Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नवे सरकार अल्पायुषीच!
राजकीय निरीक्षकांचा अंदाज
नवी दिल्ली, १४ एप्रिल/वृत्तसंस्था

 

लोकसभा निवडणुकांनंतर नव्याने अस्तित्वात येणारे केंद्रसरकार आपला पूर्ण कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. दोन ते तीन वर्षांच्या अवधीतच देश पुन्हा राजकीय अस्थिरतेच्या खाईत ओढला जाईल, असे भाकित देशातील १४ प्रमुख राजकीय निरीक्षकांनी नोंदवले आहे. सध्या आघाडय़ांमध्ये वादंग निर्माण होत असताना व सातत्याने पक्षांची नवी जुळवाजुळव चालू असताना गेले काही दिवस काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’ला सरकार स्थापण्यासाठी डाव्या पक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा निरीक्षकांचा दावा आहे. या निवडणुकीत मुख्य सामना काँग्रेसप्रणीत यूपीए आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआमध्येच असून डाव्या पक्षांनी काही मतभेद असूनही तिसऱ्या आघाडीची स्थापना करून या दोन्ही मुख्य आघाडय़ांना आव्हान दिले आहे. डाव्या आघाडीने काही दिवसांपूर्वी प्रचारात थोडी बाजी मारली होती, मात्र मागील दोन आठवडय़ांमध्ये तिची लोकप्रियता चार टक्क्यांनी घटली आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते डाव्या पक्षांचा पाठिंबा न घेता काँग्रेसची यूपीए सत्तेवर येण्याची शक्यता २२ टक्केच आहे. मागील आठवडय़ात ही शक्यताही एक टक्क्यांनी कमी झाली आहे. डाव्या पक्षांच्या पाठिंब्यासह काँग्रेसप्रणीत यूपीए सत्तेत येण्याची ३६ टक्के शक्यता आहे. भाजपाची रालोआ सत्तेवर येण्याची २१ टक्के शक्यता आहे.
निवडणुकीनंतर रालोआ किंवा यूपीए यापैकी कोणालाही सरकार स्थापनेसाठी मायावतींच्या बसपाची मदत घेणे अपरिहार्य ठरले तर मायावती पंतप्रधानपदाची अट घालणार, हे उघड आहे. याशिवाय तिसऱ्या आघाडीने बऱ्यापैकी यश मिळविल्यास काँग्रेस तिला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार होईल अथवा नाही, हा सुध्दा प्रश्नच आहे. सरकारमध्ये बसपाचा सहभाग असल्यास समाजवादी पार्टी त्यात सामील होण्यास स्पष्ट नकार देईल. अण्णा द्रमुकच्या निर्णयावर द्रमुकचा मार्ग ठरेल. त्याचप्रमाणे डाव्यांनी युपीएला समर्थन दिल्यास ममतांचा तृणमूल पक्ष वेगळ्या वाटेने जाईल. तर लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान हे प्रसंगी कोणत्याही सरकारमध्ये सामील होऊ शकतात. त्यामुळे त्रिशंकू लोकसभेच्या परिस्थितीत सरकार बनविताना कोण कोणाबरोबर जातो यापेक्षा कोण कोणाबरोबर जात नाही यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील, असे विश्लेषण प्रणब रॉय यांनी एनडीटीव्हीवर मंगळवारी झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राजकीय जाणकारांनीही मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाकारली नाही. कोणत्याही आघाडीचे सरकार जुळवाजुळव करून स्थापन झालेच आणि ते टिकले नाही तर मध्यावधी निवडणुका निश्चित आहेत आणि त्या परिस्थितीत मध्यावधी निवडणुकांमध्ये भाजप आणि रालोआला भरघोस मतदान होऊन त्यांचे एकटय़ाचेच सरकार स्थापन होऊ शकते, असाही अंदाजही राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.