्याच्या आश्रमामध्ये विविध कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बोरोळे, विजय देशमुख, पोपटराव खेडकर, बबन दाभाडे, गौतम तांबोळी, दिलीप जोगस, धनंजय कंकाळ, राजेंद्र बिराजदार आदी सहभागी झाले होते.

‘डॉ. हेडगेवार रुग्णालयाचा उद्योजकतेचा प्रयोग यशस्वी’
औरंगाबाद, १४ एप्रिल/खास प्रतिनिधी

डॉ. हेडगेवार रुग्णालयाने सामाजिक कार्यासोबतच उद्योजकतेचा प्रयोग यशस्वी केला आहे, असे मत रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अनंत पंढरे यांनी सिंगापूर येथील विद्यापीठात केले.
सिंगापूरमधील प्रतिष्ठित आणि एकमेव विद्यापीठामध्ये डॉ. पंढरे यांचे ‘सामाजिक कार्य आणि त्यामधील उद्योजकता’ या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानाला चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंडोनेशिया या देशांमधील गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. त्यांना सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या देशातील भारतीयांनी रुग्णालयाच्या सामाजिक कार्याची माहिती देण्यासाठी निमंत्रित केले आहे.

‘पद्मसिंह पाटील यांना कळंबमधून सर्वाधिक मताधिक्य मिळेल’
कळंब, १४ एप्रिल/वार्ताहर

जिल्ह्य़ाचा विकास साधण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांना लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान कळंब तालुक्यातून मिळण्य़ासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीपसिंह देशमुख यांनी केले.तालुक्यामध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त प्रचार यंत्रणा राबत आहे. या तालुक्यातील भोगजी, ईटकूर, सात्रा, खोंदला, हावरगाव हसेगाव येथील कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडित टेकाळे, नानासाहेब जाधवर, काँग्रेसचे अनंत वाघमारे आदी उपस्थित होते.

सापळी धरण संघर्ष समितीचा मतदानावर बहिष्कार
हिंगोली, १४ एप्रिल/वार्ताहर
कळमनुरी तालुक्यातील नियोजित सापळी धरणामध्ये २० गावे जाणार असल्याने सापळी धरणाला विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संघर्ष समितीने निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्य़ातील नियोजित सापळी धरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहे. धरणाला विरोध करण्यासाठी २० गावांच्या लोकांनी अनेक वेळा धरणे, रास्ता रोको, उपोषण यासारखी तीव्र आंदोलने केली. मात्र याची दखल न घेता सरकारने धरणाचे काम सुरू केले. याला विरोध करण्यासाठी मंगळवारी संघर्ष समितीची बैठक झाली. त्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बहिष्कार मागे घ्यावा यासाठी शिवसेनेचे उमेदवार आमदार सुभाष वानखेडे, आमदार गजानन घुगे यांनी बैठकीत लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता पदाधिकाऱ्यांनी त्यांना दाद दिली नाही. समितीचे पदाधिकारी केशव पतंगे यांनी आमच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर हा लढा असल्याने यामध्ये इतरांनी हस्तक्षेप करू नये, असे बजावले तेव्हा ही मंडळी निमूट परतली.

अंतिम टप्प्यात मतदारांच्या भेटीगाठीवर भर
बोरी, १४ एप्रिल/वार्ताहर
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा आला आहे. सर्व पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. हक्काचा उमेदवार म्हणून लोकसभेसाठी निवडून द्या, असे युतीचे उमेदवार गणेश दुधगावकर यांनी सांगितले. परभणी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांच्या प्रचारार्थ पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय भांबळे यांनी घरोघरी भेट दिली. शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉ. मानवेंद्र काचोळे यांचा प्रचार येथील मारवाडी कार्यकर्ते करीत आहेत. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार राजश्री जामगे बोरीत केव्हा आल्या ते कुणालाच कळले नाही.

धनगर समाजाकडून मुंडेंना सहकार्य नाही - हजारे
अंबाजोगाई, १४ एप्रिल/वार्ताहर
धनगर समाजाचे नेते व महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांना सापत्न वागणूक देऊन युतीच्या काळात त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या आमदार गोपीनाथ मुंडे यांना जिल्ह्य़ातील धनगर समाज लोकसभा निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष व महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत हजारे यांनी मांडली.

