Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
प्रादेशिक

'९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांचे गांभीर्य दरोडय़ाइतकेही नाही?
मुंबई, १४ एप्रिल/प्रतिनिधी

शेकडो निरपराधांचे बळी घेणारे मार्च १९९३ मधील मुंबईतील भीषण बॉम्बस्फोट हा महाभयंकर गुन्हा असल्याचा कितीही आव सरकारने आणला असला प्रत्यक्षात सरकारला हा गुन्हा दरोडा घालणे किंवा दारुबंदी कायद्याचे उल्लंघन करणे याहून अधिक गंभीर असल्याचे वाटत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयात अलीकडेच निकाल झालेल्या या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींच्या ‘पॅरॉल’ प्रकरणांवरून स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा जनतेत फूट पाडणारा: राष्ट्रीय मतदाता मंच
मुंबई, १४ एप्रिल / प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी अलीकडेच घोषित केलेला जाहीरनामा देशात अल्पसंख्य आणि बहुसंख्य म्हणजेच हिंदू आणि मुस्लिम अशी फूट पाडणारा असल्याने अशा पक्षाची नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून मान्यता कायम ठेवण्याबाबत निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती राष्ट्रीय मतदाता मंचने एका निवेदनाद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मूळचे मार्क्सवादी आता ठाकूरवादी!
ठाणे, १४ एप्रिल/प्रतिनिधी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडलेल्या ठाणे जिल्ह्यातील कम्युनिस्ट नेत्यांनी स्थापन केलेल्या कॉ. गोदुताई शामराव परुळेकर मार्क्सवादी विचार मंचाने आपला पाठिंबा वसई विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना दिला आहे. त्यामुळे माकप अधिकृत उमेदवार लहानू कोम यांची हक्काची मते यावेळी विभागतली जातील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.पक्षांतर्गत मतभेद उफाळून आल्याने मध्यंतरी ठाणे जिल्ह्यातील माकपच्या लाल किल्ल्याला भगदाड पडले होते.

प्रवीण महाजन यांचा मजकूर पक्षीय आकसापोटी!
माहीम जिल्हा भाजपद्वारे निषेध
मुंबई, १४ एप्रिल / प्रतिनिधी

‘लोकसत्ता’च्या १२ एप्रिलच्या आवृत्तीमध्ये ‘मी प्रवीण महाजन बोलतोय..’ या शीर्षकाखाली प्रकाशित केलेला मजकूर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि पक्षाच्या आकसापोटी प्रसिद्ध केलेला आहे असे नमूद करून त्याचा मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातील माहीम जिल्हा भाजपने एका पत्रकान्वये निषेध केला आहे.या बाबत पक्षाचे माहीम जिल्हा अध्यक्ष विकास माने, उपाध्यक्ष राजेश शिरवडकर, चिटणीस विवेक भाटकर आणि सरचिटणीस विलास आंबेकर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आपल्या देशात लोकशाहीच्या नावावर काहीही केले जाते, असे आपल्यासारख्यांना वाटते. आपली लेखणी देशातील अन्य गंभीर समस्या मांडण्यासाठी वापरली गेली असती तर आम्ही आपली प्रशंसा केली असती. मात्र ज्या प्रकारचे वृत्त आपण उगीच छापून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रकार केला आहे तो निषेधार्ह आहे. भविष्यात आपल्या देशातील गरिबांच्या समस्या, दहशतवादाच्या समस्या या बाबत लिखाण करून पत्रकारितेचा मान वाढवावा. दिवंगत व्यक्तीच्या चारित्र्यावर चिखलफेक करू नये कारण आम्हालाही व्यक्तीस्वातंत्र्य कळते. परंतु अशी कृती व्यक्तीस्वातंत्र्याच्या आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात बसत नाही. त्यामुळे त्याचा आम्ही निषेध करतो, असेही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकात म्हटले आहे.

मनसेला मिळाले इंजिन, शिट्टी आणि नगारा चिन्ह
मुंबई, १४ एप्रिल/ खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत १२ जागा लढविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तीन वेगवेगळी चिन्हे मिळाली आहेत. मनसेच्या सहा उमेदवरांना इंजिन चिन्ह, तर तीन जणांना शिट्टी आणि तिघांना नगारा चिन्ह मिळाले आहे. पक्ष नवीन असला व चिन्हे वेगवेगळी मिळाली असली तरी मनसे यापूर्वीच लोकांमध्ये पोहचला असल्यामुळे चिन्हाची फारशी अडचण होणार नाही, असे उत्तर मुंबईतील मनसेचे उमेदवार शिरीष पारकर यांनी सांगितले. दक्षिण मुंबईतील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर, उत्तर-पूर्व मुंबईतील शिशिर शिंदे, उत्तर-पश्चिम मुंबईतील शालिनी ठाकरे, उत्तर मुंबईतील शिरीष पारकर, कल्याण येथील वैशाली दरेकर आणि नाशिक येथील हेमंत गोडसे यांना इंजिन चिन्ह निशाणी म्हणून मिळाले आहे. दक्षिण मध्य मुंबईतील श्वेता परुळकर, पुणे येथील रणजित शिरोळे आणि औरंगाबाद येथील सुभाष पाटील यांना शिट्टी चिन्ह, तर उत्तर-मध्य मुंबईत शिल्पा सरपोतदार, ठाणे येथे राजन राजे आणि भिवंडी येथील देवराज म्हात्रे यांना नगारा चिन्ह मिळाले आहे.

