Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला; ‘जुळवाजुळव’ सुरू!
नागपूर, १४ एप्रिल /प्रतिनिधी

 

विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ-वाशीम, अकोला, बुलढाणा आणि अमरावती या दहाही लोकसभा मतदारसंघ तसेच मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या तीन मतदारसंघातील जाहीर प्रचार आज सायंकाळी संपला आणि गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी शेवटच्या दोन दिवसांत करण्यात येणाऱ्या निर्णायक ‘जुळवाजुळवी’ने वेग पकडला. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि विलास मुत्तेमवार, विद्यमान खासदार आनंद अडसूळ, हंसराज अहीर, भावना गवळी, हरिभाऊ राठोड, संजय धोत्रे यांच्यासह विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, नाना पटोले आणि प्रताप जाधव, काँग्रेसचे हेवीवेट उमेदवार दत्ता मेघे आणि मुकुल वासनिक, भारिप बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, भाजपचे बनवारीलाल पुरोहित या दिग्गज नेत्यांसह विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघातून एकूण १९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अपक्ष म्हणून नागपूर आणि रामटेक मतदारसंघातून रिंगणात असणाऱ्या रिपब्लिकन नेत्या सुलेखा कुंभारे यांनी प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत नागपूर मतदारसंघातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. प्रचार संपण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी चौक सभा आणि प्रचार यात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपब्लिकन आघाडीविरुद्ध शिवसेना-भाजप युती अशी लढत होत असून बहुजन समाज पार्टीची भूमिका या युती किंवा आघाडीच्या जय-पराजयाचे भवितव्य ठरवणार आहे.