Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पेट्रोल सिर्फ एक लिटर,
चले सौ किलोमीटर
मुंबई, १४ एप्रिल / प्रतिनिधी

 

लाख रुपये किंमत असलेल्या नॅनोमुळे स्वत:ची कार बाळगण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार असले, तरी पेट्रोलवरील खर्चामुळे ही स्वस्तातील कारदेखील किती लोकांना परवडेल, याबाबत अद्याप साशंकता व्यक्त होत आहे. मात्र जर्मन मोटार कंपनी व्होक्सवॅगनने एक लीटर पेट्रोलमध्ये १०० किमी इतके जबरदस्त ‘अ‍ॅव्हरेज’ देणारी कार विकसित केली आहे. ही कार केवळ नॅनोहून हलकीच नाही तर तिच्यापेक्षा छोटीही आहे. जगातील सर्वाधिक ‘इकनॉमिकल’ (परवडणारी) कार म्हणून अल्पावधीतच व्होक्सव्ॉगनच्या या कारला प्रसिद्धी मिळाली आहे. व्होक्सवॅगनने ही कार काही काळापूर्वी हॅम्बर्ग शहरात पार पडलेल्या कंपनीच्या भागभांडवलधारकांच्या बैठकीच्या निमित्ताने सर्वप्रथम जगासमोर आणली. तिचे अद्याप नामकरण झाले नसले, तरी ‘वन लीटर कार’ म्हणून ती जगभरात सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. व्होक्सवॅनगची ही कार एखाद्या ‘कन्सेप्ट’ कारसारखी दिसते. मात्र तिचा हा ‘लूक’ एखाद्या स्पोर्टस् कारकडे झुकणारा आहे. ही कार नॅनोहूनही छोटी आणि वजनाने हलकी आहे. तिची लांबी अवघी ३.४७ मीटर असून, रुंदी १.२५ मीटर आहे. कार्बन फायबरची ‘बॉडी’ असलेल्या या कारचे वजन अवघे २९० किलो आहे. सुमारे ६५० किलो वजनाच्या नॅनोपेक्षा तिचे वजन निम्म्याने कमी आहे.
कमी इंधनात जास्तीत जास्त अंतर कापता यावे, यासाठी व्होक्सवॅगनने ‘वन लीटर कार’चे वजन कमीतकमी ठेवले आहे. त्यासाठी तिला रंगसुद्धा देण्यात आलेला नाही. गाडीचे विविध भाग बनविताना अ‍ॅल्युमिनियमसारख्या जड धातूंचा वापर करण्याऐवजी तुलनेने हलक्या मॅग्नेशियमचा वापर मोठय़ा प्रमाणात केला आहे. गिअर, टायर्स या साऱ्याच गोष्टी कमीतकमी वजनाच्या वापरल्या आहेत. इतकेच नव्हे तर कारमधील सीटसाठीही मॅग्नेशियम व कापडाचा वापर केला आहे.
व्होक्सवॅगनच्या ‘वन लीटर कार’मध्ये सिंगल सिलेंडर डिझेल इंजिन आहे. हाय-प्रेशर युनिट इंजेक्शन टेक्नोलॉजीचा वापर असलेल्या या इंजिनापासून कारला ८.५ बीएचपी इतकी शक्ती मिळते. परिणामी अवघ्या ०.९९ लीटर डिझेलमध्ये ही कार १०० किमीचे अंतर कापते. विशेष म्हणजे हे उदिष्टय़ साध्य करण्यासाठी कोणत्याही बाबतीत तडजोड करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कारमधील ६.५ लीटरची डिझेल टाकी एकदा ‘फुल्ल’ केल्यानंतर ६५० किमीचे अंतर कापेपर्यंत थांबण्याची गरज नाही. नॅनोमधून चालकासह पाच लोक सहज प्रवास करू शकतात. व्होक्सव्ॉगनची ही कार मात्र केवळ दोघांसाठी आहे. कारचे इंजिन मागील बाजूस असून, आसन व्यवस्था एकामागे एक अशी आहे. कारमधील अंतर्गत रचना आकर्षक असून, तिच्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेही पुरेसे लक्ष देण्यात आले आहे. अ‍ॅन्टी लॉक ब्रेक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी प्रोग्राम, ड्रायव्हर एअरबॅग यासारख्या गोष्टी कारमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र ‘नॅनो’च्या तोडीस तोड असलेल्या या कारची किंमत अद्यापही गुलदस्त्यातचे आहे.