‘कोसबाड टेकडी वार्तापत्र’ची पारितोषिकासाठी निवड
मुंबई, १४ एप्रिल / प्रतिनिधी

कवी प्रफुल्लदत्त स्मारक समितीने दिलेल्या देणगीतून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या कवी प्रफुल्लदत्त पारितोषिकासाठी ‘कोसबाड टेकडी वार्तापत्र’ची निवड करण्यात आली आहे. यंदाचा हा पुरस्कार ‘आदर्श व कुशल संपादक’ या गटासाठी देण्यात आला आहे. दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी गिरिजा कीर व डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या परीक्षक समितीने ग्राम बाल शिक्षा केंद्र, कोसबाड टेकडी, तालुका-डहाणू, जिल्हा-ठाणे यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या या वार्तापत्राची निवड केली आहे.येत्या २५ एप्रिल रोजी मुंबई ज्येष्ठ साहित्यिक प्रा. के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

वर्सोवा येथे चोरटय़ांकडून वृद्धेची हत्या
मुंबई, १४ एप्रिल / प्रतिनिधी

वर्सोवा येथील कविता सोसायटीत राहणाऱ्या एका वृद्धेची चोरटय़ांनी गळा चिरून हत्या करून सुमारे ६५ हजार रुपयांचे दागिने लुटून नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबेन कोठारी (७५) असे या महिलेचे नाव असून ती वर्सोवा येथील साईमंदिर परिसरात असलेल्या कविता सोसायटीमध्ये मुलगी दीप्तीसोबत राहत होती. सोमवारी रात्री दीप्ती कामानिमित्त बाहेर गेली होती व ताराबेन घरात एकटय़ाच होत्या. दीप्ती जेव्हा घरी परतली तेव्हा तिला ताराबेन यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. तिने तात्काळ पोलिसांना घटनेबद्दल कळवून ताराबेन यांना नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच ताराबेन यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. चोरटय़ांनी ताराबेन यांची गळा चिरून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ताराबेन यांच्या घराच्या सुशोभिकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे सुशोभिकरणाचे काम करण्यासाठी येणाऱ्या कामगारांचा या हत्येमागे हात असण्याचा पोलिसांना संशय असून चौकशीसाठी काही कामगारांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

घाटकोपर येथे भिंत कोसळून दोघे जखमी
मुंबई, १४ एप्रिल / प्रतिनिधी
घाटकोपर (प.) येथील नेव्ही कंपाऊंडची भिंत आज दुपारी अचानक कोसळल्याने नाला सफाईचे काम करणारे दोन कामगार गंभीर जखमी झाले. दोघांनाही राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संजय हरिश्चंद्र पटेल (१९) आणि सिद्दीक कुदरत उल्लाह (४२) अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे असून दोघेही चिरागनगर येथील बडा कब्रस्तान परिसरातील राहणारे आहेत. संजय आणि सिद्दीक दोघेही दुपारी नेव्ही कंपाऊंडच्या शेजारील एल. बी. एस रोडवरील नाला सफाईचे काम करीत असताना अचानक कंपाऊंडची भिंत त्यांच्यावर कोसळली व दोघेही ढिगाऱ्याखाली सापडून जखमी झाले.

एक्स्प्रेस हायवेवर अपघातामुळे वाहतूक कोंडी
मुंबई, १४ एप्रिल / प्रतिनिधी

मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या दोन ट्रकची धडक होऊन मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आज एक विचित्र अपघात झाला. त्यामध्ये रसायन गळती होऊन वाहतूक कोंडी झाल्याने, पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले.एक्स्प्रेस हायवेवर खंडाळा घाटातील किलोमीटर क्रमांक ४५.५ येथे रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घाटातील चढणीच्या रस्त्यावर एका मालवाहक ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने, तो मागे घरंगळत आला व मागून येणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकवर आदळला. या विचित्र अपघातात एका ट्रकमधील रसायनाचे पिंप फुटले. परिणामी सदर रसायन रस्त्यावर पसरले.या अपघातामुळे एक्स्प्रेस हायवेवरील पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक रोखण्यात आल्याने, त्यावर वाहनांची लांबलचक रांग लागली होती.