Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राम मंदिर उभारणी हा तर आंबेडकरांचा अजेंडा- जावडेकर
मुंबई, १४ एप्रिल/प्रतिनिधी

 

राम मंदिराची उभारणी, ३७० वे कलम, समान नागरी कायदा, गोरक्षा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अ‍ॅ जेंडा असून तो च आम्ही राबवत आहोत, असे उद्गार भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत काढले. योगायोग म्हणजे आंबेडकर जयंती असताना जावडेकर यांनी हे वक्तव्य केले.
जावडेकर म्हणाले की, धर्माधता आणि सेक्युलॅरिझम या विषयावर काँग्रेसशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत. सध्याची काँग्रेस ही स्वातंत्र्यपूर्व काळातील मुस्लीम लीग झाली असून सध्याच्या भाजपची भूमिका ही स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रवादी विचारांच्या काँग्रेससारखी आहे. धर्माधता ही दहशतवादापेक्षा भयंकर आहे या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विधानावरही जावडेकर यांनी आक्षेप घेतला.
जावडेकर म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी हे संवेदनशील व्यक्ती असून मनमोहन सिंग हे असंवेदनशील आहेत. एका अतिरेक्याच्या आई-वडिलांचे अश्रू पाहून त्यांचे ह्रदय द्रवले होते. अतिरेकी कारवायांत मरण पावलेल्या हजारो लोकांच्या यातना पाहून मनमोहन सिंग यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले नाहीत. अतिरेक्यांनी भारतीय विमानाचे अपहरण करून ते कंधारला नेऊन ठेवले तेव्हा सर्वपक्षीय बैठकीत मनमोहन सिंग यांनी विमानातील १४० निरपराध लोकांचे जीव वाचविण्याकरिता सरकारला जे योग्य वाटेल ते करावे, असे उद्गार काढले होते. विद्यमान गृहमंत्री चिदम्बरम यांनीही तेच मत आता व्यक्त केले आहे. मनमोहन सिंग यांची मानसिकता नोकरशहाची असून ‘यस मॅडम’ करण्यात ते धन्यता मानतात. मनमोहन सिंग पंतप्रधानपदावर आहेत पण सत्ता त्यांच्या ताब्यात नाही.

साध्वीच्या प्रश्नावर जावडेकर यांची पंचाईत
अफझल गुरू या अतिरेक्याची तळी उचलून धरण्यावरून प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर टीका केली तेव्हा मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांची तळी भाजपने उचलून का धरली असा सवाल केला असता भाजपमध्ये कुणी अशी भूमिका घेतली अशी विचारणा त्यांनी केली. तुरुंगात हाल होत असल्याची तक्रार अन्य आरोपींनी करूनही भाजपने त्यावेळी भूमिका घेतली नाही, असे विचारले असता त्यावेळी आम्हाला तसे कुणी विचारले नाही, असे ते म्हणाले. कायद्याचे पालन झाले पाहिजे हीच भाजपची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.