गावरान आंब्याच्या उत्पादनात यंदा घट
सोयगाव, १४ एप्रिल/वार्ताहर

या वर्षी आंब्याला मोहोर न लागल्याने प्रारंभापासून आंबा उत्पादकाला संकटाची जाणीव झाली. काही ठिकाणी उशिरा मोहोर आल्याने दिलाला मिळाला असला तरी फलधारणा फारच कमी प्रमाणात झाली. अजिंठय़ाच्या डोंगरात असलेली हळदा, उक ला, वसई या गावांतील गावरान आंब्याला खान्देश व मराठवाडय़ात मोठी मागणी असते. सोयगाव तालुक्यातही अनेक जुनी आंब्यांची झाडे आहेत. त्यापासून मिळणारे गावरान आंब्याची चव आमरस शौकिनाला तृप्त करते.सोयगावातील शेतकरी थोटे यांनी सांगितले की, त्यांच्या शेतातील कै ऱ्यांनी लगडलेली झाडे सुकू लागली आहे. काही झाडे तर वाळून गेली आहेत. अचानक अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव पडल्याने आंबा उत्पादनाला ग्रहण लागले आहे. एप्रिल महिन्यात गावरान आंबा बाजारात येतो. यंदा मात्र त्याचे आगमन लांबणीवर पडले. आंब्याच्या झाडावर पडलेल्या या रोगामुळे आंबा उत्पादकावर विपरित परिणाम झाला आहे. यामुळे यंदा आंब्याचे भाव चढे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

आंबेडकर जिवंत विचारज्वाला - डॉ. केंद्रे
गंगाखेड, १४ एप्रिल/वार्ताहर
भारतीय विषम समाजव्यवस्थेला सामाजिक लढय़ानेजिंकणारे बाबासाहेब म्हणजे एक जिवंत विचारज्वाला आहे, असे प्रतिपादन गंगाखेडचे नगराध्यक्ष डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी व्यक्त केले आहे.
आज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शहरातील डॉ. आंबेडकरनगर येथे डॉ. केंद्रे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर साळवे हे तर व्यासपीठावर डॉ. केंद्रे यांच्यासह विठ्ठर रबदडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे, गोविंद यादव, गौतम रोहीणकर, नगरसेवक शे. अफजलोद्दीन आदींची उपस्थिती होती. ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक कुंडलिक साळवे, शोभा सावंत यांच्या हस्ते झाले. डॉ. केंद्रे पुढे म्हणाले की, माझ्या कारकीर्दीत शहरात लवकरात लवकर भारतरत्न बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. समाज्चाय विकासाच्या योजना कार्यान्वीत करण्यात येतील. प्रास्ताविक प्रमोद साळवे, सूत्रसंचालन सूर्यकांत साळवे तर आभार विठ्ठल साळवे यांनी केले.

आंबेडकर जयंती चाकूरमध्ये उत्साहात
चाकूर, १४ एप्रिल/वार्ताहर
चाकूर येथील सिद्धार्थनगर येथे प्रा. बी. एस. बचाटे यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकवण्यात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ११८वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच डॉ. आंबेडकर चौक, वैशाली बौद्धविहार, लिंबोणीनगर व नालंदा बौद्धविहार येथे अनुक्रमे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास पाटील, बाबासाहेब पाटील, पं. स. सदस्या संजीवनी भालेराव, रमेश गिरके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. जयंतीनिमित्ताने नालंदा बौद्धविहार येथे १८ तास वाचन कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमास जयंती समितीचे सचिव सुग्रीव महालिंगे, लक्ष्मण तिकटे, मधुकर कांबळे, बाबासाहेब कांबळे, पी. एस. गायकवाड, सुभाष महालिंगे, प्रा. भीमराव साळवे, प्रा. बालाजी कांबळे यांच्यासह भीमसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

उकिरडय़ावरचे अन्न खाऊन चार जनावरे दगावली
चाकूर, १४ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील चापोली येथे टाकून दिलेले अन्न खाल्ल्यामुळे चार जनावरे दगावली आहेत. पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन पशु अधिकारी अ. वि. देशपांडे यांनी केले आहे. चापोली व परिसरामध्ये विविध कार्यक्रमांमधून उरलेले अन्न चार-पाच दिवसांनी जनावरांनी खाल्ल्यानंतर झालेल्या विषबाधेतून दोन म्हशी, एक गाय, एक शेळी या जनावरांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. याप्रकारच्या विषबाधेपासून होणाऱ्या नुकसानीपोटी पशुपालकांत जागृती होण्याची गरज असल्याचे पशुविकास अधिकारी डॉ. देशपांडे यांनी सांगितले.